Hikayat Seri Ram Ramayana Explained रामायणाची, राम नामाची भुरळ केवळ भारतातच नाही तर भारतीय ज्या ज्या ठिकाणी गेले, वसले तिथल्या स्थानिकांनाही पडली. आग्नेय आशियात तर रामायणाच्या अनेक आवृत्या निर्माण झाल्या आणि त्यांची पकड आजही जनमानसावर, तिथल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. किंबहुना कोणत्याही धर्माच्या बंधनाशिवाय राम आणि राम कथा हा जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. मलेशिया हा आग्नेय आशियातील एक मुस्लीमबहुल देश आहे. या देशाच्या संस्कृतीवर मलय, भारतीय, चीनी आणि युरोपीयन संस्कृतींचा संमिश्र प्रभाव आढळतो.

मलेशियाचा इतिहास हा भारताप्रमाणेच प्राचीन आहे. उपलब्ध पुरातत्त्वीय पुराव्यांच्या माध्यमातून अश्मयुगातही या भागात वस्ती झाल्याचे पुरावे सापडतात. भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतीचा खोलवर प्रभाव मलेशियन संस्कृतीवर आढळतो. किमान ४५०० वर्षांपूर्वी दक्षिण चीनमधून मलेशियात स्थलांतर झाले होते, हे स्थलांतरित सध्याच्या मलाया लोकांचे पूर्वज असल्याचे मानले जाते. किंबहुना या प्रदेशातील भारतीयांच्या वसाहतींबद्दल उल्लेख चिनी इतिहास आणि पुराणांमध्ये आढळतात. भारतीय पुराणांमध्ये, बौद्ध साहित्यात मलाया द्वीपकल्पाचा उल्लेख ‘सुवर्णद्वीप’ असा येतो. पुरातत्वीय अवशेषांनुसार अनेक भारतीय व्यापाऱ्यांनी इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात या भागात वसाहती स्थापन केल्या होत्या. इ.स.पू. दुसऱ्या शतकात या द्वीपकल्पाच्या ईशान्य-उत्तर भागात ‘लंकाशुक’ नावाचे भारतीय राज्य होते, हे राज्य इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात इंडोचायनामधील फूनान राज्याने जिंकून घेतले होते. त्यानंतर वेगवगेळ्या स्वरूपात भारतीय राजसत्तांचा प्रभाव या भागावर होता. मलेशियात इस्लामचे आगमन अनेक शतकांनंतर म्हणजे १३ व्या शतकात झाले. मलेशियात इस्लामचा प्रसार कसा झाला, कोणी केला, कोणत्याही हिंसक संघर्षाशिवाय इस्लामचा प्रसार कसा झाला, हे सांगणे अत्यंत अवघड किंबहुना स्वतंत्र विश्लेषणाचा भाग आहे. परंतु मलेशिया द्विकल्पाच्या भौगोलिक स्थानामुळे व्यापाराच्या दृष्टीने हे ठिकाण नेहमीच महत्त्वाचे ठरले होते, त्यामुळे हा भाग आपल्या ताब्यात राहण्यासाठी भूभागावरील राजसत्ता नेहमीच प्रयत्न करताना इतिहासात दिसतात. मलेशियाच्या शेजारील देश म्हणजे इंडोनेशिया, १९६३ साली हे दोन्ही देश एकमेकांपासून विभक्त झाले. ‘ए हिस्ट्री ऑफ इस्लाम इन इंडोनेशिया’ या पुस्तकात इतिहासकार कॅरूल कर्स्टन यांनी नमूद केल्याप्रमाणे या बेटांना हिंदू आणि बौद्ध परंपरांचा समृद्ध इतिहास असला तरी हिंदी महासागरातील मोठ्या मुस्लीम समुदायाबरोबरील संबंधांमुळे त्यांना अंगकोर आणि सियामच्या मुख्य भूभागावरील साम्राज्यांपासून संरक्षण मिळू शकले. अरबी भाषेतील संदर्भानुसार सुफी आदेशांची स्थापना अरबी द्वीपकल्पातील हद्रमुत प्रदेशात झाली, या आदेशांच्या स्थापनेमध्ये जावा मधल्या सदस्यांचाही सहभाग होता. या धार्मिक देवाणघेवाणी मध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे हे संदर्भ नमूद करतात. इसवी सनाच्या १६ व्या शतकापर्यंत सुमात्रा, मलय द्वीपकल्प आणि जावा येथील शासकांनी इस्लाम स्वीकारला. यानंतर स्थानिक कथा, पुराणांमध्ये हिंदू आणि बौद्ध आख्यायिकांप्रमाणेच इस्लामिक आख्यायिका आणि पदव्या दिसू लागल्या. इंडोलॉजिस्ट एस सिंगारावेलू यांनी ‘द रामा स्टोरी इन द मलय ट्रेडिशन’ मध्ये नमूद केल्या प्रमाणे, मलाक्का सुलतानांनी त्यांच्या अ‍ॅडमिरल आणि सेनापतींना “लक्ष्मण” ही पदवी दिली होती. यातूनच नंतरच्या मुस्लीम संस्कृतीवर असलेल्या रामायणाच्या कथांचा प्रभाव लक्षात येतो. परंपरेनुसार रामाने लक्ष्मणाची नियुक्ती सेनापती/ कमांडर-इन-चीफ म्हणून केली होती, याचेच अनुसरण सुलतान करताना दिसतात. यामुळेच या भागातील नेमकी रामकथा- रामायण कसे आहे हे जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.

kerala caste politics loksabha
मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित
Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..

अधिक वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!

‘हिकायत सेरीराम’

रामायण हे मलय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. मलेशियातील राम कथेची प्राचीन हस्तलिखिते ही १६ व्या शतकातील आहेत. रामायण हे मलय संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे, किंबहुना या भागात इस्लामचा प्रभाव वाढल्यानंतरही येथील जनसमूहाने राम नामाचा त्याग केला नाही. मलेशियात राम कथा विविध स्वरूपात अस्तित्त्वात आहे. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे ‘हिकायत सेरीराम’. तर इंडोनेशिया-जावा येथे रामायण हे काकवीन रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. ‘हिकायत सेरीराम’ म्हणजे राजा रामाची गोष्ट. मलेशियातील या रचनेचा कर्ता नेमका कोण आहे? या विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. इसवी सनाच्या १३ व्या ते १५ व्या शतकादरम्यान हे रामायण लिहिले गेल्याचे अभ्यासक मानतात. मलेशियातील रामायण हे अद्भूत, चमत्कारी घटनांचा समूहच आहे. या रामायणाचा मूळ स्रोत वाल्मिकी रामायण असले तरी ही कथा स्थानिक आख्यायिकांपासून प्रभावित झाल्याचे तज्ज्ञ सांगतात, म्हणून बऱ्याच अंशी ही कथा विस्मयकारी आहे.

कथेची सुरुवात रावणाचा जन्म

हिकायत सेरीराम या रामायणाची कथा रावण जन्मापासून सुरु होते, हे विशेष. या कथेनुसार किंद्रान नामक स्वर्गीच्या अप्सरांबरोबर व्यभिचार केल्यामुळे सिरानचक म्हणजेच हिरण्याक्षाला शिक्षा म्हणून दहा डोकी आणि वीस भुजांच्या रावणाच्या स्वरूपात जन्म घ्यावा लागला होता. तो चित्रवह यांचा पुत्र तसेच वोर्मराज म्हणजेच ब्रह्मराज यांचा नातू होता. चित्रवह यांना रावणाशिवाय कुंबकेर्न (कुंभकर्ण) आणि बिबुसनम (विभीषण) नावाचे दोन पुत्र आणि सुरपंडकी (शूर्पणखा) नावाची एक पुत्री होती. रावणाच्या राक्षसी स्वभामुळे त्याच्या वडिलांनी त्याला जहाजाने सरेन नावाच्या बेटावर पाठवून दिले होते. तेथे त्याने घोर तपश्चर्या केली. विशेष म्हणजे या कथेनुसार त्याच्या तपश्चर्येमुळे आदम/अ‍ॅडम नबी प्रसन्न झाला, आणि त्याने अल्लाहकडे रावणाला पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ यांचा राजा करण्याचा आग्रह केला होता. त्यानुसार रावण या तीनही लोकांचा राजा होतो. हिकायत सेरी रामा -द मलय रामायण या हॅरी एव्हलिंग यांच्या पुस्तकात दशरथ हा नबी आदमचा नातू होता असा मलय रामायणातील उल्लेख देण्यात आलेला आहे. राज्य स्थापनेनंतर रावणाचे तीन विवाह झाले, त्याची पहिली पत्नी स्वगलोकीची अप्सरा नीलोत्तमा होती, तर दुसरी पत्नी पृथ्वी आणि तिसरी गंगा होती. रावणाला नीलोत्तमा पासून तीन शिरांचा आणि सहा बाहुंचा एंदेरजात (इंद्रजित), पृथ्वी देवी पासून पाताल महारायन (महिरावण) आणि गंगा महादेवी पासून गंगमहासुर असे पुत्र झाले.

हिकायत सेरीराम मधील दशरथ आणि मंडुदेवी

मूळ वाल्मिकी रामायणाच्या विपरीत या कथेत राजा दशरथाचे रूप आढळते. या कथेनुसार राजा दशरथ यांना एक सुंदर नगर घडवायचे होते. त्यांनी एका डोंगराच्या अग्रस्थानी नगर बनविण्याची योजना केली होती. ते आणि त्यांचे मंत्रिमंडळ या कामात गुंतले होते, हे काम सुरु असताना त्यांना त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री आढळली, तिचे नाव मंडूदेवी होते. ते तिला घरी घेऊन आले आणि तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर राजाने आपली पहिली पटरानी बलियादारी हिला तिचा पुत्र त्यांच्या नंतर या राज्याचा स्वामी होईल असे वचन दिले. नवीन तयार करण्यात आलेल्या नगराचे नामकरण मदुरापुर/मंदूरापूर करण्यात आले. परंतु राजाला दोन्ही राण्यांपासून पुत्र सौख्य लाभले नाही. पुत्र प्राप्तीसाठी राजाने यज्ञ केला. यज्ञातून प्राप्त झालेल्या फलप्राप्तीला सहा भागात विभाजित करण्यात आले. त्यातील तीन भाग मंडूदेवी आणि तीन भाग बलियादारी यांच्यात विभाजित करण्यात आले. कथेनुसार बलियादारीच्या वाट्यातील एक भाग काक घेऊन जातो. तो कावळा रावणाचा नातेवाईक होता. हा भाग काक लंकापुरीला घेऊन जातो आणि तेथे रावण या भागाचे ग्रहण करतो. पुढे मंडूदेवी सेरीराम आणि लक्ष्मण नावाच्या पुत्रांना जन्म देते तर बालियादारी या बर्दान (भरत) आणि चित्रदान (शत्रुघ्न) यांना जन्म देतात. याशिवाय काक असे का करतो? यासाठी रंजक कथा देण्यात आलेल्या आहेत.

अधिक वाचा: विश्लेषण : रामानं नाही, लक्ष्मणानं केला रावणाचा वध – जैन रामायण

सीता नाही मंडूदेवी

वाल्मिकी रामायणाप्रमाणे या कथेत रावण सीतेचे अपहरण करत नाही. या कथेत मंडुदेवी प्रमुख भूमिका बजावते. रावणाला मंडूदेवी/मंदुदरीच्या सौंदर्याबद्दल समजते, त्यावेळेस तो ब्राह्मणाच्या वेषात मदुरापूरला पोहोचतो आणि दशरथाच्या राजवाड्याची सात कुलपे मंत्रोच्चारांनी उघडून आत जाऊन वीणा वाजवू लागतो. वीणेचा आवाज ऐकून दशरथ बाहेर येतात, रावण ब्राह्मणाच्या वेशात दशरथाला मंदुदरी देण्याची विनंती करतो. परंतु दशरथ सुरुवातीलाच त्याची विनंती धुडकावून लावतात,परंतु नंतर त्याला होकार देतात. मंदुदरीही आधी त्याच्यासोबत जाण्यास नकार देते, परंतु नंतर आपल्यासारखीच सुंदर स्त्री निर्माण करून तिला त्याच्याबरोबर धाडते. प्रतिरूप मंदुदरी किंवा मांडू-डाकी घेऊन रावण निघतो, वाटेत त्याला एक तपस्वी (कसुबारसा) भेटतात. तो त्या तपस्वीला विचारतो तू माणूस आहे की वानर?. हे ऐकून क्रोधीत विष्णुभक्त तपस्वी रावणाला शाप देतात, तुझा मृत्यू मनुष्य किंवा माकडामुळे होईल. त्यामुळे या कथेतील पात्र जरी वाल्मिकी रामायणाला साधर्म्य दर्शवत असली तरी कथेचे वळण मात्र भिन्न आहे.

रावण पुत्री सीता

रावण मोठ्या उत्साहात प्रतिरूपा मंदुदरी बरोबर विवाह करतो. काही दिवसातच त्याला एक कन्यारत्न प्राप्त होते, ही कन्या सुंदर असून तिच्या जन्मतःच बिबुसनम (विभीषण) तिची कुंडली पाहून भविष्य सांगतात, हिच्या पती कडून तिच्या पित्याचा मृत्यू अटळ आहे. हे जाणून रावण तिला एका लोखंडी पेटीत बंद करून समुद्रात फेकून देतो. ही लोखंडी पेटी वाहत द्वारवतीला जाते. त्याच वेळी महर्षी कली (जनक) समुद्रात स्नान करत असतात, ती पेटी त्यांच्या पायाला लागते. महर्षी कली या कन्येचे नाव सीतादेवी ठेवतात. आणि त्याच वेळी तिच्या विवाहासाठी पणही निश्चित करतात.

महर्षी कली रामाची परीक्षा कशी घेतात

आपल्या मानस कन्येच्या विवाहासाठी महर्षी कली मंदुरापूरला स्वतःहून जातात. राजा दशरथाला राम आणि लक्ष्मणाला देण्याची इच्छा व्यक्त करतात. राजा दशरथ राम आणि लक्ष्मणाऐवजी भरत आणि शत्रुघ्न यांना बरोबर घेण्यास सांगतात. त्यामुळेच महर्षीं भरत आणि शत्रुघ्न यांची परीक्षा घेतात. ते प्रश्न विचारतात द्वारवतीकडे जाण्यासाठी चार मार्ग आहेत. त्यांना तिथे कोणत्या मार्गाने जायला आवडेल? पहिला प्रवास सतरा दिवसांचा आहे. तो मार्ग अत्यंत धोकादायक आहे. त्या मार्गावर जगिनी नावाची राक्षसीं राहते जिला रावण देखील पराभूत करू शकला नाही. दुसऱ्या मार्गाला वीस दिवस लागतात. या मार्गावरून जाणाऱ्या व्यक्तीला अंगाई-गंगाई नावाचा गेंडा मारावा लागेल. तिसरा मार्ग पंचवीस दिवसांचा आहे. त्या वाटेवर सुरंगिणी नावाचा नाग राहतो. चौथा मार्ग चाळीस दिवसांचा आहे. त्यात कोणताही धोका नाही. दोन्ही भावांनी चौथा मार्ग निवडला. महर्षींना समजले की या दोघांमध्ये शौर्य आणि पराक्रमाचा अभाव आहे. त्यांनी पुन्हा राजाला विनंती केली की राम आणि लक्ष्मणाला आपल्यासोबत जाऊ द्या. राजाने होकार देताच ऋषींनी हाच प्रश्न रामाला विचारला असता राम पहिला मार्ग निवडतो. या कथेनुसार सीता स्वयंवराची कथाही रंजक आणि वेगळी आहे. रहस्य, भुलभुलैय्या अशा अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ‘हिकायत सेरी राम’ अशाच विस्मयकारी गोष्टींनी भारलेले आहे. हे वाल्मिकी परंपरेचे बर्‍याच प्रमाणात पालन करत असले तरी सीतेच्या वनवासाच्या आणि पुनर्मिलनाच्या कथेत एक विचित्रता आहे. येथे अग्नी परीक्षा नाही, तर सीतेचे पावित्र्य पशु पक्षांच्या कृतीतून सूचित होते. राम आणि सीता विलग झाल्यावर सर्व प्राणी आणि पक्षी नि:शब्द होतात तर त्यांच्या पुनर्मिलनानंतर प्राणी आणि पक्षी बोलू लागतात. या रचनेत अयोध्या नगरीही राम आणि सीतेच्या पुनर्मिलनानंतरच बांधली गेली आहे.

हिकायत सेरीराम हे वाल्मिकी रामायणाशी सख्य साधत असले तरी कथनात बरीच तफावत आहे. दशरथ अजूनही रामाचे वडील आहेत, जे मांडूदेवीशी लग्न करतात, येथे कौशल्येशी विवाह होत नाही, मंथरा-कैकेयी यांचे षडयंत्र नाही. मांडूदेवी ही महा विष्णूची मुलगी आहे. तर दुसरीकडे दशरथ नबी आदमच्या वंशातला आहे. हिकायत सेरीराममध्ये, हनुमान हा रामाचा मुलगा आहे.अभ्यासकांनुसार हिकायत सेरीरामची कथा संघदासाचे वासुदेवहिंदी, दशरथ जातक, अदभूत रामायणातून प्रेरित झालेले आहे.