अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन; तर रिपब्लिक पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हे उमेदवार असणार आहेत. मात्र, दोघांचेही वाढलेले वय आणि तंदुरुस्ती सध्या चर्चेचे कारण ठरले आहे. जो बायडन यांचे वय ८१; तर डोनाल्ड ट्रम्प यांचे वय ७८ आहे. वार्धक्याच्या कारणास्तव या निवडणुकीमधून जो बायडन यांनी माघार घ्यावी, असा दबाव आता वाढताना दिसतो आहे. अमेरिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक जॉर्ज क्लूनी यानेही बुधवारी (१० जुलै) जो बायडन यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यायला हवी, असे वक्तव्य केले आहे. त्याने केलेले हे वक्तव्य इतके महत्त्वाचे का मानले जात आहे?

हेही वाचा : बायडेन निवडणूक लढवण्यावर ठाम… डेमोक्रॅट देणगीदार, हितचिंतकांना मात्र फुटतोय घाम… काय होणार?

द न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकीय पानावर ‘आय लव्ह जो बायडन; बट वी नीट अ न्यू नॉमिनी’ नावाचा एक लेख अभिनेता जॉर्ज क्लूनी याने लिहिला आहे. जो बायडन यांनी या निवडणुकीतून मागे हटावे. त्यामुळे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करण्यात डेमोक्रॅटिक पक्षाला मदत होईल, असे मत क्लूनी याने या लेखामध्ये मांडले आहे. क्लूनी याने याच लेखात जो बायडन यांना ‘हीरो’ असेही संबोधले आहे. तसेच २०२० मध्ये बायडन यांनीच देशाची लोकशाही वाचवली होती, असा दावाही केला आहे. बायडन यांनी २०२४ मध्ये पुन्हा एकदा लोकशाही वाचविण्यासाठी प्रयत्न करावा, असे क्लूनीने म्हटले आहे. जो बायडन यांनी या निवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी मागणी डेमोक्रॅटिक पक्षातील अनेक सदस्य, तसेच समर्थकांकडून केली जात आहे. आता त्यामध्ये अभिनेता क्लूनीचीही भर पडली आहे. अर्थातच, जो बायडन यांचे वाढलेले वय हे त्यामागे कारण आहे. क्लूनी यानेही आता याच मताची री ओढल्यामुळे जो बायडन यांच्या उमेदवारीबाबत नकारात्मक असणाऱ्यांचा आवाज अधिक वाढला आहे. रिपब्लकिन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात पहिली प्रेसिडेन्शियल डिबेट पार पडली. मात्र, या डिबेटमध्ये जो बायडन यांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही, अशी सार्वत्रिक भावना आहे. त्यांचे वाढलेले वय हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बोलताना बऱ्याचदा अडखळतात आणि चाचपडतात. प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये ते मुद्दे मांडण्यामध्ये फिके पडल्याने त्यांची उमेदवारी नाकारली जावी आणि नवा उमेदवार उभा करावा, असा एक मतप्रवाह डेमोक्रॅटिक पक्षामध्ये प्रबळ होऊ लागला आहे.

जो बायडन यांच्याबाबत क्लूनी काय म्हणाला?

क्लूनीने आपल्या लेखाची सुरुवातच बायडन यांच्याबरोबरची आपली मैत्री किती दृढ आहे, याचे वर्णन करीत केली आहे. तसेच आजवर त्याने डेमोक्रॅटिक पक्षाला दिलेला पाठिंबाही उद्धृत केला आहे. क्लूनीने म्हटले आहे, “बायडन यांच्यावर माझा विश्वास आहे. खरे तर गेल्या चार वर्षांमध्ये अनेक कठीण लढाया बायडन यांनी जिंकल्या आहेत. मात्र, वेळेबरोबरचे युद्ध बायडन जिंकू शकत नाहीत.” पुढे क्लूनीने म्हटले आहे, “मी पक्षनिधी गोळा करण्यासाठीच्या मोठ्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. बराक ओबामा यांच्यासाठी २०१२ साली, तर हिलरी क्लिंटन यांच्यासाठी २०१६ साली अशीच मोहीम राबवली होती. त्यानंतर २०२० सालीही जो बायडन यांच्यासाठी मोहीम चालवलेली आहे. गेल्या महिन्यातच बायडन यांच्या सध्याच्या निवडणुकीसाठी पक्षनिधी गोळा करण्यासाठीच्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. मी हे यासाठी सांगत आहे, कारण माझा या प्रक्रियेवर विश्वास आहे आणि हा क्षण किती महत्त्वाचा आहे ते मी जाणतो.” या लेखामध्ये क्लूनीने जो बायडन यांच्या वार्धक्यामुळे दिसणारी लक्षणेही मांडली आहे. ही लक्षणे सार्वजनिक ठिकाणी दिसून आली आहेत. हे सारे मांडणे कठीण असल्याचेही क्लूनीने म्हटले आहे. पुढे त्याने बायडन यांची तुलना आधीच्या काही वर्षांपूर्वीच्या बायडन यांच्याशीही केली आहे; जे तेव्हा तंदुरुस्त होते. आता बायडन तंदुरुस्त नाहीत, असेच मत क्लूनीने मांडले आहे. पुढे त्याने बायडन यांना माघार घ्यायला न लावणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षावर टीकाही केली आहे.

क्लूनीची मते महत्त्वाची का ठरतात?

जॉर्ज क्लूनी हा ऑस्कर पुरस्कार जिंकलेला अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे. त्याने अनेक दर्जेदार अशा अमेरिकन चित्रपटांमध्ये काम केले आहे. थोडक्यात क्लूनीने त्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड यश प्राप्त केले असल्यामुळे अमेरिकन नागरिकांवर त्याचा प्रभाव आहे. क्लूनी फक्त अभिनय क्षेत्रातच नाही, तर समाजकार्यातही आघाडीवर आहे. क्लूनीने सुदान, हैती, सीरिया व लेबनॉनला मदत केली आहे. त्यामुळेच क्लूनीने बायडन यांच्या उमेदवारीवरून केलेली वक्तव्ये फारच महत्त्वाची मानली जात आहेत. क्लूनी अचानकच बोलता झाला आहे, असे नसून तो आधीपासूनच डेमोक्रॅटिक पक्षासाठी काम करीत आला आहे. त्यामुळे त्याने व्यक्त केलेले मत डेमोक्रॅटिक पक्षासाठी महत्त्वाचे ठरेल. २००८ पासून प्रत्येक डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला क्लूनीने पाठिंबा दिला आहे. निव्वळ शाब्दिक पाठिंबा नव्हे, तर त्याने पक्षाला निधी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. बराक ओबामा यांच्या निवडणुकीसाठी पक्षनिधी उभा करण्याच्या मोहिमेमध्येही क्लूनीने सक्रिय सहभाग घेतला होता. त्यावेळी त्याने जवळपास १५ दशलक्ष डॉलर्सची मदत मिळवून दिली होती. २०१६ साली हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीच्या वेळीही तो सक्रिय होता.

हेही वाचा : शाहबानो, शबानाबानो आणि सायराबानो! मुस्लीम महिलांच्या पोटगीसंदर्भातील न्यायालयाचा निर्णय महत्त्वपूर्ण का आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्लूनीच्या लेखामुळे काही फरक पडेल?

क्लूनीच्या लेखामुळे जो बायडन यांनी उमेदवारी मागे घेऊन तरुण व उमदा उमेदवार पुढे केला जावा, या मागणीला अधिक बळ मिळेल. मात्र, जो बायडन यांनी अद्याप तरी माघार घेण्याची तयारी दाखवलेली नाही. सध्या तरी या विषयाबाबत डेमोक्रॅटिक पक्षामध्ये मतभेद आणि गोंधळाचे वातावरण आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पक्षाला आपला उमेदवार जाहीर करावा लागेल. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. नोंव्हेबर महिन्यामध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. उमेदवार कोण असणार आहे, याबाबतची संदिग्धता अधिक काळ तशीच ठेवली, तर त्याचा पक्ष आणि पक्षनिधी मिळण्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच ही वेळ फार महत्त्वाची असणार आहे. उमेदवारीचा निर्णयही फार महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या संदर्भाने क्लूनीसारख्या अभिनेत्याने व्यक्त केलेले मतही महत्त्वाचे असणार आहे.