Sotheby’s halts Buddha jewels auction after India threat: भारत सरकारच्या कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्यानंतर सदबीज या आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनीने बुद्धधातूशी संबंधित असलेला पवित्र रत्नांच्या हाँगकाँग येथील लिलाव आता पुढे ढकलला आहे. या मौल्यवान संग्रहाचे वर्णन एक ‘महत्त्वाचा पुरातत्त्वीय शोध’ असे करण्यात आले होते. या लिलावात बुद्धधातूशी संबंधित होणाऱ्या रत्नांच्या विक्रीवर जगभरातील बौद्ध धर्मीय विद्वान आणि भिक्षू तसेच संबंधित अनेक प्रमुख बौद्ध संस्थांच्या प्रमुखांनी टीका केली होती. भारत सरकारने हा लिलाव म्हणजे जगभरातील बौद्ध समुदायाचा अपमानच आहे, असे म्हणत जोरदार आक्षेप घेतला होता. भारत सरकारच्या हस्तक्षेपामुळे सदबीजने जाहीर केले की, लिलाव पुढे ढकलल्यामुळे संबंधितांना चर्चा करण्यास अधिक वेळ मिळेल.
भारत सरकारचा आक्षेप
ब्रिटिश अधिकारी विल्यम क्लॅक्स्टन पेप्पे यांनी सुमारे १३० वर्षांपूर्वी भारताच्या उत्तरेकडील भागात या अवशेषांचा (बुद्धधातूचा) शोध लावला होता. या अवशेषांमध्ये गौतम बुद्धांच्या शरीरधातूंचाही समावेश असल्याचे मानले जाते. ‘पिप्रहवा जेम्स ऑफ द हिस्टॉरिकल बुद्धा, मौर्य साम्राज्य, अशोककालीन युग, इ.स.पू. २४०-२००’ या नावाने ओळखला जाणारा हा संग्रह ७ मे रोजी लिलावासाठी ठेवण्यात येणार होता. लिलाव होण्याच्या दोन दिवस आधी भारत सरकारने लिलाव संस्थेला पत्र लिहून आक्षेप घेत कळवले की, हे अवशेष भारतीय तसेच जागतिक बौद्ध समुदायाची सांस्कृतिक ओळख आहेत. हा लिलावामुळे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा तसेच संयुक्त राष्ट्रांच्या करारांचा भंग होत आहे. भारत सरकारच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाने मंगळवारी (६ मे) सदबीजच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. सदबीजने ई-मेलद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विचार करून आणि वस्तू विक्रीसाठी पाठवणाऱ्या व्यक्तींच्या संमतीने हा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच, या संदर्भातील चर्चांबाबतची माहिती आवश्यकतेनुसार शेअर केली जाईल.
१८०० रत्न
बुधवारी लिलावाची घोषणा सदबीजच्या संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आली आणि लिलावासाठी तयार केलेले वेबपेजही आता उपलब्ध नाही. विल्यम क्लॅक्स्टन पेप्पे हे इंग्लिश इस्टेट मॅनेजर होते. त्यांनी पिप्रहवा (लुंबिनीच्या दक्षिणेस) हे बुद्धांचे जन्मस्थान मानले जाते. इथे असलेला एक स्तूप पेप्पे यांनी उकरून काढला. सुमारे २,००० वर्षांपूर्वीचा अक्षरांकित अस्थीकरंडक व पवित्र मानले गेलेले अवशेष उघडकीस आणले.
या शोधामध्ये जवळपास १,८०० रत्न आहेत. माणिक, टोपाज, नीलम आणि डिझाइन केलेल्या सोन्याच्या पत्र्यांचा यात समावेश आहे. हे अवशेष एका वीटांनी बांधलेल्या कक्षात साठवले गेले होते. ज्या स्थळावर हे अवशेष सापडले आहेत ते पिप्रहवा उत्तर प्रदेशमध्ये आहे. सदबीजने १८९८ साली लागलेला महत्त्वाचा पुरातत्त्वीय शोध असे वर्णन त्यांच्या संकेतस्थळावर केले होते.
अवशेष भारतात परत पाठवावेत
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने बजावलेल्या कायदेशीर नोटिशीनंतर सदबीज या आंतरराष्ट्रीय लिलाव संस्थेने हाँगकाँगमध्ये होणाऱ्या पिप्रहवा स्तूपातील बुद्धधातूंचा लिलाव स्थगित करण्याचे आश्वासन भारत सरकारला दिले होते. सोमवारी संध्याकाळी भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने कायदेशीर नोटीस बजावल्यावर सदबीजने भारत सरकारला खात्री दिली की, ते या पवित्र बौद्ध अवशेषांच्या लिलावास रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलतील. मंत्रालयाच्या पत्रव्यवहारात सदबीज हाँगकाँगला सूचित करण्यात आले होते की, त्यांनी त्वरित या अवशेषांचा लिलाव मागे घ्यावा आणि हे पवित्र अवशेष भारतात परत पाठवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. हे अवशेष पिप्रहवा स्तूपातून बाहेर काढण्यात आले होते. पिप्रहवा हे प्राचीन कपिलवस्तू शहर (भगवान बुद्धांचे जन्मस्थान) म्हणून ओळखले जाते.
ब्राह्मीतील शिलालेख
वेगवेगळ्या बौद्ध संघटनांनीही हा लिलाव स्थगित करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मंत्रालयाने माहिती संकलित करून सदबीजला पत्र लिहिले, असे एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. पिप्रहवा अवशेषांमध्ये हाडांचे तुकडे, सोप दगड व स्फटिकाच्या पेट्या, वालुकाश्म दगडाची पेटी, तसेच सोन्याचे दागिने व रत्न यांसारख्या अर्पण केलेल्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. हे अवशेष १८९८ साली विल्यम क्लॅक्स्टन पेप्पे यांनी उकरले होते. पेटींपैकी एका पेटीवर ब्राह्मी लिपीत केलेल्या लेखामध्ये या अवशेषांचे बुद्धाशी असलेले नाते आणि शाक्य वंशाने ते ठेवल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारताबाहेरचा लिलाव बेकायदेशीर
सदबीजच्या संकेतस्थळावरील जाहिरातीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. या जाहिरातीत त्यांनी या ऐतिहासिक ठेव्याचे महत्त्व विशद करत लिलावाची माहिती दिली होती. पिप्रहवा स्तूपातून मिळालेल्या अनेक वस्तूंचा कोलकात्याच्या इंडियन म्युझिअम मध्ये संग्रह करण्यात आला होता. भारतीय कायद्यानुसार प्राचीन अवशेषांचा भारताबाहेर लिलाव किंवा परवानगीशिवाय त्यांचे स्थलांतर करणे गुन्हा आहे.
पेप्पे यांनाही भारताची नोटीस
या अवशेषांमधील जो भाग भारताबाहेर गेला तो भाग विल्यम क्लॅक्स्टन पेप्पे यांच्या नातवाकडे आहे. या हाडांचे काही अवशेष सियामच्या (आताच्या थायलंडच्या) राजाला भेट दिले गेले होते, तर उरलेले काही अवशेष पेप्पे कुटुंबीयांकडे ठेवण्यात आले होते. याच अवशेषांचा आता लिलावासाठी समावेश करण्यात आला होता. या संभाव्य लिलावाची माहिती मिळताच, सांस्कृतिक मंत्रालयाने सदबीज हाँगकाँगला लिलाव थांबवण्याची कायदेशीर नोटीस दिली आणि अवशेष भारतात परत पाठवण्याची मागणी केली. मंत्रालयाने क्रिस पेप्पे यांनाही अशीच कायदेशीर नोटीस बजावली.
केंद्र सरकारच्या वेगात हालचाली
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) हाँगकाँगमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाला त्वरित हस्तक्षेप करून लिलाव थांबवण्यास सांगितले. २ मे रोजी युनायटेड किंगडममधील सांस्कृतिक सचिव लिसा नॅंडी यांच्यासह झालेल्या द्विपक्षीय बैठकीत भारताचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता आणि या अवशेषांचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व स्पष्ट करून लिलाव थांबवण्याची आणि भारतात परत पाठवण्याची विनंती केली. ५ मे रोजी सांस्कृतिक सचिव विवेक अग्रवाल यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली आणि पुढील उपाययोजना ठरली.