scorecardresearch

विश्लेषण : डेविड अ‍ॅटनबरो माहितीपट, गॅरी लिनेकर यांच्यावरील कारवाईमुळे ‘बीबीसी’ पुन्हा चर्चेत, नेमकं प्रकरण काय?

बीबीसीने माजी फुटबॉलपटू आणि प्रसिद्ध होस्ट गॅरी लिनेकर यांना ‘मॅच ऑफ द डे’ हा शो होस्ट करण्यास मज्जाव केला आहे.

BBC
बीबीसी आणि गॅरी लेनिकर, (Photo: Wikimedia Commons)

काही दिवसांपूर्वी बीबीसीने गुजरात दंगल आणि या दंगलीविषयीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका यावर भाष्य करणारा माहितीपट प्रदर्शित केला होता. या माहितीपटामुळे देशभरात बीबीसीला विरोध करण्यात आला. मोदी समर्थकांनी तर भारतात बीबीसीवर बंद आणावी अशी मागणी केली होती. दरम्यान, बीबीसी पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चात आली आहे. बीबीसीने माजी फुटबॉलपटू आणि प्रसिद्ध होस्ट गॅरी लिनेकर यांना ‘मॅच ऑफ द डे’ हा शो होस्ट करण्यास मज्जाव केला आहे. यासह ब्रिटनमधील वन्यजीव, निसर्गाची हानी यावर भाष्य करणारा सर डेविड अ‍ॅटनबरो यांच्या माहितीपटाचा एक भाग प्रदर्शित न करण्याचाही निर्णय बीबीसीने घेतल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर गॅरी लिनेकर यांना शो होस्ट करण्यास मज्जाव का करण्यात आला? डेविड अ‍ॅटनबरो यांच्या माहितीपटाच्या एका भागाचे प्रदर्शन का करण्यात येणार नाही? तसेच हा सर्व प्रकार काय आहे? हे जाणून घेऊ या.

गॅरी लिनेकर यांना शो होस्ट करण्यापासून रोखलं

गॅरी लिनेकर हे इंग्लंडचे प्रसिद्ध माजी फुटबॉलपटू आहेत. त्यांनी १९७८ ते १९९४ या काळात आपली कारकीर्द गाजवलेली आहे. एकूण ८० सामन्यांत त्यांनी ४८ गोल केलेले आहेत. १९८६ सालातील फुटॉबाल विश्वचषकात त्यांना प्रतिष्ठेचा ‘गोल्डन बुट’ हा पुरस्कार मिळाला होता. सध्या लिनेकर फुटबॉल सामन्यांची माहिती देणारे सर्वोत्तम होस्ट मानले जातात. बीबीसीच्या मॅच ऑफ द डे या कार्यक्रमात ते पहिल्यांदा १९९९ दिसले होते. मॅच ऑफ द डे हा कार्यक्रम बीबीसीवर १९६० पासून दाखवला जातो आणि म्हणूनच हा कार्यक्रम ब्रिटन तसेच अन्य फुटबॉलप्रेमी देशांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?

करारानुसार २०२५ पर्यंत लिनेकरच होस्ट

या कार्यक्रमात लिनेकर अन्य दोन पाहुण्यांसोबत आठवड्यातील प्रमुख लीग आणि सामन्यांविषयी बोलत असतात. लिनेकर यांच्यामुळे मॅच ऑफ द डे या कार्यक्रमाला चांगलीच प्रसिद्धी मिळालेली आहे. २०२० साली बीबीसीने लिनेकर यांसोबत पाच वर्षांचा करार केला होता. या करारांतर्गत २०२५ या वर्षापर्यंत लिनेकर मॅच ऑफ द डे या कार्यक्रमाचे होस्ट असतील, असे ठरलेले आहे. मात्र लिनेकर यांना आता हा शो होस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे.

शो होस्ट करण्यास का मज्जाव करण्यात आला?

ब्रिटन सरकार ‘बेकायदेशीर स्थलांतर विधेयक’ आणणार आहे. या विधेयकासंदर्भात ब्रिटनच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमॅन यांनी एक ७८ सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ‘आता ब्रिटनमध्ये इतर देशांचे नागरिक बेकायदेशीररित्या घुसू शकणार नाहीत. तसे आढळले आले तर त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवले जाईल किंवा रवांडासारख्या सुरक्षित देशांत या निर्वासितांना पाठवे जाईल,’ असे सुएला म्हणत आहेत. सोबतच आता खूप झाले. आपण बेकायदेशीररित्या ब्रिटनमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांना थांबवले पाहिजे, असेही त्या म्हणत आहेत. याच व्हिडीओचा आधार घेते लिनेकर यांनी ऋषी सुनक यांच्या सरकारवर टीका केली आहे. ‘इतर देशांच्या तुलनेत आपण कमी निर्वासितांना आश्रय देतो. सरकार राबवू पाहत असलेले हे अत्यंत क्रूर धोरण आहे,’ असे लिनेकर म्हणाले. तसेच ३० च्या दशकात जर्मनीने जशी भाषा वापरली होती, अगदी तशीच भाषा वापरली जात आहे, असेही लिनेकर ट्वीटद्वारे म्हणाले.

हेही वाचा >>> विश्लेषण : संयुक्त राष्ट्रांच्या सागरी कराराचे महत्त्व काय? काही देशांचा कराराला विरोध कशासाठी?

राजकीय वादांपासून दूर राहावे; असे सांगितले आहे- बीबीसी

लिनेकर यांच्या याच टिप्पणीनंतर बीबीसीने त्यांनी मॅच ऑफ द डे या कार्यक्रमाला होस्ट करण्यास मज्जाव केला आहे. तसेच जोपर्यंत लिनेकर यांची समाजमाध्यमांचा वापर करण्यासंदर्भातील भूमिका काय आहे? हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना मॅच ऑफ द डे हा कार्यक्रम होस्ट करू नये, असे सांगितले आहे. तसेच आम्ही त्यांना राजकीय विवादांपासून दूर राहावे; असेही सूचवलेले आहे, असे स्पष्टीकरण बीबीसीने दिले आहे.

डेविड अ‍ॅटनबरो यांच्या माहितीपटाचा भाग प्रदर्शित न करण्याचा निर्णय

गॅरी लिनेकर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर बीबीसीने सर डेविड अ‍ॅटनबरो यांचे प्रकरणही चर्चेचा विषय ठरले आहे. अ‍ॅटनबरो भाग एक जीवशात्रज्ञ आहेत. १९५० सालापासून ब्रिटीश रेडिओ आणि टीव्हीवर त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे प्रसारण आणि प्रदर्शन होते. त्यांनी पृथ्वीवरील असलेली निसर्ग संपत्तीची माहिती देणारे ऐतिहासिक माहितीपट तयार केलेले आहेत. १९५२ सालापासून ते बीबीसीसाठी पूर्णवेळ काम करतात.

हेही वाचा >>> विश्लेषण: करोना महामारीला तीन वर्षे पूर्ण; आधुनिक भारतात पहिली महामारी कोणती होती, कधी झाली?

सत्ताधारी, उजव्या विचारांच्या माध्यमांकडून टीका होईल म्हणून भाग प्रदर्शित केला नाही?

डेविड अ‍ॅटनबरो यांनी अनेक वन्यजीव माहितीपटांची निर्मिती केलेली आहे. ते सध्या बीबीसीसोबत ‘वाईल्ड आईल्स’ या नव्या माहितीपटावर काम करत आहेत. या माहितीपटात ब्रिटनमधील वन्यजीवांवर भाष्य करण्यात आले असून तो बीबीसीवर अनेक भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र यातील एक भाग बीसीसीने प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतल्याचे, असे वृत्त ‘द गार्डियन’ने दिले आहे. या माहितीपटात वन्यजीवांच्या ऱ्हासाची काही कारणं दिलेली आहेत. या कारणांमुळे सत्ताधारी हुजूर पक्ष किंवा उजव्या विचारसरणीच्या माध्यमांकडून टीका केली जाईल, म्हणून बीबीसीने हा भाग न दाखवण्याचे ठरवले आहे, असा दावा द गार्डियनने केला आहे.

वन्यजीवांच्या ऱ्हासांवर ठळकपणे भाष्य

द गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार डेविड अ‍ॅटनबरो यांच्या माहितीपटाचे पाच भाग ‘बीबीसी वन’ या चॅनेलवर प्राईम टाईमला दाखवले जातील. या माहितीपटाचा सहावा भागदेखील चित्रित करण्यात आला आहे. मात्र या माहितीपटात वन्यजीवांच्या ऱ्हासांवर ठळकपणे भाष्य करण्यात आलेले आहे. परिणामी या भागामुळे सत्ताधारी पक्षाकडून टीका केली जाऊ शकते तसेच विरोध होऊ शकतो म्हणून बीबीसीने हा भाग प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असेही द गार्डियनमध्ये म्हणण्यात आले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: चीन, कोरियाच्या तुलनेत भारत मागे का? वाचा, स्वतंत्र भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेची कथा

माहितीपटात सहावा भाग नाहीच- बीबीसी

डेविड अ‍ॅटनबरो यांच्या माहितीपटाचा एक भाग न दाखवण्याचा निर्णय घेतल्यामुळे बीबीसीवर टीका केली जात आहे. मात्र बीबीसीने याबाबतचे सर्व आरोप फेटाळले आहेत. या माहितीपटात सहावा भाग नाहीच, असे बीबीसीने सांगितले आहे. तसेच डेविड अ‍ॅटनबरो यांच्या माहितीपटाच्या संदर्भातील एक वेगळा चित्रपट बीबीसीचे स्ट्रिमिंग पोर्टल ‘आय प्लेवर’ प्रसारित केला जाईल, असेही बीबीसीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : २४ व्या वर्षी राजकारणात, क्षी जिनपिंग यांचे निष्ठांवत म्हणून ओळख; चीनचे नवे पंतप्रधान ली कियांग नेमके कोण आहेत?

बीबीसीवर वेगवेगळ्या स्तरातून टीका

दरम्यान, या दोन प्रकरणांमुळे बीबीसीवर जगभरातून टीका होत आहे. लिनेकर यांना शो होस्ट करण्यास मज्जाव केल्यानंतर सोशल मीडियावर यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही खेळाडूंनी बीबीसीच्या मॅच ऑफ द डे या कार्यक्रमादरम्यान मुलाखत न देण्याची भूमिका घेतली आहे. तसेच प्रोफेशनल फुटबॉलर असोशिएशनने खेळाडूंच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. बीबीसीची ही भूमिका म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 17:29 IST
ताज्या बातम्या