मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई – नवी मुंबई दरम्यानचे अंतर केवळ १२ ते १५ मिनिटांत पार करता यावे यासाठी अटल सेतू बांधला. अटल सेतू जानेवारीपासून वाहतूक सेवेत दाखल झाला. मात्र भरमसाट टोलमुळे म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आता मागील दोन महिन्यांपासून वाहनांची संख्या रोडावली. नोव्हेंबरमध्ये वाहनांची संख्या ३८ हजारांनी कमी झाली. अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी का होत आहे याचा आढावा…
अटल सेतू प्रकल्प कसा आहे ?
मुंबई पारबंदर प्रकल्पाची संकल्पना १९७० मध्ये मांडण्यात आली होती. पण हा प्रकल्प कागदावर उतरण्यासाठी २०१४ उजाडले, तर प्रकल्पाच्या कामास सुरुवात होण्यासाठी २०१८ पर्यंत वाट पाहावी लागली. मुंबईतील शिवडी येथून सुरू होणारा आणि नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणारा अटल सेतू २१.८० किमी लांबीचा आहे. सहा पदरी मार्गिकांचा १६.५ किमीचा भाग सागरी सेतूने व्यापला आहे, तर ५.५ किमीचा भाग जमिनीवर आहे. सागरी सेतूसाठी १८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. त्यात वाढ होऊन खर्च २१ हजार कोटी रुपयांहून अधिक झाला. वैशिष्ट्य म्हणजे सागरी सेतूच्या बांधकामासाठी १,६५,००० टन स्टील, ९६,२५० टन स्ट्रक्चरल स्टील, ८३०,००० क्यूबिक मीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला. हा सेतू अधिक मजबूत करण्यासाठी एमएमआरडीएने अत्याधुनिक आणि परदेशी अशा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (ओएसडी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारतात प्रथमच या प्रकल्पात ओएसडी या परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. २१.८० किमी लांबीच्या सागरी सेतूमध्ये ७० ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक १६० ते १८० मीटरचे स्पॅन बसविण्यात आले. त्यामुळे मच्छिमारांना आपल्या बोटी नेणे सहज शक्य होत आहे. तर ओएसडीमुळे पुढील १०० ते १५० वर्षे सागरी सेतूला कोणताही धोका पोहोचणार नाही असा दावा करण्यात येत आहे.
हेही वाचा : विश्लेषण : सरकारला व्याघ्रप्रकल्प नको आहेत का?
अतिवेगवान प्रवासासाठी पथकर किती?
एमएमआरडीएने अटल सेतूसाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी सागरी सेतूवरून जाणाऱ्या वाहनांकडून पथकर घेण्याचा निर्णय घेतला. पथकर ठरविण्यासाठी एका स्वतंत्र समिती स्थापन केली होती. या समितीने हलक्या वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी ५०० रुपये पथकर प्रस्तावित केला होता. मिनी बससाठी ८०० रुपये, बस-ट्रकसाठी १,६६० रुपये, तर अवजड वाहनांसाठी २,६०० रुपये पथकर प्रस्तावित केला होता. मात्र या पथकराला सर्वच स्तरातून विरोध झाला आणि शेवटी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत पथकर कमी केला. त्यानुसार हलक्या वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी २५० रुपये पथकर निश्चित करण्यात आला. मिनीबससाठी ४०० रुपये, बस-ट्रकसाठी ८३० रुपये, अवजड वाहनांसाठी १३०० रुपये, तर अतिअवजड वाहनांसाठी १५५५ रुपये दर निश्चित करण्यात आला. या सेतूवर पथकर वसुलीसाठी अत्याधुनिक अशा ओपन रोड टोल यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे.
म्हणावा तसा प्रतिसाद नाही?
मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिवेगवान करण्यासाठी बांधण्यात आलेल्या अटल सेतूचे लोकार्पण जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पणानंतर अटल सेतू वाहतूक सेवेत दाखल झाला. पहिल्या दिवशी मुंबईकर, नवी मुंबईकरांनी अटल सेतूवर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या प्रकल्पास वाहनचालक – प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटत होते. एमएमआरडीएच्या अभ्यासानुसार अटल सेतूवरून दिवसाला ७० हजार वाहने धावतील अशी अपेक्षा होती. मात्र वाहतूक सेवेत दाखल होऊन दहा महिने होत आले, पण अपेक्षित प्रवासी संख्या गाठण्यात एमएमआरडीएला यश आलेले नाही. दिवसाला ७० हजारऐवजी अंदाजे २० ते २४ हजार वाहने अटल सेतूवरून प्रवास करीत आहेत. एकूणच या प्रकल्पाला वाहनचालक – प्रवाशांचा प्रतिसाद मिळालेला नाही.
हेही वाचा : ४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
प्रतिसाद का नाही?
एमएमआरडीएकडील उपलब्ध माहितीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत अटल सेतूवरून एकूण ७२ लाख ३१ हजार ५५९ वाहनांनी प्रवास केला. सप्टेंबरमध्ये ७ लाख १४ हजार २१३, ऑक्टोबरमध्ये ७ लाख ७ हजार १०४, तर नोव्हेंबरमध्ये ६ लाख ६९ हजार ०९२ वाहनांनी अटल सेतूवरून प्रवास केला. हा प्रतिसाद अत्यंत कमी असून याचे मुख्य कारण म्हणजे वाहनचालकांकडून आकारण्यात येणारा भरमसाट टोल. अनेकांना टोल परवडत नसल्याने अटल सेतूऐवजी इतर उपलब्ध पर्यायांचा वापर मुंबईकर, नवी मुंबईकरांसह पुणे आणि राज्याच्या इतर ठिकाणी जाणाऱ्यांकडून केला जात आहे.
मुंबई टोलमाफीचा अटल सेतूला फटका?
अटल सेतूवर हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी २५० रुपये मोजावे लागत असून ही रक्कम अधिक आहे. त्यामुळेच मोठ्या संख्येने वाहनचालक-प्रवासी अटल सेतू प्रवास टाळत आहेत. मात्र आता अटल सेतूवरील वाहनांची संख्या रोडवण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण पुढे आले आहे. ते म्हणजे राज्य सरकारकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईच्या वेशीवरील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना देण्यात आलेली टोलमाफी. राज्य सरकारने ऑक्टोबरमध्ये मुलुंड, एरोली, दहिसर, एलबीएस मार्ग आणि वाशी टोलनाक्यावर हलक्या वाहनांसह एसटी आणि शाळेच्या बसला टोलमाफी दिली. ही टोलमाफी १५ ऑक्टोबरपासून लागू झाली. या टोलमाफीमुळे प्रवाशांना, वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला. वाशी टोलनाक्यावरही टोलमाफी लागू झाल्याने प्रवासी – वाहनचालक मुंबई – नवी मुंबई – पुणे प्रवासासाठी अटल सेतूऐवजी ठाणे खाडी पुलाचा पर्याय स्वीकारत आहेत. ठाणे खाडी पुलावरून टोलमुक्त प्रवास होत असल्याने अटल सेतूवरील वाहनांची संख्या नोव्हेंबरमध्ये मोठ्या संख्येने कमी झाली. टोलमाफी मिळाल्याने अटल सेतूवरील संख्या कमी झालीच, त्याच वेळी एमएसआरडीसीने ठाणे खाडी पूल ३ वरील मुंबई – पुणे मार्गिकाही ऑक्टोबरमध्ये सुरू केली. ठाणे खाडी पुलावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असून ठाणे खाडी पुलाचा वापर वाढला. दरम्यान जानेवारी २०२५ मध्ये ठाणे खाडी पुल ३ वरील पुणे – मुंबई मार्गिकाही वाहतूक सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे वाशी मार्गे टोलमुक्त प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात अटल सेतूवरील वाहनांची संख्या आणखी रोडावण्याची चिन्हे आहेत. प्रवासाला अधिक वेळ लागत असला तरी पैशांची बचत होत असल्याने प्रवासी, वाहनचालक टोलमुक्त प्रवासालाच प्राधान्य देण्याचीच अधिक शक्यता आहे.