Men taller than women : महिला आणि पुरुषाकडे पाहिल्यानंतर महत्त्वाचा फरक जाणवतो तो शारीरिक उंचीचा. सर्वसाधारणपणे महिलांपेक्षा पुरुष जास्त उंचीचे असतात. दोघांमधील उंचीचे अंतर एक दोन इंचाने का होईना जास्तच असते. लग्न करतानादेखील ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जाते. काही तरुणांची उंची जास्त असल्याने त्यांना हवा तसा जोडीदार मिळणे कठीण होऊन बसते, तर काहींना त्यांच्या उंचीचाच जोडीदार मिळतो. दरम्यान, पुरुष महिलांपेक्षा उंच का असतात? त्यामागचं कारण काय? हे एका नवीन संशोधनातून समोर आलं आहे. त्यात नेमकं काय म्हटलंय? ते जाणून घेऊ…

सर्वसाधारणपणे महिलांपेक्षा पुरुषांची उंची सुमारे पाच इंचांनी जास्त असते; पण असं नेमकं कशामुळे आहे? पुरुष महिलांच्या तुलनेत जास्त उंच का असतात? असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. प्रसिद्ध निसर्ग अभ्यासक चार्ल्स डार्वनिने त्याच्या ‘द डिसेंट ऑफ मॅन’ या पुस्तकात असं म्हटलंय की, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचा देह हा भरदार असतो. त्याची दणकट शरीरयष्टी व लढाऊ वृत्ती आजही कायम आहे. जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी तसेच स्त्री जोडीदार मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टासाठी निसर्गानेच ही व्यवस्था केलेली आहे. महिलांपेक्षा पुरुषांची उंची जास्त असणे ही गोष्ट केवळ जनुकीयदृष्ट्या ठरलेली आहे असं म्हणता येणार नाही. अनेक प्रजातींमध्ये मादींची वाढ नरांपेक्षा अधिक असते.

अभ्यासातून काय समोर आलं?

‘Proceedings of the National Academy of Sciences’ या जर्नलमध्ये सोमवारी एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला. त्यात महिला व पुरुषांमधील उंचीचे अंतर का कमी असते हे काही प्रमाणात स्पष्ट करण्यात आले आहे. तज्ज्ञांनी केलेला हा अभ्यास SHOX नावाच्या एका जनुकाशी संबंधित आहे, जो उंचीशी संबंधित मानला जात आहे. राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अभ्यासानुसार, SHOX (शॉर्ट स्टेचर होमिओबॉक्स) हे जनुक महिला व पुरुषांमध्ये आढळून येते. पुरुष आणि महिलांमधील उंचीतील फरकासाठी हे जनुक जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : विद्यापीठ परिसरात कुकर्म, न्यायालयाने ठोठावली जन्मठेप; काय घडलं होतं त्या दिवशी?

पुरुष स्त्रियांपेक्षा उंच का असतात?

  • महिलांमध्ये फक्त X गुणसूत्र असतात आणि पुरुषांमध्ये दोन्ही XY गुणसूत्र असतात, ज्यामुळे SHOX मुळे दोघांच्या उंचीमध्ये फरक असतो.
  • अतिरिक्त Y गुणसूत्र हे एखाद्या व्यक्तीची उंची वाढवण्यासाठी X गुणसूत्रापेक्षा जास्त प्रभावी ठरतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी सुमारे दहा लाख लोकांवर अभ्यास केला.
  • अभ्यासातून असं समोर आलं की, एक हजार २२५ लोकांमध्ये फक्त एक X किंवा Y गुणसूत्र होते आणि त्यांची उंची कमी होती.
  • दुसरीकडे, ज्या लोकांमध्ये अतिरिक्त Y गुणसूत्र होते, त्यांची उंची अतिरिक्त X गुणसूत्र असलेल्या लोकांपेक्षा जास्त होती.
  • पुरुषांकडे X आणि Y ही गुणसूत्रे असल्यामुळे त्यांची उंची महिलांपेक्षा जास्त असते, असं अभ्यासातून समोर आलं आहे.

संशोधकांनी नेमकं काय कारण सांगितलं?

SHOX जनुकाची जैव रसायनशास्त्रातील भूमिका यामागचं कारण असू शकते, असं पेनसिल्व्हेनियातील डॅनव्हिल येथील गीझिंगर कॉलेज ऑफ हेल्थ सायन्सेसमधील अनुवंशशास्त्र संशोधक मॅथ्यू ओएटजेन्स यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, SHOX जनुकाचे स्थान लिंग गुणसूत्रांच्या शेवटी असते. महिलांमधील बहुतेक जनुक हे दोन XX गुणसूत्रात शांत किंवा निष्क्रिय असतात. परंतु, त्यांच्या X गुणसूत्राच्या अगदी टोकाला असलेल्या काही भागात जनुके सक्रिय असतात, त्यामुळेच SHOX हे जनुक टोकाजवळ असल्यामुळे ते पूर्णपणे निष्क्रिय होत नाही. पुरुषांच्या बाबतीत मात्र तसे आढळून आले नाही. त्यांच्यामध्ये असलेल्या X गुणसूत्रावरील SHOX हे जनुक पूर्णतः सक्रिय असते.

हेही वाचा : समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ५ जून पासून सेवेत? नागपूर-मुंबई प्रवास आता अवघ्या आठ तासांत? 

महिलांची उंची जास्त का वाढत नाही?

याचा अर्थ असा की, महिलांकडे दोन XX गुणसूत्रे असूनही त्यांच्यामध्ये SHOX जनुकाचा थोडकाच प्रभाव असतो. पुरुषांकडे मात्र X आणि Y ही गुणसूत्रे असल्यामुळे त्यांच्यामधील SHOX जनुक सक्रिय असतो, म्हणूनच पुरुषांना महिलांच्या तुलनेत त्याचा अधिक फायदा मिळतो आणि त्यांची उंची थोडी जास्त असते. दरम्यान, संशोधकांना असे आढळून आले की, या अनुवांशिक फरकामुळे पुरुष आणि महिलांच्या उंचीमध्ये सरासरी २५ टक्क्यांची तफावत आहे. तज्ज्ञांनी केलेल्या या संशोधनामुळे निश्चितच उत्क्रांतीच्या इतिहासावर प्रकाश टाकून अनुवांशिकता समजून घेण्यास मदत होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उंची वाढीमागे आहेत वेगवेगळी कारणं

दरम्यान, संशोधकांनी केलेल्या या नवीन अभ्यासाव्यतिरिक्त, पुरुष आणि महिलांच्या उंचीतील फरकामागे काही इतरही कारणे आहेत. यातील एक प्रमुख कारण म्हणजे, टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हाडांच्या आणि स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देते, जे हाडांची लांबी आणि घनता वाढविण्यास मदत करते; ज्यामुळे पुरुषांची सरासरी उंची वाढते, तर इस्ट्रोजेन महिलांमध्ये हाडांच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. पुरुष आणि महिलांच्या उंचीबाबत तज्ज्ञांची, संशोधकांची वेगवेगळी मते आहेत. विशेष बाब म्हणजे, आतापर्यंत कोणत्याही अभ्यासातून याबाबत ठामपणे निष्कर्ष निघालेले नाहीत.