– प्रशांत केणी

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला मुलाखतीसाठी वारंवार धमकावल्याप्रकरणी क्रीडा पत्रकार, लेखक, संवादक बोरिया मजुमदार हे दोषी आढळले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. त्यामुळे मजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे, नेमके काय आहे, हे प्रकरण समजून घेऊया.

हे प्रकरण कसे प्रकाशात आले?

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साहाला भारतीय संघातून वगळल्यानंतर १९ फेब्रुवारीला त्याने केलेल्या एका ‘ट्वीट’मुळे हे प्रकरण प्रकाशात आले. त्याने ‘ट्विटर’वर मजुमदार यांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट पोस्ट करतानाच म्हटले की, ‘‘भारतीय क्रिकेटमधील माझ्या एकंदर योगदानानंतर… मला एका तथाकथित ‘आदरणीय’ पत्रकाराकडून या गोष्टीचा सामना करावा लागतो. पत्रकारिता आता या मार्गाने जात आहे!’’ मजुमदार यांनी यात म्हटले होते की, ‘‘तू मला कॉल केला नाहीस. यापुढे मी कधीही तुझी मुलाखत घेणार नाही. हा मी माझा अपमान समजतो आणि हे मी सदैव स्मरणात ठेवेन. तुला कधीच माफ करणार नाही!’’

साहाच्या ‘ट्वीट’नंतर समाजमाध्यमांवर कसे पडसाद उमटले?

साहाच्या ‘ट्वीट’नंतर समाजमाध्यमांवर त्याला अनेकांनी सहानुभूतीदर्शक पाठिंबा दिला. सर्वप्रथम माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने म्हटले की, ‘‘अत्यंत दुःखद. हा आदरणीय नाही, ना पत्रकार, फक्त चमचेगिरी.’’ भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही टीका करताना म्हटले की, ‘‘पत्रकाराकडून खेळाडूला धमकावले जाणे हे धक्कादायक आहे. परिस्थितीचा फायदा घेऊन असे वारंवार घडते आहे. ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. ही व्यक्ती कोण आहे याचा शोधायला हवा. उत्तम खेळाडू असलेल्या साहाने मांडलेले हे प्रकरण गंभीर आहे.’’ याचप्रमाणे वृद्धी तू त्याचे नाव सांग. क्रिकेटक्षेत्रातून त्याच्यावर बहिष्कार घालू, असे माजी क्रिकेटपटू प्रग्यान ओझाने सांगितले. माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनेही या प्रकरणी साहाला नाव जाहीर करण्याचे आवाहन केले.

कोण हे बोरिया मजुमदार?

बोरिया मजुमदार हे प्रामुख्याने क्रिकेट लेखक, इतिहासकार आणि संवादक आहेत. अनेक आघाडीच्या आजी-माजी क्रिकेटपटूंशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. सौरव गांगुली आणि जगमोहन दालमिया यांच्या अमदानीत त्यांचा उदय झाला. बंगाली आणि इंग्रजीमध्ये क्रिकेटवर आधारित कार्यक्रम, पुस्तके त्यांनी निर्मिलेली आहेत.

या वादात ‘बीसीसीआय’ने कोणती भूमिका घेतली?

साहा प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘बीसीसीआय’ने उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ आणि कार्यकारिणी सदस्य प्रभतेज सिंग भाटिया यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीसमोर साक्ष देताना साहाने त्याला मजुमदार यांनी पाठवलेले सर्व मेसेजेस सादर केले.

मग मजुमदार यांनी काय केले?

५ मार्चला साहाने ‘बीसीसीआय’ संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर त्याच रात्री मजुमदार यांनी स्पष्टीकरण देताना एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली. ज्यात त्यांनी साहाने स्क्रीनशॉटमध्ये फेरफार केल्याचा दावा केला आहे. साहाला धमकी दिलीच नसल्याचे सांगत त्याच्यावर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचेही मजुमदार यांनी जाहीर केले.

बंदी किती वर्षांची असेल आणि तिचे स्वरूप कशा प्रकारचे असेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बीसीसीआय’कडून मजुमदार यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. ‘बीसीसीआय’शी संलग्न असलेल्या सर्व राज्य संघटनांच्या अखत्यारितील स्टेडियममध्ये मजुमदार यांना प्रवेश निषिद्ध असेल. देशभरात होणाऱ्या कोणत्याही सामन्यांसाठी त्याला माध्यम अधिस्वीकृतीपत्र (media accreditation) ‘बीसीसीआय’कडून दिले जाणार नाही. याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कळवून मजुमदार यांना काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. याच प्रमाणे खेळाडूंना त्यांच्याशी संबंध न ठेवण्याचे निर्देश दिले जातील.