Apache combat helicopters ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपली लष्करी ताकद दाखवली आहे. भारत-पाकिस्तान संघर्षानंतर भारत आपली संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी अनेक आवश्यक पावले उचलत आहे. आता भारताची संरक्षण क्षमता आणखी बळकट होणार आहे. लवकरच अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतात दाखल होणार आहे. ‘AH-64E’ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरमुळे भारताची संरक्षण क्षमता, विशेषतः पश्चिम सीमेवरील भारताची लष्करी ताकद आणि लढाऊ क्षमता वाढणार आहे. कसे आहे अपाचे हेलिकॉप्टर? भारतासाठी या हेलिकॉप्टरचे महत्त्व काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर वायुसेनेत होणार दाखल
लवकरच भारताला अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर मिळणार आहे. हा २०२० मध्ये अमेरिकेबरोबर झालेल्या ६०० दशलक्ष डॉलर्सच्या कराराचा भाग आहे. पुरवठा साखळीतील अडचणी आणि तांत्रिक समस्यांमुळे अमेरिकेकडून अपाचे एएच-६४ई लढाऊ हेलिकॉप्टरची डिलिव्हरी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली. भारतीय लष्कराला मे-जून २०२४ पर्यंत सहा अपाचे हेलिकॉप्टरची डिलिव्हरी अपेक्षित होती. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य झाले नाही. आता ही प्रतीक्षा संपली असून हेलिकॉप्टरची पहिली तुकडी या महिन्यापर्यंत भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्सला सुपूर्त केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे.

६०० दशलक्ष डॉलर्सच्या या करारामुळे भारतीय लष्कराला दोन तुकड्यांमध्ये सहा अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर मिळतील. संरक्षण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या मते, तीन हेलिकॉप्टरची पहिली तुकडी या महिन्याच्या मध्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर दुसरी तुकडी नोव्हेंबरमध्ये मिळणे अपेक्षित आहे. १ जुलै रोजी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्यात झालेल्या फोनवरील संभाषणानंतर हे हस्तांतरण शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. जोधपूरमधील नागतलाव येथे स्थित लष्कराचे ४५१ एव्हिएशन स्क्वॉड्रन मार्च २०२४ मध्ये अपाचे हेलिकॉप्टर चालविण्यासाठी उभारण्यात आले होते. परंतु, १५ महिन्यांहून अधिक काळ या डिलिव्हरीला विलंब झाला आहे.
भारताला नवीन अपाचे हेलिकॉप्टरची आवश्यकता का होती?
- अपाचे हेलिकॉप्टरमुळे नियंत्रण रेषेवर आणि पाकिस्तानशी असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर लष्कराची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
- अलीकडच्या काही वर्षांत या प्रदेशात तणाव आणि शत्रू राष्ट्रातील सैन्याची उपस्थिती वाढली आहे, त्यामुळे या हेलिकॉप्टरची तैनाती महत्त्वाची मानली जात आहे.
- या हेलिकॉप्टरच्या तैनातीमुळे संवेदनशील भूभागात भारत प्रत्युत्तरात्मक हल्ला करण्यास आणखी सक्षम होईल.
- मुख्य म्हणजे याला जमिनीवर तैनात लष्कराला थेट हवाई सहाय्य प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
- भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्सच्या हल्ल्याची क्षमता मजबूत करण्यासाठी AH-64E अपाचे हे महत्त्वाचे मानले जाते.
- भारतीय हवाई दलाकडे आधीच २२ अपाचे हेलिकॉप्टर आहेत. त्यात आता पुन्हा सहा हेलिकॉप्टर दाखल होणार आहेत, यामुळे भारतीय लष्कराची शत्रूवरील हल्ल्याची तीव्रता अनेक पटीने वाढणार आहे.
अपाचे ‘AH-64E’ची वैशिष्ट्ये काय?
AH-64E अपाचे याला अपाचे गार्डियन असेही म्हणतात. हे प्रसिद्ध अपाचे हेलिकॉप्टरची नवीन आणि अत्याधुनिक आवृत्ती आहे. जागतिक स्तरावर सर्वात आधुनिक हेलिकॉप्टरपैकी एक म्हणूनही याला ओळखले जाते. अमेरिकन सैन्याच्या हवाई दलातील या हेलिकॉप्टरची मागणी दिवसागणिक वाढत चालली आहे. आज अनेक देशांतील सैन्य या हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. आतापर्यंत जगभरात १,२८० हून अधिक अपाचे हेलिकॉप्टर सक्रिय आहेत. एकत्रितपणे या हेलिकॉप्टर्सची पाच दशलक्षाहून अधिक उड्डाण तासांची नोंद करण्यात आली आहे. जगभरातील अनेक लढाऊ मोहिमांमध्ये या हेलिकॉप्टरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हेलिकॉप्टरचा AH-64E हा प्रकार किमान २०२८ पर्यंत उत्पादनात असणार आहे आणि त्याला २०६० पर्यंत कार्यरत राहण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
AH-64E मध्ये सुधारित सेन्सर्स, सॉफ्टवेअर, एव्हियोनिक्स आणि शस्त्र प्रणाली आहेत. या हेलिकॉप्टरमधील मॉड्यूलर ओपन सिस्टम्स आर्किटेक्चरमुळे त्यातील नवीन तंत्रज्ञान युद्धभूमीच्या आवश्यकतांनुसार जुळवून घेण्यास सक्षम आहे. त्यात नाइट व्हीजन आणि थर्मल सेन्सर्सदेखील आहे. हे हेलिकॉप्टर बोईंग कंपनीने विकसित केले आहे. त्यांनी हेलिकॉप्टरची चपळता, त्याची रेंज आणि लवचिकता यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्सच्या ताफ्यात अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर, ध्रुव, रुद्र, चित्ता, चेतक, फिक्स्ड-विंग हेलिकॉप्टर, हेरॉन, सर्चर आणि एमआय-१७ यांचा समावेश आहे.
हेलिकॉप्टर आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज
अपाचे गार्डियन आधुनिक रोटरी-विंग एव्हिएशनमधील काही अत्याधुनिक फायरपॉवर आणि एव्हियोनिक्सने सुसज्ज आहे. या विमानात ३० मिलीमीटर M230 चेन गन आहे. तसेच, यात जमिनीवरील आणि हवाई धोक्यांसाठी जवळजवळ १६ AGM-114 हेलफायर क्षेपणास्त्रे आणि हवेतून हवेत मारा करणारे स्टिंगर क्षेपणास्त्रे बसवता येतात. या हेलिकॉप्टरच्या प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे रोटरच्या वरच्या घुमटावर बसवलेले AN/APG-78 लॉन्गबो फायर-कंट्रोल रडार (एफसीआर). ही प्रगत रडार प्रणाली अपाचेला लक्ष्ये शोधण्यास सक्षम करते. रडार एकाच वेळी १२८ लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकतो आणि ३० सेकंदांपेक्षा कमी वेळात त्यापैकी १६ लक्ष्यांवर हल्ला करू शकतो.
या हेलिकॉप्टरमध्ये मॉडर्नाइज्ड टार्गेट अॅक्विझिशन अँड डिझायनेशन सिस्टम (MTADS)देखील आहे. याच्या मदतीने दिवसा/रात्री लेसर डिझायनर्सचा वापर करून अचूक लक्ष्य गाठता येते. ही सिस्टम पायलट नाईट व्हिजन सेन्सर हेल्मेट-माउंटेड इन्फ्रारेड व्हिजन प्रदान करते. रात्रीच्या ऑपरेशनसाठी किंवा कमी प्रकाश असताना याची मदत होते. मुख्य म्हणजे अपाचे MQ-1C ग्रे ईगलसारखे ड्रोन नियंत्रित करू शकते, त्यामुळे देखरेख क्षमता वाढते आणि युद्धभूमीवरील रिअल-टाइम प्रतिमा प्राप्त होते.
अपाचे गार्डियनमध्ये क्रॅश करण्यायोग्य बाह्य इंधन टाक्या, उड्डाणात इंधन भरण्याची क्षमता आहे. त्यामुळे विस्तारित श्रेणीच्या मोहिमांसाठी दारूगोळ्याऐवजी सहाय्यक अंतर्गत इंधन टाकी वापरली जाऊ शकते. भारताच्या विशाल भूभागात, विशेषतः वाळवंटी प्रदेशासाठी हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हेलिकॉप्टरमध्ये डिजिटल कॉकपिट, प्रगत संप्रेषण प्रणाली आणि इंटरनेट सुविधा असल्याने आधुनिक संयुक्त दलाच्या ऑपरेशन्ससाठी हे हेलिकॉप्टर महत्त्वाचे ठरते.
भारताच्या संरक्षण क्षमतेत वाढ
अपाचेची खरेदी करण्यासाठी भारताने केलेला करार देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या देशाच्या व्यापक उद्दिष्टाचा एक भाग आहे. बोईंग आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेड (टीबीएएल) ने जानेवारी २०२३ मध्ये हैदराबाद येथील त्यांच्या केंद्रातून अपाचे हेलिकॉप्टरचा पहिला फ्यूजलेज वितरित केला. हे भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’साठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सध्या भारत सहा हेलिकॉप्टरची खरेदी करणार आहे, मात्र भारतीय लष्कराने भविष्यात अतिरिक्त १८ अपाचे खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. हे हेलिकॉप्टर यूएस फॉरेन मिलिटरी सेल्स (एफएमएस) कार्यक्रमांतर्गत खरेदी केले जात आहेत. या करारात अमेरिकेकडून एअरफ्रेम्स व्यतिरिक्त प्रशिक्षण, युद्धसामग्री, सुटे भाग, इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टम, रडार उपकरणे, प्रमाणपत्र आणि दीर्घकालीन लॉजिस्टिक सपोर्टदेखील देण्यात येणार आहे.