टीम लोकसत्ता
राज्यात मोसमी पावसाने मोठी ओढ दिली आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप पिके करपू लागली आहेत. अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पावसाअभावी राज्यात निर्माण झालेल्या सद्यस्थिती विषयी…
राज्यात मोसमी पावसाची स्थिती काय?
राज्यात एक जून ते २६ ऑगस्ट या काळात सरासरी ७७२.४ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात ७०९.५ मिमी म्हणजे सरासरीपेक्षा आठ टक्के कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २१ टक्के कमी, मराठवाड्यात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी, विदर्भात सरासरीपेक्षा ९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नगरमध्ये ३४ टक्के, धुळ्यात २३ टक्के, जळगावात १४ टक्के, कोल्हापुरात १४ टक्के, नंदुरबारमध्ये २१ टक्के, नाशिकमध्ये ९ टक्के, पुण्यात १७ टक्के, सांगलीत ४५ टक्के, साताऱ्यात ३६ टक्के आणि सोलापुरात २७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड वगळता सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. औरंगाबादमध्ये ३३ टक्के, बीडमध्ये ३२ टक्के, हिंगोलीत ३४ टक्के, जालन्यात ४८ टक्के, लातूर ८ टक्के, उस्मानाबाद २३ टक्के आणि परभणीत २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात अकोल्यात ३० टक्के, अमरावतीत ३३ टक्के, बुलढाण्यात २२ टक्के, चंद्रपुरात ४ टक्के, गोंदियात १७ टक्के, नागपुरात ६ टक्के, वर्ध्यात १० टक्के आणि वाशिम १७ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
दमदार पाऊस पडणाऱ्या कोकणातील स्थिती काय?
धुवाधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकण किनारपट्टीवरही जेमतेमच पाऊस झाला आहे. मुंबई शहरात या काळात सरासरी १६७५.२ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात सरासरीपेक्षा पाच टक्के कमी १५९९.४ मिमी पाऊस झाला आहे. रत्नागिरीत सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी २६६२.५ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात २५१२.७ मिमी पाऊस झाला आहे. किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जेमतेम पावसाचा परिणाम भात शेतीवर दिसून येत आहे. भाताला फुटवे येण्याच्या वेळीच पावसाने ओढ दिल्यामुळे उत्पादन घटू शकते. वेळेवर म्हणजे जूनमध्ये फारसा पाऊस न पडल्यामुळे भात लावण्यांना सुमारे दोन आठवडे विलंब झाला. ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाल्याने करपा, पाने गुंडाळणाऱ्या अळीसारख्या किडीची प्रार्दुभाव झाला आहे. उशिराने लावणी झालेल्या खाचरातील भात रोपे पाण्याअभावी पिवळी पडली आहेत. भात पिकाला सध्या दमदार पावसाची गरज आहे. सध्या हळव्या भाताच्या रोपांना फुलोरा येत आहे. पाऊस आणखी लांबल्यास मोठा फटका बसू शकतो.
मराठवाड्यात दुष्काळसदृश स्थिती?
पावसाअभावी मराठवाड्यातील टंचाईची स्थिती गंभीर बनत चालली आहे. नांदेड आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, लातूर, परभणीय या सहा जिल्ह्यांत पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. विविध सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी ३५.६९ टक्के पाणीसाठा आहे. ८० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी वाढत असल्यामुळे, दिवसागणिक टँकरची संख्या वाढतच आहे. पावसाअभावी पिके करपू लागली आहेत. मराठवाड्यात सरासरी ४७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची सर्वाधिक लागवड २५ लाख ३७ हजार २३१ हेक्टरवर झाली आहे. सोयाबीन फुलोऱ्यात आले आहे, पीक करपू लागले आहे. पावसाअभावी किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कापसाची स्थितीही गंभीर बनली आहे. ज्वारीची वाढ खुंटली आहे. मका, मूग, उडीद पिके हाती येण्याची शक्यता कमी आहे. भविष्यात भीषण चारा टंचाईची शक्यता आहे. सिंचनासाठी कालव्यांना आवर्तने सोडण्यासाठी धरणांत पाणीही नाही. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्येसारख्ये संकट उग्र होण्याची भीती आहे.
विदर्भात धरणसाठा चिंताजनक अवस्थेत?
जुलैच्या अखेरीस अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या विदर्भात ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीन, कपाशीची पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. सध्या सोयाबीन फुलोऱ्यात आहे. कापूस बोंडे लागण्याच्या, तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पण, पावसाअभावी किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. भात पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. इतर पिके, फळबागांना पावसाची गरज आहे. सिंचनासाठी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. विदर्भात नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात जलसाठ्याची स्थिती बिकट आहे. अमरावती विभागातील दहा मोठ्या धरणांत मागच्या वर्षी २७ ऑगस्टला ८८.५७ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ६९.४४ टक्के म्हणजे १९ टक्के कमी पाणी आहे. नागपूर विभागातील १६ मोठ्या धरणात २७ ऑगस्ट २०२२ रोजी ८१.९९ टक्के पाणीसाठा होता, यंदा तो ७७.३६ टक्के म्हणजे १२ टक्के कमी पाणी आहे. त्यामुळे सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. कोरडवाहू शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात पिके होरपळली?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शेतकरी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ६६ गावे, ३८ वाड्या अशा एकूण १०४ ठिकाणी ५८ टँकरद्वारे पिण्याचे पाणी द्यावे लागत आहे. काही भागांत खरीप पेरण्या वाया गेल्या आहेत. धरण प्रकल्पांमध्ये केवळ ४२.५३ टक्के जलसाठा आहे. शेतशिवारात सर्वत्र केवळ पिकांची होरपळ झालेली दिसून येत आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पेरण्या १०० टक्के झाल्या असल्या तरीही पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास पिके हाती न लागण्याची चिन्हे दिसत आहेत. जळगावात १३ गावांना १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, जळगाव, चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव तालुक्यांमध्ये खरीप पेरण्या वाया गेल्या आहेत. धुळ्यात प्रशासन सुधारित टंचाई आराखडा तयार करीत आहे. जिल्ह्यातील १२ मध्यम प्रकल्पात ४६.०६ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये टंचाई आहे. चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही होऊ लागली आहे.
पश्चिम महाराष्ट्राचीही होरपळ, फळपिके अडचणीत?
लांबलेल्या पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्रालाही बसला आहे. सर्वत्र टंचाईची स्थिती आहे. पाणीदार कोल्हापूर जिल्ह्यातही टंचाईची स्थिती आहे. पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. भात, सोयाबीन, भाजीपाला या पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके वाळत असल्याचे दिसत आहे. सिंचनाची सोय असलेल्या भागात पिके जिवंत आहेत. चारा उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. सांगलीत विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांच्या चाऱ्या-पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यासमोर भीषण दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. वाळवा, शिराळा वगळता अन्य तालुक्यांत केवळ सरासरी दहा टक्केच पाणीसाठा आहे. २९ गावांना पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हलक्या, मुरमाड जमिनीतील पिकांनी माना टाकल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पिके चांगली आहेत. मात्र, माणदेश, पर्जन्यछायेच्या प्रदेशात अपेक्षित पाऊस झाला नाही. सोलापूरवर दुष्काळाची गडद छाया दिसत आहे. मागील २८ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. खरीप पिके धोक्यात आहेत. चारा, पाण्याच्या टंचाईची भीती आहे. जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात केवळ १३ टक्के उपयुक्त पाणीसाठा (७ टीएमसी) आहे. नगर जिल्ह्यात टंचाईची स्थिती आहे. पिके करपू लागली आहेत. चारापाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. महिनाभर पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. साठ टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे जिल्ह्याचे घाट क्षेत्र वगळता अन्यत्र दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. घाट परिसरातही भाताला अपेक्षित पाऊस झालेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात ऊस, द्राक्षे, डाळिंब, बोर, सीताफळ, अंजीरसारखी फळपिके घेतली जातात. खरिपासोबत फळबागाही अडचणीत आल्या आहेत.
सांगली, जालन्यात दुष्काळजन्य स्थिती?
राज्यात सरासरीपेक्षा सर्वात कमी पावसाची नोंद सांगली आणि जालना जिल्ह्यात झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यांत दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. सांगलीत सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी ३३७.३ मिमी पाऊस होतो, प्रत्यक्षात १८५ मिमी पाऊस झाला आहे. जालन्यात सरासरीपेक्षा ४८ टक्के कमी पाऊस झाला आहे. ४२२ मिमी सरासरी पाऊस पडतो, प्रत्यक्षात २१९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पिके जळून गेली आहेत. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, विटा तालुक्यांतील हलक्या जमिनीतील पिके वाया गेली आहेत. जालन्यातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. सोयाबीन, कापूस, तुरीच्या पिकाची वाढ खुंटली आहे. मोसंबीच्या बागांना फटका बसत आहे. जिल्ह्यातील धरणात जेमतेम दहा टक्के पाणीसाठी आहे. पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविण्याची मागणी होत आहे. २५ गावे, १८ वाड्यांना ३९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चारा टंचाई, पाणी टंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे.
loksatta@expressindia.com