Defence tri service integrated command भारतीय लष्कराने तिन्ही सशस्त्र दलांच्या एकत्रिकरणाच्या दिशेने महत्त्वाचे ऐतिहासिक पाऊल उचलत देशात प्रथमच एकात्मिक लष्करी केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर लष्कर, नौदल व हवाईदल यांच्या शिक्षण शाखांचेही विलिनीकरण करून त्रि-सेवा शिक्षण दल (Tri-Services Education Corps) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भविष्यातील बदलते युद्धतंत्र लक्षात घेऊन हे दोन्ही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जाणून घेऊ, त्या निर्णयांची पार्श्वभूमी आणि कशी असेल भारतीय संरक्षण दलांची भविष्यातील वाटचाल. अलीकडेच कोलकाता येथे झालेल्या संयुक्त कमांडर परिषदेच्या (Combined Commanders’ Conference – CCC 2025) अखेरच्या दिवशी हा निर्णय जाहीर करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या थिएटर कमांड्स उभारणीवरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.
एकात्मिक लष्करी केंद्रे कशासाठी?
संयुक्त लष्करी केंद्र म्हणजे पायदळ, नौदल आणि हवाईदल यांच्या सर्व सोयीसुविधा आणि सेवा (कारवाया) एकत्र आणणे. त्यात लॉजिस्टिक, दुरुस्ती व देखभाल, साठा व पुरवठा, पायाभूत सुविधा यांच्याच बरोबर त्यांच्या रणनीतिक कारवायांचाही समावेश असेल. तिन्ही दलांपैकी एकाच्या हाती केंद्राचे मुख्य नेतृत्व वा सूत्रे असतील अशी प्राथमिक रचना असणार आहे. यामुळे मनुष्यबळ, साधनसामग्री व संरचना यांचा सर्वोत्तम वापर करणे शक्य होईल. भारतीय लष्कराचा भविष्यातील प्रवास हा थिएटर कमांड्सच्या दिशेने होणार असून त्याची पहिली चुणूक या एकात्मिक केंद्रांच्या माध्यमातून पाहायला मिळेल.
ऑपरेशन सिंदूर नंतरचा महत्त्वाचा निर्णय
मे महिन्यात पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमधून भारतीय लष्करालाही अनेक धडे शिकता आले, भविष्यातील सर्व युद्धे ही ‘नेटवर्क सेंट्रीक’ असणार हा यातील सर्वात महत्त्वाचा धडा होता. त्यामुळे त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी एकात्मिक केंद्रांचे उचलण्यात आलेले पाऊल सर्वाधिक महत्त्वाचे आहे. ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही दलांचे एकत्रित यश होते आणि त्या दरम्यान तिन्ही दलांचा एकत्रित उत्तम समन्वय अधोरेखितही झाला.

केंद्रे देशभरात कुठे अस्तित्त्वात येणार?
ही केंद्रे देशभरात कुठे अस्तित्त्वात येणार, हे निश्चित झालेले नसले तरी त्यासाठी चर्चा झालेल्या सहा ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणांचा समावेश आहे. चर्चा झालेल्या उर्वरित ठिकाणांमध्ये बंगळुरू, अहमदाबाद, ग्वाल्हेर आणि सिकंदराबाद यांचा समावेश आहे. मुंबईतील एकात्मिक केंद्राचे नेतृत्व भारतीय नौदलाकडे असण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
त्रि-सेवा शिक्षण दल
तीनही दलांच्या शिक्षण शाखांचे विलिनिकरण करून उभारण्यात येणारे त्रि-सेवा शिक्षण दल हे पाऊलदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे मनुष्यबळ, पायाभूत सुविधा यावर खर्चात बचत तर होईलच पण त्याचबरोबर त्याचा सुयोग्य वापरही करता येईल. याशिवाय प्रशासनिक सुलभता हाही या मागच्या उद्देशांपैकी एक आहे. भविष्यातील प्रवास थिएटर कमांडच्या दिशेने होणार असल्याने प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यावरच एकत्रिकरणास सुरुवात व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
थिएटरायझेशनवरील मतभेद
या निर्णयांची पार्श्वभूमी म्हणजे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली थिएटरायझेशन प्रक्रिया. यात तिन्ही दलांनी एका विशिष्ट भौगोलिक विभागात एकत्रित ‘थिएटर कमांड’ संरचनेखाली कार्यरत राहावे असे अपेक्षित आहे. या संदर्भात लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी यांच्या मते थिएटरायझेशनला पर्याय नाही ते अटळ आहे. मात्र, हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. मर्यादित लढाऊ साधनसंपत्ती विभागली गेल्यास हवाई शक्ती कमकुवत होईल. असे त्यांचे मत आहे. त्याऐवजी नवी दिल्लीमध्ये चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी अंतर्गत संयुक्त नियोजन व समन्वय केंद्र उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.
भविष्यातील धोके आणि तंत्रज्ञानाधारित युद्ध
सरकारने दिलेल्या निवेदनानुसार, परिषदेत तिसऱ्या दिवशी भविष्यातील धोके, आव्हाने आणि वेगाने बदलणारे सुरक्षेचे स्वरूप यावर भर देण्यात आला. या सत्रात अंतराळ, सायबर, माहिती व विशेष कारवाया या क्षेत्रांमध्ये सुधारणांची गरज अधोरेखित करण्यात आली. सीडीएसने घेतलेल्या मार्गदर्शन सत्रात गेल्या वर्षभरातील सुधारणांचा आढावा, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या सूचनांनुसार आखलेली कृती योजना यांचे विवेचन करण्यात आले. तसेच निर्णयप्रक्रियेतील गतीवर भर देत आधुनिक युद्धासाठी तंत्रज्ञानाधारित दृष्टीकोन आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.
परिषदेचा निष्कर्ष
सरकार या परिषदेअखेरीस जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “संयुक्त कमांडर परिषद २०२५ यशस्वीरित्या पार पडणे हे भारतीय लष्कराचे एकात्मिक, तंत्रज्ञानसंपन्न व कार्यक्षम दलात रूपांतर घडविण्याच्या दिशेने पडलेले मोठेच पाऊल आहे. तिन्ही सशस्त्र दले बहुविध धोके पत्करण्यास, राष्ट्रहिताचे रक्षण करण्यास, तसेच जागतिक शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास सक्षम असेल!”