Health Impact of Protein Powder जगातील पहिले शाकाहारी बॉडीबिल्डर म्हणून ओळखले जाणारे पंजाबी अभिनेता वरिंदर सिंग घुमन यांचे अमृतसर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते आपल्या बायसेप्सच्या दुखापतीवर एका किरकोळ शस्त्रक्रियेसाठी अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात गेले होते. ही एक लहान शस्त्रक्रिया असल्यामुळे, ते त्याच दिवशी परतणार होते. परंतु, घुमन यांना हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आला आणि त्यांचे निधन झाले. प्राप्त माहितीनुसार त्यांचे वय ४२ होते.

‘द टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, घुमन जगातील पहिले शाकाहारी बॉडीबिल्डर होते. गेल्या काही वर्षांत जिम करणाऱ्या तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी प्रोटीन पावडर आणि वजन कमी करण्याच्या औषधांचाही आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दावे केले जात आहेत. त्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात? प्रोटीन पावडर घेणे सुरक्षित आहे का? जाणून घेऊयात.

प्रोटीन पावडर आणि वजन कमी करण्याच्या औषधांचाही आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दावे केले जात आहेत. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)

आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात?

  • साकेत येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये इंटरनल मेडिसिन विभागाचे संचालक डॉक्टर रोमेल टिकू यांचा याविषयी ‘द इंडियन एक्सप्रेस’मध्ये एक लेख आहे. त्यांनी याबाबत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
  • व्यायामशाळेत किंवा वर्कआउट्सदरम्यान मृत्यूच्या घटना वाढल्यामुळे, प्रोटीन पावडर आणि वजन कमी करणाऱ्या औषधामुळे (fat-burning supplements) अशा प्रकारचे हृदयविकार किंवा मज्जातंतूंचे आजार होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
  • परंतु, संबंधित व्यक्तींना आरोग्याशी संबंधित समस्या असल्याशिवाय यापैकी कोणतीही गंभीर घटना घडत नाही, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे.
  • संबंधित व्यक्तीच्या हृदयाची गती अनियमित असू शकते, त्यांना उच्च रक्तदाब असू शकतो, त्यांनी पुरेशी विश्रांती किंवा झोप घेतली नसेल आणि त्यांच्या आरोग्य प्रणालीवर अधिक ताण आला असेल, त्यांना किडनीचा त्रास असेल किंवा ते धूम्रपान आणि मद्यपान करत असतील, तर याही गोष्टी हृदयविकाराचा झटका येण्यास कारणीभूत ठरू शकतात.
  • एखाद्या निरोगी प्रौढ व्यक्तीच्या आहारात मांस, मासे, ताजी फळे, भाजीपाला आणि फायबरचा समावेश असला तर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे पूरक घटक किंवा पावडरची गरज नसते, असे तज्ज्ञ सांगतात.

प्रोटीन पावडरचे सेवन योग्य की अयोग्य?

आजकाल अनेक तरुणांना सुडौल शरीर आणि मजबूत बांधा हवा असतो. चांगल्या आहारानेसुद्धा हाडे मजबूत होऊ शकतात आणि शरीराच्या कार्यांना अधिक ऊर्जा मिळू शकते. परंतु, जर तुम्हाला बॉडी बिल्डर व्हायचे असेल आणि प्रोटीन पावडर वापरायची असेल तर ती केवळ वैद्यकीय सल्ल्यानेच वापरली जावी, असे तज्ज्ञ सांगतात. मुख्य म्हणजे, प्रोटीन पूरक घटकांच्या दुष्परिणामांवर कोणताही संशोधन डेटा उपलब्ध नसल्यामुळे, उत्पादकांना जे वाटते ते पॅकेजिंग करण्याची मुभा मिळते. उत्पादक काहीही दावा करत असले तरी प्रोटीन पावडरच्या प्रत्येक बाटलीत नेमके काय आहे, हे आपल्याला निश्चितपणे माहीत नसते.

चवीसाठी ते त्यात साखर, कृत्रिम फ्लेव्हर, कॅलरी हे सर्व टाकू शकतात. पावडर हे प्रोटीनचे केंद्रित स्वरूप (concentrated protein) असल्याने तुम्ही नकळतपणे पाण्याच्या किंवा दुधाच्या ग्लासमध्ये चमचे भरून पावडर टाकू शकता आणि तुमच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरी मिळवू शकता, त्यामुळे वजन वाढण्यासह रक्तातील साखरेचे प्रमाण अनावश्यकपणे वाढू शकते.

पण, यातील सर्वात त्रासदायक घटक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. अनेक प्रोटीन पावडर, विशेषत: ज्यांना हर्बल, आयुर्वेदिक आणि सुरक्षित म्हणून लेबल केलेले आहे, त्यामध्ये जड धातू, शिसे, आर्सेनिक, कॅडमियम किंवा पारा, कीटकनाशके, कर्करोग आणि इतर आरोग्य समस्यांशी जोडलेले इतर दूषित पदार्थ असू शकतात. अमेरिकेत यापैकी काही पावडरचे मूल्यांकन करण्यात आले आणि त्यामध्ये लक्षणीय प्रमाणात विषारी घटक आढळले.

आपल्याकडील दुकानांमध्ये असलेल्या अनेक पावडर वैद्यकीयदृष्ट्या तयार केलेल्या किंवा प्रमाणित नसतात, त्यामुळे याचा धोका कायम असतो. तज्ज्ञ सांगतात, जर तुमच्या आहारात पुरेशा प्रोटीनचा अभाव असेल आणि तुम्हाला प्रोटीन पावडर घेण्याची खरंच गरज असेल, तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. त्याचा डोस दिवसातून एकदा किंवा दोनदा एका चमच्यापेक्षा (१० ते २० ग्रॅम) अधिक नसावा, असेही तज्ज्ञ सांगतात.

वजन कमी करणारे औषध धोकादायक आहेत का?

आजकाल अनेक तरुण वजन कमी करणाऱ्या (Fat-burning supplements) औषधांकडे वळत आहेत. वजन त्वरित कमी करण्यासाठी ही जादुई गोळी असते असे त्यांना वाटते. याच्या सेवनाने तुमचे वजन कमी होऊ शकते, हे सिद्ध करणारे कोणतेही संशोधन नाही असे तज्ज्ञ सांगतात. आरोग्यतज्ज्ञ प्रोटीन पावडरप्रमाणेच त्यांच्या घटकांबद्दल चिंता वर्तवतात. त्यामध्ये अनेकदा दूषित पदार्थ, क्रोमियमसारखे धातू आणि लिव्हरला (यकृताला) नुकसान पोहोचवणारे ‘यूसनिक ॲसिड’सारखे घटक असू शकतात.

या प्रोटीन पावडरमध्ये असे संयुगे असू शकतात, जे तुमची भूक नियंत्रित करण्यासाठी तुमच्या मेंदूला उत्तेजित करतात, परंतु त्यांचा तुमच्या रक्तदाबावर विपरित परिणाम होऊ शकतो. वजन कमी करण्याचा दावा करणाऱ्या या औषधांमुळे तुमचे हृदय, फुफ्फुसे आणि मूत्रपिंड यांसारख्या महत्वाच्या अवयवांवर ताण येऊ शकतो. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय किंवा स्वतःची वैद्यकीय स्थिती जाणून घेतल्याशिवाय त्यांचा कधीही वापर करू नका, असाही इशारा तज्ज्ञ देतात; कारण हृदयविकाराच्या झटक्यासारख्या धोक्यांसाठी कोणतीही एक गोष्ट कारणीभूत ठरत नाही, या गोष्टी एकत्रितपणे शरीरावर परिणाम करू शकतात.