अनिश पाटील
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर अमलीपदार्थ नियंत्रण विभागाकडून(एनसीबी) अनेक दावे करण्यात आले होते. मात्र याप्रकरणी कायदेशीरबाबीमध्ये एनसीबी चांगलीच तोंडघशी पडली आणि अखेर आर्यनसह सहा आरोपींविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्यामुळे त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले. तपास यंत्रणा अशा पद्धतीने तोंडघशी पडल्याची ही काही पहिली वेळ नाही. अनेक प्रकरणांमध्ये सुरूवातीला तपास यंत्रणांकडून अनेक मोठे दावे केले जातात. मात्र कायदेशीर पुरावे सादर करण्याची वेळ येते, तेव्हा तपास यंत्रणा अपयशी ठरतात. असे नेमके का होते ? गाजलेल्या प्रकरणांचे पुढे काय झाले ?

आर्यन खान प्रकरण काय आहे?

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर टाकलेल्या छाप्यात आर्यनला अटक करण्यात आली. अमली पदार्थांचे सेवन करण्याचा प्रयत्न करणे, ते बाळगणे, बागळण्यासाठी प्रवृत्त करणे आणि अमलीपदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत कट रचल्याच्या आरोपाअंतर्गत एनसीबीने त्याला अटक केली होती. या प्रकरणातील आरोपींकडून १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रोन एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमए एक्स्टसीच्या २२ गोळ्या जप्त केल्याचा दावाही एनसीबीने केला होता. आर्यनला २६ दिवस अटकेत राहिल्यानंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला. आता पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहाजणांवरील आरोप मागे घेण्याची वेळ एनसीबीवर आली आहे. दिल्ली एनसीबीच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुंबईतील विशेष न्यायालयात या प्रकरणी सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात एसआयटीने २० पैकी १४ आरोपींवर दोषारोप ठेवले आहेत, तर आर्यनसह सहाजणांवर पुराव्याअभावी कारवाई केली जाणार नाही असे नमूद केले आहे.

आर्यनसह प्रकरणी अवीन शाहू, गोपाल जी. आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघा यांच्यावरील आरोप एनसीबीने मागे घेतले. एसआयटीने वस्तुनिष्ठ पद्धतीने तपास केला. केवळ साशंकतेच्या पलीकडे ठोस पुरावे मिळवण्याच्या तत्त्वाचा वापर तपासात करण्यात आला. क्रुझवर छापा घालण्यात आला तेव्हा आर्यन आणि अन्य काहीजण वगळता उर्वरित आरोपींकडे अमलीपदार्थ सापडल्याचेही एनसीबीने म्हटले आहे.

बेबी पाटणकर प्रकरण

पोलीस यंत्रणेतही खळबळ उडवणारे बेबी पाटणकर हे प्रकरण २०१५ मध्ये घडले. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील हवालदार धर्मराज काळोखे यांच्या फार्महाऊसवर आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात मेफेड्रॉन(एमडी) सापडल्याचा आरोप करण्यात आला होता. मार्च २०१५ मध्ये घडलेल्या या प्रकरणात काळोखे याच्या साताऱ्यातील फार्महाऊसवरून ११२ किलो, तर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील लॉकरमधून १२ किलो एमडी ड्रगचा (म्यॅव म्यॅव) साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी काळोखे याच्याशिवाय मुख्य आरोपी म्हणून बेबी पाटणकर आणि अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखले यांच्यासह चार पोलिसांवरही याप्रकरणी आरोप झाले. गोखले यांना तर निवृत्तीला दोन दिवस उरले असताना अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यापूर्वी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत जप्त केलेल्या अमली पदार्थाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली होती. हा पदार्थ म्हणजे मेफेड्रोन (एमडी) किंवा म्यॅव म्यॅव अमली पदार्थ नाही असे स्पष्ट शब्दात सांगण्यात आले होते. मात्र, तरीदेखील निलंबनाची कारवाई करण्यात आली. या चाचणीनंतर पुन्हा एकदा जप्त केलेल्या पदार्थाची चाचणी घेतली जावी अशी मागणी कोर्टात करण्यात आली. यावेळी ही चाचणी चंदीगड येथील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत करण्यात आली. या चाचणीनंतर जप्त केलेला पदार्थ हा अमली पदार्थ नसून मोनोसोडियम ग्लुटॅमेट म्हणजेच चायनीज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे अजिनोमोटो असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अमलीपदार्थांचे आरोप पोलिसांना न्यायालयात सिद्ध करता आले नाहीत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. पुढे मुंबई पोलिसांच्या तपासावर आरोप करून याप्रकरणी बिहारमध्येही गुन्हा दाखल करून ते प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. ईडीनेही याप्रकरणी पैसे गैरव्यवहार प्रकरणाच्या अनुषंगाने तपासाला सुरूवात केली होती. सुशांत सिंह प्रकरणात मुंबईत पोलिसांनी ५६ जणांचे जबाब नोंदवले होते. अखेर व्हॉट्सअॅप चॅटींगच्या आधारावर याप्रकरणी सुरूवातीला एनसीबीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अमलीपदार्थांच्या आरोपाखाली आणखी एक दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या भावाला अटक झाल्यानंतर हळूहळू या प्रकरणाची चर्चा शांत झाली. हत्येच्या आरोपापासून सुरू झालेले हे प्रकरण अमलीपदार्थ सेवनाच्या आरोपांवर येऊन थांबले. एनसीबीने गेल्यावर्षी दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांच्यासह अनेक कलाकारांची अमलीपदार्थ प्रकरणात चौकशी केली.

चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तीविरोधात अमलीपदार्थ सेवनाचे आरोप

रिया चक्रवर्ती: अभिनेता सुशांत सिंह राजपुतला अमलीपदार्थ दिल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना एनसीबीने अटक केली होती. सध्या ते जामिनावर  आहेत.

प्रीतिका चौहान: गांजा बाळगल्याप्रकरणी ऑक्टोबर २०२० मध्ये एनसीबीने वर्सोवा येथून अटक केली होती. ९९ ग्रॅम गांजा प्रकरणी तिला अटक करण्यात आली. तिला याप्रकरणी जामीन मिळाला आहे.

भारती सिंह: नोव्हेंबर २०२० मध्ये, कॉमेडियन आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना एनसीबीने अटक केली. अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानातून आणि कार्यालयातून गांजा सापडला होता. नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

शबाना सईद: फिरोज नाडियादवाला यांच्या पत्नीला नोव्हेंबर २०२० मध्ये एनसीबीने अटक केली. एनसीबीने नाडियादवालाच्या घरावर छापा टाकला त्यावेळेस १० ग्रॅम गांजा सापडला. शबानाला याप्रकरणी जामीन मिळाला आहे.

कपिल झवेरी: एका रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये गोव्यात झवेरीला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती. या पार्टीमध्ये अमलीपदार्थांचा वापर झाल्याच्या आरोपावरून ही अटक करण्यात आली. नंतर त्याला जामीन मंजूर झाला.

अरमान कोहली: ऑगस्ट २०२१ मध्ये, या अभिनेत्याला एनसीबीने अमलीपदार्थासह अटक केली. त्याच्या घरात १.२ ग्रॅम कोकेन सापडल्यानंतर एनसीबीने त्याला अटक केली होती. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

फरदीन खान: ५ मे २००१ रोजी, या अभिनेत्याला कोकेन खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली . विशेष न्यायालयाने त्याची २०१२ मध्ये खटल्यातून मुक्तता केली.

गुन्हे सिद्ध करताना कोणत्या त्रुटी राहतात?

अमलीपदार्थांबाबतच्या गुन्ह्यात आरोपीच्या ताब्यात अमलीपदार्थ सापडणे, हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. त्यानंतर आरोपी अमलीपदार्थ विक्रीत सक्रिय असल्याच्या दाव्याला बळकटी देण्यासाठी मोबाइल संदेश, संवाद अथवा व्हॉट्स अॅप चॅट या गोष्टी दुहेरी भूमिका निभावतात. मात्र अमलीपदार्थाची जप्ती नसेल, तर इतर पुरावे न्यायालयात टिकत नसल्याचे अधिकाऱी सांगतात. आरोपीच्या ताब्यात अमलीपदार्थ असणे हा गुन्हा सिद्ध करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याशिवाय आर्थिक देवाण-घेवाण, गुन्ह्यासाठी मदत, अशा गोष्टीही न्यायालयापुढे मांडल्या जाऊ शकतात.

तस्करीच्या पद्धतीत बदल

सध्या निर्मनुष्य तस्करीवर भर वाढला आहे. त्यातून डार्क नेट, आंतरराष्ट्रीय पोस्ट, कुरिअर सेवा, जहाजांवरील कंटेनरच्या माध्यमातून तस्करीवर भर दिला जातो. करोनामुळे सर्वत्र टाळेबंदी झाल्यानंतर निर्मनुष्य तस्करीत आणखी वाढ झाली आहे. अमली पदार्थ महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे व्हॉट्‌स अॅप ग्रुप किंवा फेसबुकवर एका सांकेतिक भाषेत कोड वापरून पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीत फिल हाय आणि ट्रान्सध्ये नेण्यासाठी कोकेन, केटामाइन आणि टूसीबीसारखे अमली पदार्थ विकले जातात. तपास यंत्रणांनीही त्यांची कार्यपद्धती बदलली आहे. मात्र निर्मनुष्य तस्करीमुळे आरोपींचा शोध घेणेही तपास यंत्रणांना कठीण झाले आहे. आरोपीला अटक झाली, तर त्याच्याविरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे मिळवणे तपास यंत्रणांसाठी कठीण ठरते.

गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण किती?

मुंबईसह राज्यात अमलीपदार्थांच्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण तुलनेने चांगले आहे. शहरांतील अमलीपदार्थांच्या गुन्ह्यात ८५ टक्क्यांहून अधिक आरोपींना शिक्षा झाली आहे. मात्र त्यातील बहुसंख्य आरोपी सेवनकर्ते आहेत. विक्री करणाऱ्या आरोपींना अटकेचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे जाणकारांचे मत आहे. गेल्यावर्षी मुंबईत सात हजार ५२६ जणांना अमली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्यातील सहा हजार ७४७ आरोपी सेवनकर्ते होते. मात्र गेल्या काही वर्षांत तस्करांच्या अटकेच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.