इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. देशभरात इलेक्ट्रिक स्कूटर्सला आग लागल्याच्या डझनभराहून अधिक घटना घडल्या आहेत. या आगीत काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय खडबडून जागं झालं आहे. उच्चस्तरीय तपास करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दोषी कंपन्यांविरोधात कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. याबाबत एक ट्वीट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

“गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकींशी संबंधित अनेक अपघात समोर आले आहेत. काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. अहवालाच्या आधारे, आम्ही चूक करणाऱ्या कंपन्यांना आवश्यक सूचना जारी करू. इलेक्ट्रिक वाहनांचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करू.” असं ट्वीट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या किती घटना घडल्या आहेत?

गेल्या काही आठवड्यांमध्ये ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा, प्युअर इव्ही आणि जितेंद्र इव्ही यांनी उत्पादित केलेल्या डझनहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सना आग लागली आहे. मार्चमध्ये पुण्यातील गजबजलेल्या व्यावसायिक परिसरात ओला इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी असताना आग लागली. मार्च महिन्याच्या शेवटी एका ओकिनावा स्कूटरला आग लागली आणि त्यात एक व्यक्ती आणि त्याच्या १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या महिन्याच्या सुरुवातीला, जितेंद्र EV ने बनवलेल्या वीसहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटरना नाशिक येथील कंपनीच्या कारखान्यातून नेत असताना आग लागली. ही आगीची आतापर्यंतची सर्वात मोठी घटना होती. बुधवारी, तेलंगणातील निजामाबादमध्ये प्युअर इव्हीने बनवलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली आणि बॅटरीचा स्फोट झाल्याने एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

स्कूटरला आग लागण्याच्या संभाव्य कारणांमागील कारणांचा शोध सुरू असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. त्याशिवाय, प्युअर इव्हीने त्‍याच्‍या २,००० इलेक्ट्रिक स्‍कूटर परत मागवण्‍यास सुरुवात केली आहे. तर ओकिनावाने सुरक्षेच्‍या संभाव्‍य समस्‍यांची तपासणी करण्याासाठी त्‍यांच्‍या ३ हजाराहून अधिक इव्ही रिकॉल करण्‍याची घोषणा केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपास कोण करतंय?
केंद्र सरकारने सेंटर फॉर फायर एक्सप्लोसिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी (CFEES), DRDO आणि IISc बेंगळुरूच्या तज्ज्ञांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या संस्थांमधील तज्ज्ञ आगीच्या प्रत्येक घटनेची फॉरेन्सिक तपासणी करतील.