Breast Cancer जगभरात दरवर्षी ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनाच्या कर्करोग) रुग्णांची संख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, हा असा आजार आहे, ज्यात स्तनातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि गाठी तयार करतात. वेळेत उपचार न केल्यास हा आजार शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतो आणि जीवघेणा धोकाही निर्माण करू शकतो. २०२२ मध्ये जगभरात सुमारे ६.७ लाख महिलांचा मृत्यू स्तनाच्या कर्करोगामुळे झाला. भारतातही या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. NCDIR-India (2024) नुसार, भारतात प्रत्येक २८ महिलांपैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका आहे.
परंतु, स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळता येतो, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे. व्यायाम हा निरोगी राहण्याचा मंत्र आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आजकाल तरुण पिढी फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीसाठी जिम वर्कआउट्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे वळत आहे. हे स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी फायद्याचे ठरू शकते, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. याबाबत दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटल्समधील अपोलो एथेना महिला कर्करोग केंद्राच्या वरिष्ठ सल्लागार, ब्रेस्ट सर्जिकल ऑन्कोलॉजी व ऑन्कोप्लास्टिक सर्जरी प्रमुख डॉक्टर गीता कडायप्रथ यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय? त्यामुळे स्तनाचा कर्करोग कसा टाळता येऊ शकतो? तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊयात…

संशोधनातून काय समोर आले?
संशोधनातून (Observational research) असे दिसून येते की, ज्या महिला आपल्या जीवनशैलीत व्यायाम, शारीरिक हालचाल (स्ट्रेंथ ट्रेनिंग) समाविष्ट करतात, त्यांना स्तन कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. काही वेळा इतर महिलांच्या तुलनेत व्यायाम करणाऱ्या महिलांना २५ ते ५२ टक्के कमी धोका असतो. तरुण असतानाच व्यायाम सुरू केल्यास धोका आणखी कमी होतो. व्यायामाचा परिणाम संप्रेरके (होर्मोन), रोगप्रतिकार कार्य, चयापचय व शारीरिक रचनेवर होतो. सोप्या भाषेत स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे स्वतःची ताकद वाढवणे, जे व्यायामामुळे शक्य होऊ शकते.
स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे कॅन्सरचा धोका कसा टाळता येतो?
- संप्रेरक नियंत्रण : स्ट्रेंथ ट्रेनिंग इस्ट्रोजेन व इन्सुलिन या दोन संप्रेरकांचे नियमन करण्यास मदत करते. या दोन गोष्टी स्तन कर्करोगाशी संबंधित आहेत. रजोनिवृत्तीनंतर (मेनोपॉज) चरबीयुक्त टिश्यू हे इस्ट्रोजेनचे मुख्य उत्पादक असते. स्ट्रेंथ ट्रेनिंगद्वारे स्नायू बळकट करून आणि चरबी कमी करून, विशिष्ट प्रकारच्या ट्यूमरला प्रोत्साहन देऊ शकणारे इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी केले जाते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आणि मायोकाइन रिलीज : स्ट्रेंथ ट्रेनिंगदरम्यान स्नायूंच्या आकुंचनातून विशिष्ट प्रथिने रक्ताभिसरणामध्ये सोडली जातात, ज्यांना मायोकाइन्स म्हणतात. हे मायोकाइन्स (जसे की decorin, IL-6, SPARC व OSM) स्तन कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवू शकते आणि रोगाच्या पुनरावृत्तीचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
- दाहविरोधी परिणाम (Anti-inflammatory Effects): दाह हा स्तन कर्करोगासह अनेक कर्करोगांसाठी धोक्याचा मानला जातो. स्ट्रेंथ ट्रेनिंग CRP (C-reactive protein) त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होण्याची आणि कर्करोगमुक्त व्यक्तींसाठी उपचारांच्या परिणामांत सुधारणा होण्याची शक्यता वाढते.
- वजन नियंत्रण : स्तन कर्करोग टाळण्यासाठी विशेषत: रजोनिवृत्तीनंतर वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू बळकट होतात, चयापचय दर वाढतो आणि वजन राखणे किंवा कमी करणे सोपे होते.
- इन्सुलिन नियंत्रण : हायपर इन्सुलिनेमिया आणि इन्सुलिन यांचा संबंध वाढलेल्या स्तन कर्करोगाच्या धोक्याशी आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे धोका आणखी कमी होतो.
अभ्यासामध्ये याविषयी काय आढळले?
अलीकडील क्लिनिकल आणि प्रयोगशाळेतील अभ्यासांनी याविषयी अनेक पुरावे सादर केले आहेत. २०२५ च्या एका अभ्यासात असे आढळले की, स्तन कर्करोगातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे कर्करोगविरोधी मायोकाइन्सचा स्राव वाढला आणि प्रयोगशाळेत स्तन कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी झाली, ज्यामुळे पुनरावृत्तीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता दिसून येते.
अनेक मोठ्या अभ्यासांच्या मेटा-विश्लेषणातून असे सूचित होते की, ज्या महिलांचे स्नायू बळकट आहेत आणि हृदयाचे कार्य चांगले आहे, त्यांच्यात स्तन कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे किंवा पुन्हा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी झालेला आहे. दुसऱ्या एका क्लिनिकल चाचणीत असे आढळून आले की, स्तन कर्करोगाचे निदान झाल्यानंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा धोका कमी झाला.
कर्करोगमुक्त व्यक्तींसाठी याचे फायदे काय?
ज्या महिलांना आधीच स्तन कर्करोगाचे निदान झाले आहे, त्यांच्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग अधिक फायद्याची ठरते. त्यामुळे जीवनाची गुणवत्ता सुधारते, लिम्फेडेमा (हातावरची सूज)सारख्या उपचाराचे दुष्परिणाम कमी करते आणि कर्करोगाच्या उपचारांमुळे होणारी हाडांची घनता कमी होण्याची समस्या दूर करण्यास मदत करते, हे सिद्ध झाले आहे. योग्य प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास, त्याचे दुष्परिणाम क्वचितच होतात.
स्ट्रेंथ ट्रेनिंग कसे करावे?
स्ट्रेंथ ट्रेनिंग कोणत्याही वयात सुरू केले जाऊ शकते आणि त्यासाठी जिमची आवश्यकता नसते. शरीराचे वजन, रेझिस्टन्स बँड किंवा लहान वजने वापरून केलेले व्यायाम प्रभावी ठरतात. ज्यांना स्तन कर्करोगाचे निदान झाले आहे किंवा ते त्यातून बरे झाले आहेत, त्यांनी सुरक्षिततेसाठी फिजिओथेरपिस्ट किंवा प्रशिक्षित फिटनेस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाची सुरुवात करण्याची शिफारस केली जाते. निरोगी जीवनशैलीसाठी आठवड्यातून किमान दोन वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास स्तन कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.