scorecardresearch

विश्लेषण: वर्षभरात भारतात ८०० किलो सोन्याची तस्करी… हे घडतेय कसे?

सोन्याच्या आयातीसाठीचे कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही या मौल्यवान धातूची तस्करी कमी होताना दिसत नाही. काय कारणे आहेत या मागे?

gold smuggling in india
वर्षभरात भारतात ८०० किलो सोन्याची तस्करी… हे घडतेय कसे? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स)

अनिश पाटील

गेल्या आर्थिक वर्षात (२०२१-२२) देशात ८०० किलोपेक्षा जास्त सोन्याची तस्करी झाली. त्याची किंमत ४०० कोटींपेक्षा अधिक आहे. सोन्याच्या तस्करीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. विशेषत: आता सोन्याच्या आयातीसाठीचे कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही या मौल्यवान धातूची तस्करी कमी होताना दिसत नाही. काय कारणे आहेत या मागे?

भारतात सोन्याची तस्करी कुठून होते?

भारतात होणाऱ्या तस्करीचे केंद्र दुबई आहे. वर्षानुवर्षे भारतात दुबईतूनच सोन्याची तस्करी होत आहे. पण त्याच्या मार्गांमध्ये बदल होत आहेत. सोन्याच्या तस्करीच्या या आंतरराष्ट्रीय टोळीत (सिंडिकेट) भारतासह अनेक देशांतील टोळ्यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियातून सोने दुबईला आयात केले जाते. हे सोने छुप्या पद्धतीने विविध देशांतून भारतात पाठवले जाते. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील टोळ्या दुबईच्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग बनून लाखो-कोटींचा नफा कमवत आहेत.

म्यानमार सोने तस्करीचा महत्त्वाचा मार्ग?

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाकडून (डीआरआय) १ ते ४ डिसेंबरदरम्यान पाटण्यात विदेशी सोन्याच्या तीन खेपा जप्त करण्यात आल्या. यावेळी चार कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सुमारे साडेआठ किलो सोने जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे पकडलेले तस्कर हे महाराष्ट्रातील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुवाहाटी आणि इम्फाळ येथून सोन्याच्या दोन खेपा तस्करांना मिळाल्या आहेत. डीआरआयने २०२१-२२ मध्ये तस्करीच्या माध्यमातून भारतात आलेले जितके सोने जप्त केले, त्यापैकी ३७ टक्के सोने म्यानमारमधून भारतात आले होते. देशात जप्त करण्यात आलेल्या बेकायदा सोन्यापैकी २० टक्के सोने आखाती देशांतून आले आहे. तस्करीचे ७ टक्के सोने बांगलादेशमार्गे भारतात पोहोचले. त्याचप्रमाणे ३६ टक्के सोने इतर देशांतून तस्करीच्या माध्यमातून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

विश्लेषण: फुटबॉलमधील ‘रॅशफोर्ड सेलिब्रेशन’ म्हणजे काय? रॅशफोर्डच्या कृतीचा नेमका अर्थ काय?

सोने तस्करांना म्यानमार सुरक्षित का वाटते?

सोन्याच्या तस्करीसाठी जहाज व विमानमार्गांचा फार मोठ्या प्रमाणात वापर होत असे. आजही होतो. पण म्यानमारहून भारतात सोन्याची तस्करी करणे तुलनेने सोपे आहे. भारतातून म्यानमारच्या हद्दीत पाच किलोमीटर आत जाण्यावर कोणतेही बंधन नाही. फक्त ओळखपत्र असणे आवश्यक आहे. हे दाखवून कोणीही म्यानमारच्या आत जाऊ शकते. तेथून विविध वस्तूंची खरेदी करून लोक सहज परत येतात. सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या टोळ्या याचा फायदा घेतात. म्यानमारमध्ये बसलेले तस्कर भारतात सोने पुरवतात किंवा इथल्या टोळ्या म्यानमारमधून सोने आणतात. विमानतळ व बंदरांच्या तुलनेत म्यानमार सीमेवर कमी तपासणी होते. तस्कर त्याचा फायदा घेत आहेत.

भारतातील कोणत्या टोळ्या सोने तस्करीत सक्रिय आहेत?

सोन्याच्या तस्करीत पैसा गुंतवणाऱ्या बड्या सिंडिकेटचा संबंध दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे असल्याचे सांगण्यात येते. म्यानमारहून सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबईतील व्यावसायिकांनाही यापूर्वी अटक झालेली आहे. दुबईत बसलेल्या तस्करांशी त्यांचा संपर्क आहे. गरज असेल तेव्हा सोन्याची मागणी केली जाते. हवाला रॅकेटच्या माध्यमातून हा पैसा दुबईतील तस्करांपर्यंत पोहोचतो. भारतातील व्यापाऱ्याला जेवढे सोने खरेदी करावे लागते तेवढे पैसे मिळतात. सोन्याच्या तस्करीत काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

विश्लेषण: गायी व मेंढ्यांच्या ढेकर देण्याने, लघवीने हवामानाला कसा धोका पोहोचतो?

सोने आयातीचा पर्याय असताना तस्करी का होते?

सोने हे अर्थकारणातील महत्त्वाचा घटक आहे. भारतातील नागरिकांकडूनही सोन्याला मोठी मागणी आहे. सोने आयात करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी सरकारने दिलेल्या परवान्याची आवश्यकता असते. आयातीवर सीमाशुल्क कर आणि इतर शुल्कासह सुमारे २५ टक्के शुल्क भरावे लागते. तसेच आयात करण्यासाठी काळ्या पैशांचा वापर केल्यास अटक होऊ शकते. पण तस्करीमार्गे सोने भारतात आणल्यास तस्करांना एका किलोमागे लाखोंचा फायदा होता. तसेच काळ्या पैशांचा वापरही तस्करीत करून काळा पैसा पांढरा करता येऊ शकतो. त्यामुळे आयातीचा पर्याय उपलब्ध असतानाही सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 10:15 IST
ताज्या बातम्या