Twitter followers Drop : ट्विटर नुकतेच टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले आहे. मात्र, हा करार पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. इलॉन मस्क यांनी ट्विटरबाबत स्पष्ट केले आहे की, त्यांना त्यातून बॉट्स किंवा स्पॅम खाती काढून टाकायची आहेत. पण, आता एका नवीन अहवालानुसार, ट्विटरवर हाय प्रोफाइल अकाउंटचे हजारो फॉलोअर्स कमी होऊ लागले आहेत.
ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी एक ट्विट करुन आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. मुक्तपणे बोलणं, व्यक्त होणं हा लोकशाहीचा कणा आहे. ट्विटर हे असं डिजीटल माध्यम आहे ज्यावर भविष्यात मानवी जीवनावर परिणाम करु शकणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा होतात, असं मस्क यांनी म्हटले. “मला ट्विटरमध्ये आणखी नवीन फिचर्स आणायचे आहेत. लोकांचा या माध्यमावरील विश्वास वाढवण्यासाठी हे एक ओपन सोर्स अल्गोरिदम असणारं माध्यम करायचं आहे. स्पॅम बोट्स, सर्व व्यक्तींचं ऑथेंटिकेशन अशी बरीच काम डोक्यात आहेत. ट्विटरमध्ये फार क्षमता आहे. मी कंपनीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच या माध्यमावर असणाऱ्यांसाठी नवीन दारं उघडली जाणार आहेत,” असं म्हणत मस्क यांनी भविष्यातील बदलांचे संकेत दिले आहेत.
यानंतर आता ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येत अचानक बदल होताना दिसत आहे. एनबीसी न्यूजनुसार गायिका केटी पेरीचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स कमी झाले आहेत. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्याच्या बातम्यांनंतर हे फॉलोअर्स कमी झाले आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स अचानक कमी झाल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. अभिनेता मार्क हॅमिलने याबाबत ट्विट केले आहे. अहवालात असे म्हटले आहे की मार्जोरी टेलर ग्रीन आणि ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचे फॉलोअर्स वाढत आहेत.
त्यामुळे असे का होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लोक असे गृहीत धरत आहेत की ट्विटर बॉट्स किंवा स्पॅम खात्यांवर बंदी घालत आहे किंवा जाणूनबुजून त्यांचे फॉलोअर्स कमी करून विशिष्ट खात्यांची लोकप्रियता कमी करत आहे.
पण, ट्विटरच्या मते, यापैकी कोणतेही विधान बरोबर नाही. एनबीसी न्यूजला ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या स्पॅम धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर ते सतत कारवाई करत असतात. यामुळे, फॉलोअर्सच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो.
ट्विटर मस्क यांच्या हातात येताच स्पॅम किंवा बॉट्स अकाऊंट काढून टाकले जातील, असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. याचा परिणाम अनेक भारतीय राजकारण्यांवरही होणार आहे. Twiplomacy च्या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ६० टक्के फॉलोअर्स हे बनावट आहेत. ट्विटर ऑडिटच्या अहवालानुसार, राहुल गांधींचे ६८ टक्के आणि अरविंद केजरीवाल यांचे ५१ टक्के फॉलोअर्स बनावट आहेत. अशा परिस्थितीत या राजकारण्यांचे फॉलोअर्सही अचानक कमी होऊ शकतात.