Surge in credit card online payments वस्तू व सेवा करातील (जीएसटी २.०) नवी द्विस्तरीय दररचना सोमवारपासून (दि.२२) लागू झाली आहे, यामुळे लाखो भारतीयांना रोजच्या खर्चात थोडा दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. अप्रत्यक्ष करातील ही सुधारणा म्हणजे ‘बचत उत्सव’ असून त्यामध्ये देशवासीयांना सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षापासून वार्षिक १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त केले आहे. ‘जीएसटी २.०’च्या सुलभीकरणामुळे दैनंदिन वापराच्या ९९ टक्के वस्तू ५ टक्के कर टप्प्यात आल्या आहेत.
मुख्य म्हणजे जीएसटी दरकपात लागू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ग्राहकांच्या खर्चात अचानक मोठी वाढ दिसून आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आकडेवारीनुसार, केवळ एका दिवसात म्हणजे २२ सप्टेंबर रोजी, क्रेडिट कार्डाद्वारे झालेले ई-कॉमर्स व्यवहार सुमारे सहा पटीने वाढून १०,४११ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याचा अर्थ काय? या तेजीचे कारण काय? भारतात डिजिटल पेमेंटचा वापर कसा वाढत आहे? त्याविषयी जाणून घेऊयात…

ग्राहकांच्या ऑनलाइन व्यवहारात सहा पटींनी वाढ
सोमवारपासून (दि.२२) भारतात वस्तू व सेवा करातील (जीएसटी २.०) द्विस्तरीय दररचना लागू झाली आणि एकाच दिवसात क्रेडिट कार्डाद्वारे झालेले ई-कॉमर्स व्यवहार १०,४११ कोटी रुपयांवर पोहोचले. त्याच्या आदल्याच दिवशी, म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी क्रेडिट कार्डाचे व्यवहार १,५१४ कोटी इतके होते आणि एकूण ३६.१६ लाख खरेदी व्यवहार झाले होते. मात्र, जीएसटी सवलतीमुळे खरेदीची लाट (Consumption frenzy) उसळली आणि दुसऱ्याच दिवशी व्यवहारांची संख्या सुमारे ९५ लाखांवर पोहोचली. २३ सप्टेंबर रोजीही ही गती कायम राहिली. २३ सप्टेंबरला जवळपास ७० लाख ऑनलाइन व्यवहारांमधून क्रेडिट कार्डाद्वारे ७,२७४ कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला.
डेबिट कार्ड आणि यूपीआय व्यवहारांतही मोठी उसळी
‘आरबीआय’च्या आकडेवारीनुसार, पॉईंट-ऑफ-सेल (POS) व्यवहार (दुकानात कार्ड स्वाईप करून केलेले व्यवहार) आदल्या दिवशी १,१०६ कोटींवरून २२ सप्टेंबर रोजी दुप्पट होऊन २,५३३ कोटी झाले. ही वाढ केवळ क्रेडिट कार्डांपुरती मर्यादित नव्हती, त्यात डेबिट कार्डच्या व्यवहारांचादेखील समावेश होता. २१ सप्टेंबर रोजी डेबिट कार्डाद्वारे केवळ १९३ कोटी रुपयांची खरेदी झाली होती.
परंतु, २२ सप्टेंबर रोजी जीएसटी कपातीमुळे देशभरातील ग्राहकांनी केलेल्या व्यवहारांमुळे खर्चात चार पटीहून अधिक वाढ झाली आणि डेबिट कार्डचा व्यवहार ८१४ कोटींवर पोहोचला, ज्यात १४.३३ लाख व्यवहार झाले. त्याचप्रमाणे, आरबीआयच्या माहितीनुसार, यूपीआय प्लॅटफॉर्मद्वारे झालेले पेमेंट आदल्या दिवशी ६०,३२० कोटी होते, जे २२ सप्टेंबर रोजी वाढून ८२,४७७ कोटी रुपये झाले.
डिजिटल पेमेंटमधील तेजीचे कारण काय?
किरकोळ विक्रेते (Retailers) आणि बँका सध्याच्या जीएसटी कपातीचा फायदा घेण्यासाठी सणासुदीच्या ऑफर आणि विशेष पॅकेज देत आहेत. ही कपात FMCG वस्तूंपासून ते गाड्यांपर्यंत अनेक उत्पादनांना लागू आहे. सणासुदीच्या वेळेतच ही कपात झाल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढत आहे. खरेदीदार कमी झालेल्या किमती आणि सवलतींचा फायदा घेत असल्याने दिवाळीपर्यंत खर्चाची ही गती कायम राहील अशी अपेक्षा आहे. मात्र, सणासुदीचा उत्साह आणि जीएसटी कपातीमुळे मिळालेला तात्पुरता दिलासा कमी झाल्यानंतर मागणीतील ही वाढ टिकेल का, असा प्रश्न एका बँकिंग सूत्राने उपस्थित केला आहे.
डिजिटल पेमेंटमधील तेजीविषयी तज्ज्ञ काय सांगतात?
NeoGrowth चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नायर म्हणाले, “भारतात डिजिटल पेमेंट आता केवळ शहरातील लोकांचा विशेषाधिकार राहिलेला नाही, तर ते राष्ट्रीय मानक ठरत आहे. आपण जे पाहत आहोत, ते तंत्रज्ञानाच्या जोरावर झालेले एक परिवर्तन आहे. किराणा दुकानांपासून ते छोट्या स्टॉल्सपर्यंत, भारतातील किरकोळ विक्रेते डिजिटल व्यवहारांना स्वीकारत आहेत.” ते पुढे म्हणाले, “हा बदल केवळ पेमेंटच्या सोयीबद्दल नाही, तर भविष्यासाठी तयार असलेल्या परिसंस्थेवरील (future-ready ecosystem) विश्वासाविषयी आहे, असे आमचे मत आहे.”
भारतातील वाढती डिजिटल पेमेंटची स्वीकारार्हता
UPI पेमेंटपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डांपर्यंत डिजिटल किरकोळ व्यवहार हे भारतातील दैनंदिन ग्राहक खर्चाचा अविभाज्य भाग झाले आहेत आणि त्यांची स्वीकारार्हता देशभरात सतत वाढत आहे. भारतातील २९ शहरांमधील डिजिटल दरी वेगाने भरून निघत आहे. दोन वर्षांपूर्वी जिथे सर्व किरकोळ व्यवहारांमध्ये डिजिटल खर्चाचे प्रमाण ४५ टक्के होते, तिथे आता हे प्रमाण ७४ टक्क्यांवर पोहोचले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर या २९ शहरांमध्ये किरकोळ खरेदीसाठी खर्च केलेल्या प्रत्येक १०० रुपयांपैकी ७४ डिजिटल पद्धतीने दिले जातात. NeoGrowth NeoInsights च्या अभ्यासानुसार, ही वाढ ग्राहकांच्या वर्तणुकीतील सखोल बदल दर्शवते.
दैनंदिन जीवनात डिजिटल पेमेंटची सवय
भारतातील डिजिटल पेमेंटची सवय आता दैनंदिन जीवनाचा एक भाग झाली आहे. सौंदर्यप्रसाधने (८३ टक्के), किराणा खरेदी (६८ टक्के) आणि वाहन देखभाल (८० टक्के) यांसारख्या अत्यावश्यक आणि ऐच्छिक अशा दोन्ही प्रकारांच्या खरेदीत डिजिटल किरकोळ व्यवहारांचे वर्चस्व आहे. किराणा आणि इंधन यामध्येदेखील डिजिटल पेमेंटचा वापर वेगाने वाढत आहे. या अभ्यासानुसार, हैदराबाद (८२ टक्के), बंगळूरू (७९ टक्के) आणि पुणे (७९ टक्के) ही मोठी शहरे डिजिटल पेमेंट स्वीकारण्यात आघाडीवर आहेत, तर महानगरांव्यतिरिक्तच्या शहरांमध्ये विशाखापट्टणम (७६ टक्के), नागपूर (७१ टक्के) आणि चंदीगड (६८ टक्के) सर्वोच्च स्थानी आहेत.
याउलट, अहमदाबाद (६० टक्के), कोलकाता (५५ टक्के), जमशेदपूर (५४ टक्के), मदुराई (५२ टक्के) आणि राजकोट (४८ टक्के) यांसारखी शहरे अजूनही रोख रकमेवर अधिक अवलंबून आहेत, असे या अभ्यासात नमूद केले आहे. मात्र, ही दरी डिजिटल सुविधांच्या अभावामुळे नसून, वर्तणुकीतील घटकांमुळे आहे. रोख व्यवहारांवर सततचा अवलंब आणि पेमेंट सवयी बदलण्यास असलेला विरोध, यामुळे डिजिटल पेमेंटचा स्वीकार या शहरांमध्ये मंदावला आहे.