पालघर जिल्ह्यात सातपाटी येथे वापरात असणाऱ्या मासेमारी जेटीमध्ये बोटींना प्रवेश करण्यासाठी खाडीमधील गाळाची अडचण येत आहे. सातपाटी समुद्रकिनाऱ्यालगत नव्याने मासेमारी जेटी उभारण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने शासनाकडे ३५४ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव सादर केला आहे. या जेटीची उभारणी झाल्यास सातपाटी येथील स्थानिक मच्छीमारांना आपल्या मासेमारी बोटी सहजपणे नांगरणे, त्यांची लँडिंग करणे, माशांची हाताळणी व खरेदी-विक्री करण्यासाठी तसेच आवश्यकता भासल्यास साठवण्यासाठीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.
सातपाटी येथे मत्स्यबंदर उभारण्याची गरज का निर्माण झाली?
सातपाटीमध्ये असणाऱ्या सुमारे ३५० बोटींना बंदरामधील चॅनलमध्ये नौकानयन करण्यास बंदरामध्ये साचलेल्या गाळाचा अडथळा निर्माण होत आहे. बंदरामध्ये बोटीने प्रवेश घेण्यासाठी सुमारे ३१०० मीटर लांबीचा आखूड रुंदीचा पट्टा असून समुद्रसपाटीच्या तुलनेत सुमारे दोन मीटरचा गाळ साचला आहे. या बंदरातील संपूर्ण पट्ट्यामध्ये ७० मीटर रुंदीचे चॅनल करण्याच्या कामासाठी किमान ५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्या कामानंतर देखील संपूर्ण पट्ट्यात मेंटेनन्स ड्रेझीन्ग करण्याचे आवश्यक ठरणार आहे. मासेमारी बोटीला तरंगण्यासाठी दोन ते अडीच मीटर पाण्याच्या पातळीची गरज असते. त्या ठिकाणी गाळ असल्याने अष्टमीच्या लगतच्या काही दिवसांत पाण्याची पातळी कमी राहात असल्याने अनेक ठिकाणी मासेमारी बोटीने प्रवास करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नसते. परिणामी अशा वेळेला भरती येईपर्यंत बोटींना चार ते आठ तास बंदराबाहेर समुद्रात नांगरून राहावे लागत असल्याने मच्छीमारांचे नुकसान होते.
गाळ काढण्यासाठी यापूर्वी कसे प्रयत्न झाले?
महाराष्ट्र सागरी मंडळाने गाळ काढण्यासाठी एक वेळा सहा कोटी रुपये खर्चून निविदा काढली होती; मात्र त्यामधून फार काही साधले नाही. झाली नाही. सुमारे ७० हजार घनमीटर गाळ उपसून समुद्रात १० किलोमीटर खोलीवर टाकायचा आहे. तसेच तितक्याच प्रमाणात गाळ काढून समुद्रकिनारी टाकून त्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे गाळ काढण्यासाठी बार्जची आवश्यकता लागणार असून बार्जच्या नौकानयनासाठी किमान तीन मीटर खोली असणे अपेक्षित आहे. त्यामुळे गाळ काढण्याचे काम नौकानयन चॅनेलच्या मुखापासून हाती घेणे आवश्यक ठरले होते. गाळाच्या वाहतुकीसाठी अनेक परवानग्या घेणे अपेक्षित असून या खर्चीक व तांत्रिक अडचणीच्या बाबींमुळे हा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. सातपाटी बंदरातील गाळाची व्याप्ती पाहता ही समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखून मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासेल असे दिसून आले आहे.
नवे मत्स्य बंदर उभारण्यासाठी शासनाने काय प्रस्तावित केले आहे?
मच्छीमारांना सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्यात मत्स्यव्यवसाय विभागाची असली तरीही राज्य शासनाने सातपाटीसह भरडखोल, जीवना, हर्णे व साखरीनाटे या ठिकाणी मत्स्यबंदर व पायाभूत सुविधा उभारण्याचे काम महाराष्ट्र सागरी मंडळाकडे जून २०२१ मध्ये सोपवण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणी नव्याने मासेमारी जेट्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
हेही वाचा : विश्लेषण : टोमॅटोची पुन्हा दरवाढ; का आणि किती दिवस?
मच्छीमारांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून सातपाटी समुद्रकिनारालगत ४०० मीटर लांबीची मासेमारी जेटी प्रस्तावित करण्यात आली आहे. या जेटी प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा अभ्यास करून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) तर्फे अहवाल सादर करण्यात आला आहे. या मत्स्य बंदराच्या उभारणीसाठी पूर्वीच्या २८१ कोटी रुपयांच्या प्रस्तावामध्ये वाढ करून ३५४ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
कशी असेल नवीन सातपाटी मासेमारी जेटी?
सातपाटी येथील मत्स्यव्यवसाय शाळेच्या बाजूने समुद्राकडे उतरणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे २०० मीटर लांबीची ही जेटी उभारण्यात येणार आहे. दक्षिणेच्या बाजूने १००० मीटर लांबीचा व उत्तरेच्या बाजूने ५९७ मीटर लांबीचा ब्रेकवॉटर बंधारा उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी बोट दुरुस्ती, मासे हाताळणी लिलाव व साठवणुकीसाठी जाळी विणणे, गिअर शेड यासाठी सुमारे ७५०० चौरस मीटर तसेच प्रशासकीय इमारत, उपाहारगृह, विश्रांतीगृह, बोट दुरुस्ती शेड, रेडिओ कम्युनिकेशन केंद्र, स्वच्छतागृह यासाठी सुमारे ९०० चौरस मीटर क्षेत्रफळ उपलब्ध राहणार आहे. यासाठी एक लाख ८९ हजार घनमीटर भराव करण्यात येणार आहे. याखेरीस सुमारे ६००० चौरस मीटरचे डांबरी रस्ते, ३००० चौरस मीटरचे काँक्रीटीकरण, २२००० चौरस मीटरचे डब्ल्यूबीएम करणे व ४५० मीटरची संरक्षण भिंत उभारण्याचे काम अंतर्भूत आहे. याखेरीस अस्तित्वात असलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या पूर्वेच्या बाजूला दळणवळण सोयीचे होण्याच्या दृष्टिकोनातून सुमारे ९०० मीटर लांबीचा रस्ता उभारण्यात येणार आहे. त्या बरोबरीने २४०० चौरस मीटरचे पेवर ब्लॉक असणारी पार्किंग सुविधा या बंदराच्या जवळ उभारण्यात येणार असून मासेमारीसाठी सुसज्ज व सुविधायुक्त व्यवस्था उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
हेही वाचा : विश्लेषण: समूह विद्यापीठे म्हणजे काय?
या प्रकल्पाचे फायदे कोणते असतील?
हे मत्स्यबंदर किनाऱ्याच्या लगत असल्याने मासेमारी बोटींना सध्या अस्तित्वात असलेल्या व गाळ साचलेल्या बंदराच्या चॅनलमध्ये प्रवेश घेण्याची गरज भासणार नाही. तसेच गाळामुळे मासे उतरवण्यास अथवा बोटीने मासेमारीसाठी बाहेर पडण्यास होणारा विलंब टळणार आहे. मत्स्य बंदर विकसित केल्याने स्थानिक मच्छीमारांना मासेमारी जहाज सुरक्षितपणे नांगरणे, त्याचे लँडिंग करणे, माशांची हाताळणी करणे, खरेदी-विक्री करणे, मासे साठवणे तसेच त्या ठिकाणी बोटींची दुरुस्ती करणे सोयीचे ठरणार असल्याने मासेमारी व्यवसायात वृद्धी होण्यास मदत होणार आहे.