Did India conduct Operation Whitewash against Pakistan?: वझिरीस्तानमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यापाठीमागे भारताचाच हात असल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराने केला असून, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तो रविवारी ठामपणे फेटाळून लावला. शनिवारी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १६ जवानांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारचे आरोप पाकिस्तानकडून वारंवार करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर २०१२ साली पाकिस्तानच्या १२९ सैनिकांचा आणि ११ नागरिकांचा भारताने जीव घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच घटनेचा घेतलेला हा आढावा.
…ती रात्र पाकिस्तानी सैनिकांसाठी काळरात्र ठरली होती. गयारी सेक्टरमधील सियाचिन ग्लेशियरजवळ असलेल्या पाकिस्तानच्या सैन्यतळावर कोणीही कल्पनाही केली नसेल इतका भयानक मृत्यू सैनिकांच्या वाट्याला आला. सभोवती काळाकुट्ट अंधार होता. या अंधारातही शेकडो मैलावर पसरलेला पांढरा शुभ्र बर्फ फक्त चकाकत होता. आकाशात चांदण्या होत्या, परंतु त्यांचीही चमक या बर्फापुढे फिकी पडावी इतका तो विस्तीर्ण पसरलेला…
हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात असला तरी हिंदू पौराणिक कथानकात हे जगज्जननी अंबेचे माहेरघर… कधी काळी अंबा या भूमीत पार्वती म्हणून हिमवानाच्या अंगणी बागडली होती. तर, येथेच शिवाची अर्धांगिनी ‘काली’ म्हणून नांदली होती. या भागात १२९ सैनिकांचा आणि ११ नागरिकांचा प्राण घेण्याचे खापर पाकिस्तानने भारताच्या कालीवर टाकले होते. या कालीने खरंच पाकिस्तानी सैनिकांचा जीव घेतला होता का?… या वदंतेत किती सत्य आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरत.
७ एप्रिल २०१२ रोजी नेमकं काय घडलं?
या संदर्भातील माहिती सध्या व्हायरल झाली आहे. त्यानुसार ७ एप्रिल २०१२ रोजी पाकिस्तानच्या गयारी सेक्टरमधील १५,००० फूट उंचीवरील ६ व्या नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीच्या बटालियन मुख्यालयाजवळ आलेल्या हिमवादळात किमान १२९ पाकिस्तानी सैनिक ८० ते १०० फूट बर्फाखाली गाडले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना भूसपाटी पासून सुमारे ४५०० मीटर उंचीवर घडली. घटनास्थळी लगेचच बचाव कार्य सुरु करण्यात आले. २९ मे २०१२ रोजी त्या १२९ सैनिकांसह ११ नागरिक बर्फाखाली गाडले गेल्याचे पाकिस्तानने जाहीर केले. ही नैसर्गिक घटना नसून डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) आणि आर अँड ए डब्ल्यू (संशोधन व विश्लेषण विंग) यांनी एकत्रितरित्या राबवलेली मोहीम होती अशी वदंता प्रसिद्ध झाली. याच कथित मोहिमेचा उल्लेख ‘ऑपरेशन व्हाईटवॉश’ म्हणून करण्यात येतो.
‘ऑपरेशन व्हाईटवॉश’ची सोशल मीडियावर ट्रेंड झालेली कथा नेमकी काय आहे?
- २०१२ साली पाकिस्तानच्या गयारी सेक्टरमध्ये आलेल्या हिमस्खलनात १२९ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला.
- ही नैसर्गिक घटना असल्याची अधिकृत नोंद करण्यात आली होती. परंतु, ही घटना भारताचे गुप्त ‘ऑपरेशन व्हाईटवॉश’चा भाग असल्याची वदंता पसरली.
- या कथेची खरी सुरुवात २००९ साली झाल्याचे मानले जाते. त्यावर्षी अति हिमवृष्टीमुळे जवाहर बोगदा बंद झाला होता. काश्मीरला भारताच्या इतर भागाशी जोडणारा हा एकमेव बोगदा होता. त्यामुळे, बीआरओ आणि डीआरडोच्या (DRDO) LASTEC संस्थेला बर्फ हटवण्याचं काम दिलं गेलं. याकामासाठी LASTEC ने आर्टिलरी गनचा वापर केला होता. लेझरचा वापर करून साचलेल्या बर्फाचे लहान लहान तुकडे करण्यात येत होते.
- या लेसर गनवर मोठ्या काळ्या अक्षरात ‘KALI’ असे लिहिले होते. या तंत्रज्ञानामुळे तिथे उपस्थित असलेला R&AW एक अधिकारी प्रचंड प्रभावित झाला. या तंत्रज्ञानाचा वापर लष्करात होऊ शकतो या कल्पनेने त्यांना पछाडलं.
- परत, दिल्लीला पोहोचताच त्याने R&AW चे संजीव त्रिपाठी आणि NSA चे एम. के. नारायणन यांच्याशी चर्चा केली. अनेक प्रयत्नांनंतर लष्करात हे तंत्रज्ञात वापरण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मंजुरी मिळाली आणि ‘ऑपरेशन व्हाईटवॉश’ प्रत्यक्षात आकारास आलं, असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे.
- सियाचिनमधून पाकिस्तानच्या नॉर्दर्न लाईट इन्फंट्री मुख्यालयाला लक्ष्य करता येईल अशा रीतीने योजना आखली गेली. परंतु, त्यासाठी KALI या यंत्राला उंचावर नेण्याची गरज होती. परंतु, १० टनपेक्षा अधिक वजन असणाऱ्या मशीनला २० फूट उंचावर घेऊन जाणे शक्य नव्हते.
- जमिनीवर याचा वापर धोकादायक ठरू शकतो म्हणून हवेतून चाचणी करण्याचे ठरले. यासाठी KALI 50000w हे लेझर शस्त्र IL-76 या विमानात बसवण्यात आलं आणि या शस्त्राची चाचणी ७ एप्रिल २०१२ रोजी करण्यात आली.
- या चाचणीसाठी पहाटे ४ वाजता, ३०,००० फूट उंचीवरून ट्रिगर पॉइंटवर म्हणजेच पाकिस्तानच्या नॉर्दर्न लाईट इन्फंट्री मुख्यालयावर अचूक लेझर फायरिंग करण्यात आलं. परिणामी, सकाळी ५.४० च्या सुमारास जोरदार हिमवादळ आलं आणि पाकिस्तानचं तळ नेस्तनाबूत केलं. पुढच्या १०-१५ मिनिटांत संपूर्ण मुख्यालय १०० फूट बर्फाखाली गाडलं गेलं.
Operation Whitewash
Operation Whitewash ची ही गोष्ट इंटरनेटवर आणि काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर थ्रिलिंग मिलिटरी कॉन्सपिरसी थिअरी किंवा काल्पनिक कथा (fictional story) म्हणून प्रसिद्ध आहे. काही यूट्यूब चॅनल्स आणि ब्लॉग्सनी याची गुप्त भारतीय ऑपरेशन म्हणून नोंद केली आहे. परंतु, DRDO किंवा RAW ने कधीही अशा प्रकारच्या कोणत्याही ऑपरेशनची अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. भारतीय लष्कर किंवा भारत सरकार कडूनही या घटनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती वा विधान करण्यात आलेलं नाही.
भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) किंवा LASTEC नेही कधीच असे कुठलेही शस्त्र प्रत्यक्षात वापरल्याचे म्हटलेले नाही. KALI (Kilo Ampere Linear Injector) प्रकल्प हा भारताचा एक संशोधन प्रकल्प आहे आणि तो मुख्यतः इलेक्ट्रॉन बीम तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रकल्पाचा मूळ हेतू अणु उपकरणांच्या संरक्षणासाठी किंवा उपग्रहनाशक प्रणालींसाठी वापरण्याचा उद्देश होता. २०१२ साली पाकिस्तानच्या गयारी सेक्टरमध्ये प्रत्यक्षात हिमवादळ झाले होते आणि १२९ सैनिक मृत्युमुखी पडले होते, हे सत्य आहे. मात्र, ही घटना नैसर्गिक आपदा म्हणून घोषित करण्यात आली होती आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही तशीच नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या माहितीमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्ट होते आणि त्यामुळे ती एक वदंताच ठरते.