scorecardresearch

Premium

विश्लेषण : रशिया – युक्रेन युद्धावरुन काय धडा मिळाला ? भारतीय संरक्षण दल करत आहे अभ्यास…

युक्रेन विरुद्ध रशियाकडून वापरली जाणारी अनेक शस्त्रास्त्रे भारताकडेही आहेत. मोठी शस्त्रसज्जता असूनही रशिया युक्रेनवर निर्णायक विजय मिळवू शकलेला नाही

russia and ukraine war

अमित जोशी

युक्रेनवरील हल्ल्याला आता दीड महिन्याचा कालावधी उलटलेला आहे. अजुनही रशिया युक्रेनवर विजय मिळवू शकलेला नाही, एवढंच काय मोठ्या भागावर युक्रेनचेच नियंत्रण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या युद्धात रशियाची अनेक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर यांना युक्रेनने जोरदार प्रतिकार करत जमिनीवर आणले आहे. एका माहितीनुसार ४०० पेक्षा जास्त रणगाडे, एक हजार पेक्षा जास्त चिलखती वाहने रशियाने या युद्धात गमावली आहेत. बलाढ्य, शस्त्रसज्ज रशियाला युक्रेनच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्यास काही दिवसांचा कालावधी जावा लागला होता. तर जमिनीवर रणगाडे, चिलखती वाहने यांच्यावर हल्ले करत युक्रेनने रशियाच्या लष्कराला जेरीस आणल्याचं बघायला मिळत आहे. या युद्धाकडे भारतीय संरक्षण दल बारकाईने बघत आहे, निरीक्षण करत आहे, या युद्धाचा अभ्यास करत आहे.

reason behind Hamas attack on Israel
‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?
kim jong un and vladimir putin
रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाची उडी? किम जोंग-उन यांच्याकडून व्लादिमीर पुतिन यांना युद्धसामग्रीचा पुरवठा
Asian Games
विश्लेषण : आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांच्या शतकपूर्तीचे भारताचे ध्येय साध्य होणार? नीरज चोप्रासह कोणत्या खेळाडूंकडून अपेक्षा?
india rejects justin trudeau allegations
खलिस्तानवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येचे प्रकरण : ट्रुडोंचा पुराव्यांचा दावा भारताला अमान्य

युद्धामागची धोरण स्पष्टता

युद्ध सुरु करण्याआधी किंवा केल्यानंतर बदलेल्या परिस्थितीबाबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे निश्चित असे लक्ष्य होते किंवा तसं असणे अर्थात अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाटो या लष्करी संघटनेशी संबंधित राष्ट्रांचे रशियाच्या सीमेजवळ वर्चस्व वाढले तर काय होऊ शकते याची झलक म्हणा किंवा उद्दामपणा म्हणा हे पुतीन यांनी युद्धाच्या मार्फत जगाला दाखवून दिला. क्रिमीयाप्रमाणे युक्रेनचा काही प्रांत डॉनेत्स्क आणि लुहान्स्क हे घशात घालण्याचे रशियाचे मनसुबे आता जवळपास यशस्वी झाले आहेत. तसंच ऊर्जा स्त्रोत बलाढ्य असतांना जगाशी पंगा कसा घेतला जाऊ शकतो हे पुतीन यांनी दाखवून दिले. राष्ट्रप्रमुखाचे मनसुबे जरी स्पष्ट असले तरी ध्येय धोरणांची – युद्ध लढण्याबाबतची स्पष्टता ही सैन्यासमोर होती का हा यानिमित्ताने निर्माण झालेला प्रश्न आहे. कारण भाषा- संस्कृती साधर्म्य असलेल्या देशावर हल्ला करतानाचा उत्साह-आक्रमकपणा रशियाच्या सैन्यामध्ये आवश्यक तेवढा दिसला नाही असंच आत्तापर्यंत आलेल्या विविध वृत्तांवरुन म्हणावे लागेल. त्यामुळेच युद्धामागची ध्येय धोरणे हा एक अभ्यासाचा विषय भारतीय सैन्यदलासाठी ठरणार आहे.

रशियाच्या रणगाड्यांची वाताहत

विविध वृत्त आणि माहितीनुसार रशियाने आत्तापर्यंत सुमारे ४७० पेक्षा जास्त रणगाडे, एक हजार पेक्षा जास्त चिलखती वाहने गमावली आहेत. चिलखती वाहनांचा वापर हा जवानांना थेट युद्धभुमिवर नेण्यासाठी केला जातो. आधुनिक लष्कर असलेल्या रशियाने एवढे रणगाडे गमावणे हे एक आश्चर्य मानले जात आहे. T-72, T-80 , T-90 असे विविध रणगाडे रशियाने युद्धात गमावले आहेत. यापैकी T-72 आणि T-90 रणगाडे हे भारतीय सैन्य दलात आहेत, भारतीय सैन्याचा मुख्य आधार आहेत. तेव्हा या रणगाड्यांचा प्रभावी वापर या रणगाड्यांचा निर्माणकर्ता का करु शकला नाही याचा अभ्यास भारतीय संरक्षण दल करत आहे. विशेषतः युद्धात रणगाड्यांच्या हल्ल्याची व्युहरचना ( strategy ) रणगाड्यांना असलेले हवाई संरक्षण, ड्रोनचा वापर अशा विविध गोष्टींची रणनिती पुन्हा नव्याने तयार करण्याचा धडाच एकप्रकारे रशियाच्या या युद्धामुळे भारताला मिळाला आहे. या युद्धात आगेकूच केलेल्या रशियाच्या रणगाड्यांमधील इंधन संपणे, दारुगोळा संपणे… यामुळे आक्रमक युक्रेनच्या सैन्यापुढे रणगाड्यांचा त्याग करणे अशा घटनाही समोर आल्या आहेत. तेव्हा युद्धात रसद पुरवठा कसा असला पाहिजे याचाही एक मोठा धडा रशियालाच नाही, भारतालाच नाही तर जगालाही मिळाला आहे.

क्षेपणास्त्रांचा वापर

युक्रेनने वापरलेल्या Javelin – जॅवेलियन नामक रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राने या युद्धात रशियाला बेजार करुन टाकले आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून लक्ष्यावर नेम धरायचा, डागण्यासाठी बटन दाबायचे की हमखास हे जॅवेलियन क्षेपणास्त्र लक्ष्याचा वेध घेते. लक्ष्य वेध कसा होतो तर क्षेपणास्त्र हवेत झेप घेतल्यावर लक्ष्याच्या डोक्यावर आल्यावरच सूर मारून रणगाड्याचा वेध घेते. अशा क्षेपणास्त्रामुळे रशियाच्या रणगाडे आणि चिलखती वाहनांचे जबर नुकसान झाले आहे. अमेरिकेने युक्रेनला ही जॅवेलियन क्षेपणास्त्रे आधी दिली होती आणि आता युद्ध सुरु झाल्यामुळे आणखी पुरवठा करणार आहे. तेव्हा रणगाडा विरोधी क्षेपणास्त्रांचा वापर हा भारताच्या संरक्षण दलासाठी महत्त्वाचा विषय झाला आहे. कारण पाकिस्तान आणि चीनकडे विविध प्रकारची रणगाडी विरोधी क्षेपणास्त्रे आहेत.

या युद्धात रशियाने १५० पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने आणि १०० पेक्षा जास्त हेलिकॉप्टर गमावली आहेत. विमान विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आणि हातातून डागता येणारी क्षेपणास्त्रे याचा पुरेपुर वापर या युद्धात रशियाविरुद्ध करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात असा वापर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात झाला असल्याने बदलत्या तंत्रज्ञानाचा एक मोठा धडा भारतालाही मिळाला आहे.

रशिया-युक्रेन युद्धात बहुतांश लढाई ही शहरी भागात किंवा शहरालगतच्या भागात सुरु आहे. तेव्हा अशा लढाईत नागरी वस्तींवर क्षेपणास्त्र – बॉम्ब पडल्याच्या-डागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या युद्धात जसे अनेक ठिकाणी युक्रेनचे सैन्य शरण आल्याच्या घटना घडल्या तसे काही ठिकाणी रशियाच्या सैन्यानेही हत्यारे टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढंच नाही युक्रेनसारख्या देशाचे ज्याचे नौदलच रशियापुढे टीचभर आहे त्या युक्रेनने रशियाच्या नौदलाला दोन मोठे दणके दिले, दोन महत्त्वाच्या -मोठ्या युद्धनौकांचे नुकसान केले आहे.

या सर्वांमुळे बलाढ्य -आधुनिक रशियाची युद्धसज्जता, युद्धाचे नियोजन, व्यवस्थापन यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दीड महिना झाला तरी अजुनही युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. प्रत्यक्ष युद्ध संपेल तेव्हा रशियाला यातून धडा मिळालेला असेलच पण त्यापेक्षा दोन सीमेवर तणाव असलेल्या भारताच्या संरक्षण दलाला यातून बरंच काही शिकण्यासारखे बाकी राहिलेले असेल यात शंका नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained what lessons have been learned from russia ukraine war the indian armed forces are studying asj

First published on: 14-04-2022 at 21:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×