प्रत्येक हिवाळ्यात राजधानी दिल्ली धुक्याने वेढली जाते. दर हिवाळ्यात दिल्लीला वायुप्रदूषणाचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने १ जानेवारी २०२५ पर्यंत फटाक्यांवर बंदी आणली आहे. सोमवारी पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी फटाक्यांच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केली आहे. सणासुदीच्या आधी दिल्लीत फटाक्यांची साठवणूक, विक्री, त्यांचा वापर आदींना मनाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. राय म्हणाले की, या काळात फटाक्यांच्या वापरामुळे प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या वाढते; ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. पण, या फटाक्यांचा आपल्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो? त्याविषयी जाणून घेऊ.

दिल्लीत फटाक्यांवर पूर्णपणे बंदी

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, हिवाळ्याच्या महिन्यांत वायुप्रदूषणामुळे परिस्थिती लक्षणीयरीत्या बिघडते. वारंवार होणाऱ्या या वायुप्रदूषणामुळे ओढवणाऱ्या संकटाचा सामना करणे शक्य व्हावे या उद्देशाने फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. “फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून नागरिकांचे संरक्षण करता यावे यासाठी हा उपाय आवश्यक आहे. ऑनलाइन डिलिव्हरीपासून विक्रीपर्यंतच्या सर्व ठिकाणी ही बंदी लागू असेल,” असे राय पुढे म्हणाले.

वारंवार होणाऱ्या या वायुप्रदूषणामुळे ओढवणाऱ्या संकटाचा सामना करणे शक्य व्हावे या उद्देशाने फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. (छायाचित्र-एएनआय)

हेही वाचा : ‘SpaceX’ची ऐतिहासिक अंतराळ मोहीम ‘पोलारिस डॉन’ काय आहे? ही मोहीम जगासाठी किती महत्त्वाची?

हिवाळ्याच्या हंगामात प्रत्येक वर्षी राजधानीला सार्वजनिक आरोग्य संकटाचा सामना करावा लागतो. पंजाब आणि हरियाणामधील शेतातील आगीमुळे होणारे प्रदूषण आणि दिवाळीदरम्यान फटाक्यांतून होणाऱ्या उत्सर्जनामुळे एकत्रितपणे दिल्लीतील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४०० व अगदी ४५० च्या पुढे जाऊन गंभीर प्रदूषण पातळीपर्यंत पोहोचतो आणि हे संकट अधिक तीव्र होते. या वायुप्रदूषणाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये बेरियम क्षार असलेल्या सर्व फटाक्यांवर बंदी घातली आणि या प्रदेशात फक्त बेरियम क्षार नसलेल्या हरित फटाक्यांना फोडण्याची परवानगी दिली होती. परंतु, हरित आणि पारंपरिक फटाके यांच्यात फरक करण्यात अडचण येत असल्याने, २०२० पासून राज्य सरकारने प्रत्येक हिवाळ्यात सर्व फटाक्यांवर बंदी घालण्यास सुरुवात केली.

राय म्हणाले की, फटाकेबंदीची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ठोस योजना करण्यात आल्या आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी दिल्ली पोलीस, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (डीपीसीसी) व महसूल विभाग यांच्या समन्वयाने एक संयुक्त योजना विकसित करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त राय म्हणाले की, आप सरकार शहरातील वायुप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी २१ फोकस पॉइंट्सवर आधारित योजना तयार करीत आहे. या योजनेचा एक भाग म्हणून येत्या आठवड्यात त्या दृष्टीने आखलेल्या मोहिमांना सुरुवात होईल आणि रहिवाशांना प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जाईल.

दरवर्षी फटाकेबंदीचा फारसा परिणाम किंवा अवलंब होताना दिसत नाही. (छायाचित्र-रॉयटर्स)

मात्र, दरवर्षी फटाकेबंदीचा फारसा परिणाम किंवा अवलंब होताना दिसत नाही. एनसीआरमध्ये फटाक्यांची खुलेआम विक्री होत असलेला काळाबाजार वाढतो आणि दिवाळीपर्यंत या नियमांचे वारंवार आणि खुलेआम उल्लंघन केले जाते. फटाक्यांच्या बंदीला विरोध करणाऱ्यांचा असा युक्तिवाद आहे की, यामुळे सण आणि परंपरांमध्ये हस्तक्षेप होतो. तसेच, दिल्लीतील प्रदूषणाची याहूनही मोठी कारणे आहेत. “धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवल्याशिवाय दिल्लीतील जनतेला दिलासा मिळू शकत नाही. दरवर्षी दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणून हिंदूंचा दिवाळीचा पारंपरिक आनंद आणि उत्साह नष्ट केला जात आहे. किमान हरित फटाक्यांना परवानगी दिली पाहिजे,” असे भाजपा नेते व दक्षिण दिल्लीचे खासदार रामवीर सिंह बिधुरी म्हणाले.

फटाक्यांमुळे प्रदूषण कसे होते?

फटाके तयार करताना ऑक्सिडायझर, इंधन, कलरिंग एजंट व बाइंडर या चार प्रमुख घटकांचा समावेश केला जातो. फटाक्यांमधील पांढऱ्या रंगासाठी ॲल्युमिनियम, हिरव्यासाठी बेरियम नायट्रेट व निळ्यासाठी तांबे यांसारख्या रासायनिक घटकांचा वापर केला जातो. तर यातील बाइंडर हा घटक सर्वकाही एकत्र ठेवतो. फटाक्यांमध्ये ॲल्युमिनियम, टायटॅनियम, तांबे, स्ट्राँटियम, बेरियम यांसारखे धातूदेखील असतात. हे घटक समस्या अधिक वाढविणारे आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी)नुसार, फटाके फोडताना ते विषारी प्रदूषक सोडतात. हे प्रदूषक श्वसन आणि पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात.

फटाक्यांमुळे आरोग्यास धोका

फटाके पार्टिक्युलेट मॅटर (PM2.5), सल्फर डायऑक्साइड व नायट्रोजन डाय-ऑक्साइड यांसारख्या विषारी वायूंचे घातक मिश्रण सोडतात. हे लहान कण फुप्फुसात खोलवर शिरू शकतात; ज्यामुळे श्वसनासंबंधीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. विशेषत: दमा किंवा ब्राँकायटिस असलेल्या रुग्णांना याचा अधिक प्रमाणात त्रास होऊ शकतो. ही माहिती पंचकुला येथील डॉ. रिधिमा महादेवाने ‘एबीपी न्यूज’ला दिली. आरोग्य मंत्रालयाच्या सल्लागाराकडून असे सांगण्यात आले आहे की, या अल्पकालीन प्रदूषणामुळेही डोळ्यांची जळजळ, खोकला, श्वास घेण्यास अडचण व डोकेदुखी यांसह तीव्र लक्षणे उद्भवू शकतात.

हेही वाचा : काय आहे ‘God of Chaos’? अंतराळातील या अशनीचा पृथ्वीला धोका किती? शास्त्रज्ञ चिंतेत असण्याचे कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्भवती महिलांना फटाक्यांच्या प्रदूषणामुळे अतिरिक्त धोके निर्माण होतात. टेक्नो इंडिया दामा रुग्णालयामधील डॉ. सुनिपा चॅटर्जी यांनी ‘एबीपी न्यूज’ला सांगितले, “स्त्री गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्यास तिला तणावाचा सामना करावा लागू शकतो. उच्च आवाजाच्या पातळीच्या दीर्घकाळापर्यंतच्या प्रदर्शनाचा परिणाम विकसनशील गर्भावरही होऊ शकतो. कारण- तो बाह्य उत्तेजनांच्या बाबतीत अधिक संवेदनक्षम असतो. मोठ्या आवाजामुळे आईच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढू शकते आणि वाढत्या गर्भावर त्याचा अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतो. मुलेदेखील फटाक्यांमुळे असुरक्षित आहेत. हे आरोग्य धोके समजून घेणे आणि आपले आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या रक्षणासाठी सुरक्षित मार्ग शोधणे गरजेचे आहे.