स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे शिकवणी वर्ग या काही हजार कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगातील स्पर्धेतून विद्यार्थी-पालकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या जात आहेत. ‘सीसीपीए’ने अशा वर्गांवर कारवाई करण्याबरोबरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याविषयी…

शिकवणी वर्ग कशा प्रकारच्या जाहिराती करत आहेत?

अभियांत्रिकी आणि वैद्याकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे मार्गदर्शन करणारे, तसेच प्रशासकीय सेवांतील नोकरभरतीसाठीच्या यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे अनेक शिकवणी वर्ग देशभरातील अनेक शहरांत पसरले आहेत. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या करिअरसाठी अनेक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. पण, तयारी करणारे विद्यार्थी आणि प्रत्यक्ष उपलब्ध जागा यांत खूप अंतर आहे. उदाहरणार्थ, ‘यूपीएससी’साठी काही लाख विद्यार्थी तयारी करतात, पण प्रत्यक्षात जागा उपलब्ध असतात जेमतेम काही हजार. अशीच स्थिती ‘आयआयटी’ किंवा ‘एम्स’सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांतील प्रवेशांतील स्पर्धेची असते. साहजिकच कोणत्या शिकवणी वर्गातील तयारीने हमखास यश मिळेल, याच्या शोधात पालक-विद्यार्थी असतात. त्यांना या ‘हमखास यशा’चे गाजर दाखविणाऱ्या जाहिराती शिकवणी वर्ग करत आहेत. त्यात आमचे अमुक इतके विद्यार्थी यशस्वी झाले, याची आकडेवारी, त्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे, त्यांचा अनुभव याचा वापर जाहिरातीत केला जातो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >>> विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?

जाहिराती फसव्या आहेत, हे कसे लक्षात आले?

दिल्लीतील यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या एका शिकवणी वर्गाला मध्यंतरी ‘सीसीपीए’ने (सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अॅथॉरिटी- केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण) दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्याबद्दल तीन लाख रुपयांचा दंड केला. ‘यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२’मध्ये २०० हून अधिक जणांची निवड आणि यूपीएससी/आयएस तयारीसाठीचा भारतातील प्रथम क्रमांकाचा शिकवणी वर्ग, असे दोन दावे या शिकवणी वर्गाने जाहिरातीत केले होते, जे खोटे ठरले. ‘सीसीपीए’ने जाहिरातींबाबत केलेल्या विश्लेषणानुसार, ‘यूपीएससी’ने २०२२ च्या नागरी सेवा परीक्षेतून ९९३ उमेदवारांची शिफारस केली होती. पण, ११ शिकवणी वर्गांनी मिळून ३,६३६ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची जाहिरात केली होती, तर २०२३ च्या याच परीक्षेतून १०१६ उमेदवारांची शिफारस केलेली असूनही नऊ शिकवणी वर्गांनी मिळून त्यांच्या ३,६३६ विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे दावे जाहिरातींत केले होते. काही विद्यार्थ्यांची छायाचित्रे सगळ्याच शिकवणी वर्गांनी आपल्या जाहिरातींत वापरली होती. विद्यार्थी एकाच शिकवणी वर्गाला जाण्याऐवजी वेगवेगळ्या शिकवणी वर्गांच्या वेगवेगळ्या सत्रांसाठी प्रवेश घेतात. मात्र, शिकवणी वर्ग तसा उल्लेख न करता सरसकट, या विद्यार्थ्यांना यश आमच्या शिकवणी वर्गामुळे मिळाले, अशा जाहिराती करतात, असे आढळून आले. त्यावरून ‘सीसीपीए’ने १८ शिकवणी वर्गांना मिळून ५४.६ लाख रुपये इतका दंड ठोठावला. या पार्श्वभूमीवर, खोटे दावे टाळण्यासाठी आणि विद्यार्थी-पालकांपर्यंत नेमकी माहिती पोहोचविण्यासाठी ‘सीसीपीए’ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

हेही वाचा >>> हिंदू महिलेला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी; कोण आहेत तुलसी गबार्ड?

मार्गदर्शक सूचनांमध्ये काय आहे?

१) हमखास निवड होईल किंवा अमुक परीक्षेत नक्की यश मिळेल, अशी हमी देणाऱ्या जाहिराती करण्यास मनाई.

२) शिकवणी वर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांची जाहिरात करताना त्याला मिळालेला गुणानुक्रम, त्याने कोणत्या सत्राला प्रवेश घेतला आणि ते सत्र सशुल्क होते का, हे स्पष्ट नमूद करावे.

३) शिकवणी वर्गात मिळणाऱ्या सेवा, सोयी, साधने आणि पायाभूत सुविधांचा स्पष्ट उल्लेख करावा.

४) यशस्वी विद्यार्थी अल्पवयीन असेल, तर त्याचे छायाचित्र आणि अनुभव जाहिरातीत वापरण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक.

५) यशस्वी उमेदवार अशा जाहिरातीसाठी पैसे घेणार असेल, तर सरकारी नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी त्याने घेतली पाहिजे.

६) ५० किंवा त्याहून अधिक विद्यार्थी असलेल्या शिकवणी वर्गांना हे नियम लागू असतील.

मार्गदर्शक सूचना का आवश्यक होत्या?

स्पर्धा परीक्षांत यश मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थी सध्या प्रचंड दबावाखाली आहेत. त्याला शिकवणी वर्गांतील अंतर्गत स्पर्धाही कारणीभूत आहे. या दबावापोटी कोटासारख्या शहरात विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचेही मध्यंतरी समोर आले होते. अशा वेळी जाहिरातींना भुलून अमुक एका शिकवणी वर्गात भरमसाट पैसे भरून प्रवेश घेतला आणि यश मिळाले नाही, तर त्याचे खापर विद्यार्थ्याच्या तयारीवर फुटते. हे होऊ नये, यासाठीचे एक पाऊल म्हणून या मार्गदर्शक सूचना उपयुक्त ठरतील.

siddharth.kelkar@expressindia.com

Story img Loader