scorecardresearch

विश्लेषण : नवाजुद्दीन सिद्दिकी आणि आलियामधला वाद DNA चाचणीपर्यंत का पोहचला आहे?

नवाजने त्याच्या सर्वात लहान मुलाला स्वीकारण्यासही नकार दिला आहे

nawazuddin conflicts with wife
फोटो : इंडियन एक्सप्रेस

छोट्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीने आज स्वतःचं स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केलं आहे. केवळ चित्रपटच नव्हे तर ओटीटी विश्वातही त्याने जबरदस्त भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्याचा संघर्ष आज सगळ्यांना ठाऊक आहे. नवाज सध्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. तो त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या आईने त्याच्या पत्नीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. यावर नवाजच्या पत्नीने अभिनेत्यावर आरोप केले.

लॉकडाउनच्या दरम्यान या दोघांच्या नात्यात काहीतरी खटके उडत असल्याचं समोर आलं होतं, पण त्यावर त्यांनी काहीच भाष्य केलं नव्हतं. आता नवाजच्या आईने त्याच्या पत्नीविरोधात एफआयआर नोंदवल्याने पुन्हा त्यांच्या या कौटुंबिक कलहाची गोष्ट समोर आली आहे. नवाजची पत्नी आलिया हिनेसुद्धा सोशल मिडियावर एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करत काही गोष्टी समोर आणल्या आहेत. या व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून आलियाला नवाजने कशाप्रकारे छळलं आहे शिवाय आता नवाज त्याच्या मुलांनाही मध्ये आणत आहे या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पहिल्या मुलाच्या जन्मानंतरच या दोघांमध्ये बेबनाव व्हायला सुरुवात झाली होती. आता एका प्रॉपर्टीवरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला असून तो विकोपाला गेला असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : ‘विक्रम वेधा’ आणि ‘भेडीया’ हे चित्रपट अजूनही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित का झाले नाहीत? जाणून घ्या यामागील कारण

नेमकं प्रकरण काय?

आलिया नवाजुद्दीनच्या बंगल्यात गेल्यावर तिथे तिचा नवाजुद्दीनच्या आईबरोबर वाद झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी आलियाला चौकशीसाठी बोलावले होते. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी आलियाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिच्याविरुद्ध भादंवि कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अभिनेत्याची पत्नी आलियाच्या वकिलाने असं म्हंटले आहे की “नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांनी आलियाला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मग तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी तिला अटक करण्याची धमकी दिली.” याशिवाय ते असं म्हणाले की “नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबीयांनी गेल्या सात दिवसांपासून तिला जेवण दिलेले नाही. झोपायला बेड, अंघोळीसाठी बाथरूम वापरू दिले नव्हते. आलियाच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेराही लावण्यात आला होता. खोलीबाहेर २४ तास बॉडीगार्ड तैनात होते.” असे आरोप आलियाच्या वकिलांनी केल्यानंतर हे प्रकरण आणखीन चिघळलं.

इतकंच नाही तर नवाजने त्याच्या सर्वात लहान मुलाला स्वीकारण्यासही नकार दिल्याने आता आलियाच्या वकिलांनी उच्च न्यायलयात धाव घेतली असून एका डीएनए टेस्टची मागणी केली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आलिया म्हणाली, “हा माणूस अजिबात महान नव्हता, याने कायम त्याच्या पूर्वपत्नी आणि एक्सगर्लफ्रेंडसह माझाइ बऱ्याचदा अपमान केला आहे, आणि आता तो आमच्या मुलांना यात फरफटत आणू पाहतोय. हा माणूस इतका कसा वाईट वागू शकतो? माझ्याकडे असलेला प्रत्येक पुरावा हे सिद्ध करतो की या माणसाने माझा पत्नी म्हणून स्वीकार केला होता. स्टारडम मिळाल्यावर तो अधिकच खोटारडा झाला आहे, ही गोष्ट मला माहीत असती तर मी कधीच या माणसाशी लग्न केलं नसतं.”

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे लग्न २००९ मध्ये झाले होते. या दोघांना शोरा नावाची एक मुलगी असून यानी नावाचा एक मुलगा देखील आहे, आणि आता याच लहान मुलाच्या डीएनए टेस्टसाठी आलियाच्या वकिलांनी उच्च न्यायलयात धाव घेतली आहे. आता या प्रकरणात नेमका निर्णय कोणाच्या बाजूने लागणार ते येणारी वेळच ठरवेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-02-2023 at 18:42 IST

संबंधित बातम्या