जयेश सामंत

मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात राजकीय राडेबाजीला अक्षरश: ऊत आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामागे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी, नेते एकवटले. ठाणे शहरात मुळची शिवसेना नावाला तरी उरते का असा प्रश्न या बंडाच्या सुरुवातीच्या काळात विचारला जात होता. खासदार राजन विचारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने ठाण्याच्या स्थानिक राजकारणातील चुरस कायम राहिली आहे. हे जरी खरे असले तरी शिंदे यांच्या बंडामुळे ठाणेच नव्हे तर जिल्ह्यातील संपूर्ण राजकारणात यापूर्वी सातत्याने पाहायला मिळालेले समन्वयाचे पर्व इतिहासजमा झालेय का, असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटानिमित्त निर्माण झालेल्या वाद, त्यानंतर एका उड्डाणपुलाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात विनयभंगाच्या आरोपातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना झालेली अटक, त्यानिमित्ताने ढवळून निघालेले ठाण्यातील राजकारण, त्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव गटातील शिवसैनिकांना झालेली मारहाण, त्यावरून रंगलेले आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण यामुळे हा संघर्ष येत्या काळात आणखी वाढेल असेच चित्र आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर यासारख्या शहरातही स्थानिक पातळीवरील राजकीय कटुता टोकाला पोहचणारे प्रसंग दररोज घडत आहेत. हे चित्र जिल्ह्यातील राजकीय शांततेचा भंग करणारे ठरणार आहे.

हेही वाचा – विश्लेषण: विधान परिषदेच्या रिक्त जागांची निवडणूक लांबणीवर का पडली?

ठाण्यातील राजकारण समन्वयाचे कसे?

ठाण्यातील बड्या राजकीय नेत्यांमध्ये अध्येमध्ये निकोप स्पर्धेचे राजकारण पाहायला मिळाले असले तरी एरवी मात्र समन्वयाचे, काही ठिकाणी समझोत्याचे आणि अर्थकारणात बऱ्याच ठिकाणी एकमेकांच्या सोयीचे राजकारण दिसून यायचे. ठाण्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू नेहमीच महापालिकेभोवती स्थिरावल्याचे पाहायला मिळते. महापालिकेच्या वर्तुळात सर्वपक्षीय नेत्यांचे समझोत्याचे राजकारण हे काही दशके चर्चेत राहिले. शिवसेनेची धुरा दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात पक्ष वाढवत नेला. हे जरी खरे असले तरी तेव्हाच्या काँग्रेस पक्षातील अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले. ठाण्यात तर काँग्रेसच्या तिकीटावर सातत्याने निवडून येणाऱ्या काही नगरसेवकांना दिघे साहेबांचा ‘आशिर्वाद’ असायचा अशी चर्चा कायम असायची. दिघे आणि काँग्रेसचे तत्कालीन नेते दिवंगत वसंत डावखरे यांच्या मैत्रीचे किस्से आजही रंगवून सांगितले जातात. दिघे यांच्या मृत्यूनंतरही ठाण्यातील हे समन्वयाचे राजकारण काही काळ कायम राहिल्याचे पाहायला मिळते.

एकनाथ शिंदे समन्वयवादी नेते कसे ठरतात?

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा सुरुवातीचा काळ संघर्षाचा राहिला असला तरी इतर पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी जुळवून घेत वाटचाल करण्यात तेही माहीर मानले जातात. दिघे यांच्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवून धरण्यात शिंदे यांचा मोठा वाटा राहिला आहे. हे करत असताना विरोधकांशी दोन हात करत असताना आक्रमक राहाणारे शिंदे पडद्याआडून मात्र सर्वपक्षीय राजकीय समन्वयाचा सेतू बांधण्यातही कमालीचे यशस्वी ठरले. दिघे यांचे मित्र वसंत डावखरे यांच्यासोबत सौहार्द जपत असताना डावखरे यांचे पक्षांतर्गत विरोधक जितेंद्र आव्हाड यांच्याशीही त्यांनी मैत्रीपृूर्ण संबंध ठेवले. नवी मुंबईत गणेश नाईकांशी त्यांचे फारसे सख्य नसले तरी टोकाचा विरोधही शिंदे यांनी कधी दाखविला नाही. संघ, भाजप नेत्यांशी तर उत्तम संवाद कसा राहील यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, भिवंडीत कपिल पाटील, मुरबाडमध्ये किसन कथोरे यांच्यासारख्या नेत्यांशीही शिंदे यांचा सलोखा राहिला. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपशी दोन हात करताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी शिंदे यांच्यात टोकाचा संघर्ष होताना दिसला. निवडणुका संपल्यावर मात्र शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांशी जुळवून घेतल्याचे पाहायला मिळाले.

विश्लेषण: चित्रा वाघ आणि वाद हे समीकरण नेमके काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघर्षवाढीस शिंदेपुत्राचे आक्रमक राजकारण कारणीभूत?

शिंदे यांनी पक्षवाढीचे राजकारण करताना सर्वपक्षीय सलोख्याचा मार्ग पत्करल्याचे चित्र असले तरी त्यांचे पुत्र कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या राजकारणाचा बाज पूर्णपणे वेगळा असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्या जिल्ह्यातील जवळपास सर्वच राजकीय मित्रांना डाॅ. श्रीकांत यांचे महत्त्वाकांक्षी आणि तितकेच आक्रमक राजकारण एककल्ली वाटते त्यास काही कारणे आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांवर स्वत:ची मोहोर उमटवित असताना खासदार शिंदे यांनी रवींद्र चव्हाण या नेत्यासही शिंगावर घेतल्याचे पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड हे विरोधी पक्षात असले तरी आणि एकनाथ शिंदे यांचे स्थानिक राजकारणात थेट स्पर्धक असले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचे राजकीय वैर कधीही पहायला मिळाले नव्हते. खासदार श्रीकांत यांनी कळव्यात आक्रमक राजकारण करताना आव्हाड यांनाही आव्हान दिले आहे. त्यामुळे एका जाहीर कार्यक्रमात आव्हाड यांना त्यांच्या आणि थोरल्या शिंदेंच्या मैत्रीच्या कहाण्या सांगाव्या लागल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांच्यात पुन्हा एकदा समन्वयाचे वारे वाहू लागले असले तरी चव्हाण यांना आजही खासदार शिंदे तितकेसे जवळचे वाटत नाहीत हे स्पष्टच आहे. कल्याण ग्रामीणमधील मनसेचे आमदार राजू पाटील आणि खासदार शिंदे यांच्यातून विस्तवही जात नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिंदे-भाजपची जवळीक स्पष्ट दिसत असली तरी राजू पाटील यांना अजूनही शिंदे पुत्राच्या राजकारणावर म्हणावा तितका विश्वास नाही. खासदार शिंदे यांचे आक्रमक राजकारण करण्याच्या पद्धत, पोलीस तसेच महापालिका प्रशासनात वरचष्मा राखायची वृत्ती अनेकांना अस्वस्थ करणारी ठरू लागली आहे.