भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. २२ एप्रिल रोजी पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये २६ पर्यटकांच्या केल्या गेलेल्या क्रूर हत्यांना प्रत्युत्तरादाखल म्हणून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला. या तणावादरम्यान मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करण्यात आला. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करीत ऑपरेशन बुनयान अल-मार्सस सुरू केले. पाकिस्तानने ८ ते ९ मेदरम्यान नियंत्रण रेषेवर ३६ ठिकाणी ३०० ते ४०० ड्रोन तैनात केल्याचे भारताने म्हटले.
गुरुवारी (८ मे) पाकिस्तानने भारतातील तीन लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. तर, दुसरीकडे भारताचे २५ ड्रोन पाडल्याचा आरोप पाकिस्तानने केला. गेल्या काही वर्षांत इतर देशांनीही तणावादरम्यान ड्रोनचा वापर केल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच ड्रोनचा वापर कसा वाढला आहे? ड्रोनमुळे युद्धाचे स्वरूप बदलत आहे का? भारत-पाक संघर्षात त्याचा वापर कसा करण्यात आला? त्याविषयी जाणून घेऊ….

युक्रेन युद्धात ड्रोनचा वापर
ड्रोन हे एक प्रकारचे मानवरहित विमानच असते. ते रिमोट कंट्रोलच्या साह्याने उडवले आणि नियंत्रित केले जाते. लहान व सर्वांत स्वस्त एफपीव्ही ड्रोन (फर्स्ट पर्सन व्ह्यू) युक्रेन युद्धातील सर्वांत शक्तिशाली शस्त्रांपैकी एक असल्याचे सिद्ध झाले आहे. एफपीव्ही ड्रोन पायलटद्वारे जमिनीवरून नियंत्रित केले जातात आणि अनेकदा ड्रोनमार्फत स्फोटकांनी भरलेली ठिकाणे लक्ष्य केली जातात. केबल टायसह ड्रोनच्या घटकांची एकूण किंमत ५०० डॉलर्स किंवा त्यापेक्षा कमी असू शकते. या ड्रोनचा वापर आकार, बॅटरी व पेलोडवर अवलंबून असतो. या ड्रोनची श्रेणी पाच ते २० किलोमीटर किंवा त्याहून अधिक असते.
ड्रोन क्षमतांचा विकास
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी अलीकडच्या वर्षांत त्यांच्या संबंधित ड्रोन इकोसिस्टीममध्ये सुधारणा केली आहे. भारतानेही ड्रोनचे देशांतर्गत उत्पादन वाढवले असून, परदेशी मित्रराष्ट्रांकडूनही आयात केली आहे. भारताने नवी आर्थिक आणि रोजगारजनक क्रांती निर्माण करण्याची क्षमता असलेल्या ड्रोनच्या वापराकरिता नवे ड्रोन धोरण २०२१ देखील तयार केले. ड्रोन तंत्रज्ञानाचा फायदा देशवासीयांना घेता यावा यासाठी हे नवे धोरण तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओआरएफ)नुसार २०२२ मध्ये ड्रोन शक्ती मिशनने संरक्षणासह विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान तयार करण्याकरिता स्टार्टअप्स, इनक्युबेटर आणि सार्वजनिक-खासगी भागीदारींना प्रोत्साहन देत देशांतर्गत इकोसिस्टीमला आणखी प्रेरित केले. २०२४ च्या मध्यापर्यंत भारताने आपल्या लष्करी ताफ्यात २,००० ते २,५०० ड्रोन समाविष्ट केले. या ड्रोन्सचा एकूण खर्च ३६१.४५ दशलक्ष ते ४२१.६९ दशलक्ष डॉलर्स होता. भारताच्या ड्रोन ताफ्यात प्रामुख्याने इस्रायलमध्ये विकसित टोही अनमॅन्ड एरियल व्हेइकल्स (यूएव्ही) जसे की आयएआय सर्चर व हेरॉन यांचा समावेश आहे. त्याबरोबरच हार्पी व हार्पसारख्या युद्धसामग्रींचादेखील समावेश आहे.

ड्रोन क्षमता वाढविण्याच्या भारताच्या सर्वांत मोठ्या पावलांपैकी एक पाऊल म्हणजे अमेरिकेकडून ३१ ‘MQ-9B प्रीडेटर ड्रोन’ खरेदी करण्याचा चार अब्ज डॉलर्सचा करार. MQ-9B प्रीडेटर ड्रोन्स ४० तासांपर्यंत आणि ४०,००० फूट उंचीपर्यंत उडू शकतात. भारताकडे नागास्त्र-१ सुसाइड ड्रोन, रुस्तम-२, आर्चर, निशांत असे अनेक स्वदेशी ड्रोन आहेत. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये L-70 विमानविरोधी तोफा, Zu-23mm तोफा व विशेष काउंटर-अन मॅन्ड एरियल सिस्टीम (सीयूएएस) यांचा समावेश आहे, ज्याचा वापर भारताकडून पाकिस्तानी ड्रोन रोखण्यासाठी करण्यात आला आहे. जगातील सर्वांत प्रगत S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली ८ व ९ मे रोजी झालेल्या हल्ल्यांदरम्यान सक्रिय करण्यात आली होती.
तर, दुसरीकडे पाकिस्तानने २००९ मध्ये चीनबरोबरच्या परवाना करारांतर्गत बुर्राक ड्रोनची निर्मिती करून आपली ड्रोन क्षमता विकसित केल्याचे चित्र आहे. आधुनिक युद्धात लेझर-गाइडेड क्षेपणास्त्रे, बॉम्ब व ड्रोनचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. ड्रोन शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीवर दबाव आणू शकतात किंवा शत्रूची दिशाभूलदेखील करू शकतात. मुख्य म्हणजे हे ड्रोन वादग्रस्त हवाई क्षेत्रात उड्डाण करून, शत्रूच्या लक्ष्यांवर मारा करू शकतात.
इतिहासात ड्रोनचा वापर कसा झाला?
१८०० च्या दशकाच्या मध्यात पहिल्यांदा ड्रोनचा वापर करण्यात आला. प्रामुख्याने फोटोग्राफी, सुरक्षा व पर्यावरणीय अनुप्रयोगांसाठी ड्रोनचा वापर केला जात असे. परंतु, आज आपल्याकडे असलेले ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, युद्धजन्य परिस्थितीत ड्रोनचा वापर केला जात आहे. १९१५ मध्ये निकोला टेस्ला यांनी मानवरहित हवाई लढाऊ वाहनांविषयी लिहिले. हवाई लक्ष्य म्हणून स्वयंचलित ड्रोनचा पहिला वापर १९१६ मध्ये एएम. लो यांनी केला. त्यानंतर पहिल्या महायुद्धापर्यंत डेटन-राईट एअरप्लेन कंपनीने पहिला पायलटलेस टॉर्पेडो शोधून काढला.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्रराष्ट्रे आणि जर्मन सैन्याने मोहिमांमध्ये मदतीसाठी ड्रोनचा वापर केला. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ड्रोन डेव्हलपर्सनी ऑस्ट्रेलियन GAF जिंदिविक आणि बीचक्राफ्टने अमेरिकन नौदलासाठी तयार केलेल्या मॉडेल १०००१ सारख्या तंत्रज्ञानात जेट इंजिनाचा वापर करण्यास सुरुवात केली. ७० च्या दशकाच्या सुरुवातीला इस्रायलने योम किप्पूर युद्धात ड्रोनचा वापर डिकॉय म्हणून केला. याच काळात अमेरिकेने अधिकृत माहिती देत सांगितले की, ते व्हिएतनाममध्ये ड्रोनचा वापर करीत होते. १९८२ मध्ये आर्म्ड फोर्सेस जर्नल इंटरनॅशनलनुसार, अमेरिकेने सांगितले की, त्यांनी युद्धादरम्यान डिकॉय आणि पाळत ठेवण्यासाठी ३,४३५ हून अधिक ड्रोन मोहिमा राबविल्या.
१९८० ते ९० च्या दशकातच अमेरिकन सैन्याने या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास आणि तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली. ९० च्या दशकात अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एएआय कॉर्प आणि इस्रायल येथील मालाट यांना अधिक प्रगत ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंत्राट दिले. ९० च्या दशकाच्या मध्यात अमेरिकन सरकारने ‘द प्रीडेटर प्रोग्राम’ सुरू केला. त्याअंतर्गत ‘एमक्यू-१ प्रीडेटर’ तयार करण्यात आले. त्याच्या पंखांवर हेलफायर अँटी-टँक क्षेपणास्त्र बसविण्यात आले. लोक जेव्हा लष्करी ड्रोनचा विचार करतात तेव्हा प्रीडेटर व रीपर ड्रोनचा उल्लेख सर्वप्रथम होतो.