India vs Pakistan Asia Cup 2025 Final Match Highlights Marathi आशिया कप २०२५ ही स्पर्धा तर संपली, पण त्याचे कवित्व दीर्घकाळ रेंगाळत राहील आणि स्पर्धाही सर्वांच्याच दीर्घकाळ स्मरणात राहील. भारताने विजेतेपद पटकावले खरे, मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा पुरते स्पष्ट झाले की, भारत–पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा फक्त खेळ नसतो; तर तो राजकारण आणि राष्ट्रीय सन्मानाचा लढा असतो आणि युद्धाप्रमाणेच लढला जातो. भारतीय संघ तर प्राणाची बाजी लावूनच मैदानावर उतरतो. या वेळच्या सामन्यावर पाकिस्तानचा दहशतवाद आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवादाला ठेचणाऱ्या भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची गडद पार्श्वभूमी होती!
दहशतवाद आणि क्रिकेट
२००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत– पाकिस्तान क्रिकेट सामने जवळपास बंदच झाले होते. फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच हे दोन देश आमनेसामने येत होते. त्यामुळे यातील प्रत्येक सामना हा केवळ स्पर्धात्मक खेळ म्हणून नव्हे, तर युद्ध म्हणूनच खेळला जातो. साहजिकच दोन्ही देशांतील संबंधांचा कडवट इतिहास आणि राजकारणाचे ओझे त्यावर असतेच असते.
पाकिस्तानला वेगळेच पाडायचे तर मग क्रिकेटचा अपवाद कशासाठी?
२०२५ मध्ये आता खेळवण्यात आलेल्या आशिया कपला स्पर्धेला अधिक गंभीर पार्श्वभूमी होती ती, एप्रिल महिन्यात काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची. अशा वेळी पाकिस्तानविरुद्ध खेळायचे का, हा प्रश्न स्वाभाविकच देशभरात चर्चिला गेला. चाहत्यांसाठी मुद्दा होता तो म्हणजे पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नाही तर का खेळावे? आणि राजकीय पातळीवर प्रश्न होता तो म्हणजे, पाकिस्तानला वेगळेच पाडायचे तर मग क्रिकेटचा अपवाद कशासाठी?

राष्ट्र आधी, क्रिकेट नंतर!
पाकिस्तानशी खेळण्याच्या निर्णयावर सर्वाधिक आक्षेप देशभरातून नोंदवले गेले. विरोधी पक्षांनी तर सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग म्हणाला की, “सीमेवर उभा असलेला जवान, त्याचे बलिदान मोठे आहे. त्याच्या तुलनेत एक सामना टाळणे काहीच नाही. राष्ट्र आधी, क्रिकेट नंतर.”
#BoycottPakistan
सोशल मीडियावर तर #BoycottPakistan हॅशटॅग ट्रेण्ड झाला होता. दुबईतील गट फेरीतील भारत–पाकिस्तान सामना विक्रमी गर्दी खेचू शकला नाही, काही आसने रिकामी दिसली. पंजाब किंग्जसारख्या फ्रँचायझींनीही आपल्या पोस्टमध्ये पाकिस्तानचे नाव टाळून या मोहिमेस अप्रत्यक्ष पाठींबाच दिला.
सरकारची भूमिका
या गदारोळानंतर भारत सरकारने धोरण जाहीर केले. क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले की, “भारत– पाक या दोन देशांमध्ये सामन्यांची मालिका होणार नाही. मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतील तर भारत खेळेल. तेथून माघार घेणे म्हणजे पाकिस्तानला वॉकओव्हर देण्यासारखेच असेल.” अर्थात, दोन देशांमधील क्रिकेट मालिकेला दार बंद, पण बहुपक्षीय स्पर्धेत भारताचा सहभाग असेल.
हस्तांदोलन नाहीच
पहिल्याच सामन्यात टॉसच्या वेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन टाळले. सामना संपल्यावरही भारतीय खेळाडूंनी पारंपरिक शुभेच्छा देण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या प्रशिक्षकाने याबाबत नाराजी व्यक्त केली, तर पीसीबीने आयसीसीकडे तक्रारही केली. बीसीसीआयने मात्र हा निर्णय ठामपणे सरकारच्या मार्गदर्शनानुसारच असल्याचे सांगितले. भारताने सामना जिंकला आणि सूर्यकुमारने हा विजय पहलगामच्या हल्ल्यातील शहीदांना अर्पण केला.

सुपर फोर: उचापत्या आणि भडकावणी
दुसऱ्या सामन्यात वातावरण आणखी तापले होते. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने भारतीय फलंदाज बाद झाल्यावर विमान कोसळल्याचे अंगेविक्षेप केले. पाकिस्तानी खेळाडूंनी अनेक उचापत्या करत भारतीय खेळाडूंना भडकावण्याचा जोरदार प्रयत्न केला. आणखी एक पाक खेळाडू साहिबजादा फरहान याने अर्धशतकानंतर बंदुकीच्या गोळ्या झाडल्यासारखा जल्लोष केला. आयसीसीने दंड व इशारे देत ही प्रकरणे हाताळली. दरम्यान, पाकिस्तानी वाहिनी ARY News वरील चर्चेत एका पॅनेलिस्टने थेट स्टेडियममध्ये गोळीबार करून सामना थांबवावा, असे वादग्रस्त वक्तव्य केले, त्यामुळे भारतात सर्वत्र संतापाची लाटच उसळली.
अंतिम सामना : राष्ट्रगीत, इशारे आणि ट्रॉफीनाट्य
- दुबईतील अंतिम सामन्यात तर वाद शिगेलाच पोहोचलेला होता.
- फोटोशूटला नकार : ट्रॉफीबरोबरच्या फोटोशूटसाठी पाकिस्तानचा कर्णधार आणि एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी (पाकिस्तानचे गृहमंत्री ) यांच्यासोबत उभे राहण्यास भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नकार दिला.
- राष्ट्रगीताचा अवमान : भारताच्या राष्ट्रगीताच्यावेळी शाहीद आफ्रिदी व हारिस रौफ गप्पा मारताना कॅमेऱ्यात दिसले. हा भारतीय राष्ट्रगीताचा अवमान होता आणि त्याबद्दल भारतीयांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला.
- बुमराहचेही प्रत्युत्तर: हारिस रौफला बाद केल्यानंतर जसप्रीत बुमराहने ‘विमान कोसळण्या’ची अॅक्शन करत प्रत्युत्तर दिले.
- ट्रॉफीनाट्य : भारताने पाच गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला, पण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानचे गृहमंत्री नक्वी यांच्याहस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. बीसीसीआयने याबाबत स्पष्ट केले की, “ट्रॉफी आम्ही नाकारलेली नाही, पण ती पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांकडून स्वीकारणे आम्हाला मान्य नाही.” परिणामी सादरीकरण ९० मिनिटे थांबले, आणि अखेरीस ट्रॉफी स्टाफने नेली. भारतीय खेळाडूंनी कुटुंबासोबत मैदानावर अनौपचारिक जल्लोष साजरा केला.
पंतप्रधान मोदींचा संदेश आणि लक्ष्यार्थ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले : “#OperationSindoor खेळाच्या मैदानावरही. निकाल तोच – भारताचा विजय!”
हा संदेश सर्वार्थाने महत्त्वाचा ठरला – रणांगण असो किंवा क्रीडांगण, भारतच वरचढ!
भविष्यातील पट
आशिया कप २०२५ चा शेवट भारताच्या विजयाने झाला; पण या स्पर्धेनिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना हे खेळापलिकडे युद्धच असते. भारतीय खेळाडू प्राणाची बाजी लावून खेळतात. सामन्याचे मैदान हा जणू काही भू-राजकीय पटच असतो. हस्तांदोलन न करणं, प्रतिकात्मक इशारे- त्याला भारतीय खेळाडुंनी दिलेले प्रत्युतर, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार हा सारा मुत्सद्देगिरीचाच भाग होता. आणि तिथेही भारताचीच सरशी झाली!