तंत्रज्ञानप्रेमींसाठी आता एक नवीन देश उभारण्यात येत आहे. ही संकल्पना भारतीय वंशाचे तंत्रज्ञान उद्योजक बालाजी श्रीनिवासन यांची आहे. नवीन देश तयार करण्यासाठी त्यांनी सिंगापूरजवळ एक खासगी बेट खरेदी केले आहे. या ठिकाणी ते ‘नेटवर्क स्टेट’ नावाचा देश तयार करणार आहेत. हा देश तंत्रज्ञानप्रेमी, उद्योजक, संस्थापकांसाठी असणार आहे. अनेक वर्षांपासून तंत्रज्ञानप्रेमींसाठी असा एक देश असावा, अशी त्यांची इच्छा होती. आता ते लवकरच ही इच्छा प्रत्यक्षात उतरवणार आहेत.
बालाजी श्रीनिवासन हे कॉइनबेसचे माजी मुख्य तांत्रिक अधिकारी (सीटीओ) व सिलिकॉन व्हॅलीतील विविध उपक्रमांचे सह-संस्थापकदेखील राहिले आहेत. ते तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक डिजिटल देश तयार करण्याचा विचार करीत आहेत. त्यांच्या कल्पनेतील हा प्रकल्प एकेकाळी भविष्यातील एखाद्या प्रयोगासारखा वाटत होता; परंतु आता तो प्रत्यक्षात उतरणार आहे, असे त्यांचे सांगणे आहे. त्यामुळे सध्या जागतिक पातळीवर या विषयाची चर्चा सुरू आहे. हा नवीन देश कसा असेल? नवीन देश उभरण्यामागील त्यांचा उद्देश काय? कोण आहेत बालाजी श्रीनिवासन? त्याविषयी जाणून घेऊ….
डिजिटल फर्स्ट कंट्री
- टेक क्रंचच्या वृत्तानुसार, बालाजी यांचा असा दावा आहे की, ही जगातील पहिली ‘डिजिटल फर्स्ट कंट्री’ असेल.
- याचे नागरिकत्व देण्यासाठी तंत्रज्ञ, नवोन्मेषक, तंत्रज्ञान संस्थापक व जिमप्रेमींना प्राधान्य दिले जाईल.
- बालाजी यांनी त्यांच्या ‘द नेटवर्क स्टेट’ या पुस्तकात त्यांच्या या स्वप्नाविषयी सविस्तर लिहिले आहे.
- या बेटावर ‘द नेटवर्क स्कूल’ही सुरू करण्यात आले आहे. हा तीन महिन्यांचा कार्यक्रम आहे. त्यात उद्योजकता, उदयोन्मुख तंत्रज्ञान व वैयक्तिक परिवर्तन आदी बाबी शिकविल्या जात आहेत.

या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या व्यक्ती संपूर्ण दिवस कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन व स्टार्टअप इनोव्हेशनवरील कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन व्यतीत करतील. श्रीनिवासन यांनी ‘एक्स’वर याबाबत पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी, “आम्हाला एक बेट मिळाले. ते बरोबर आहे. बिटकॉइनच्या सामर्थ्याने, आता आपल्याकडे सिंगापूरजवळ एक सुंदर बेट आहे, जिथे आपण नेटवर्क स्कूल बांधत आहोत”, असे म्हटले आहे. बालाजी यांनी २०२४ मध्ये ‘नेटवर्क स्टेट’ अशा देशाच्या स्वप्नावर आधारित द नेटवर्क स्कूल सुरू केले. सप्टेंबर २०२४ मध्ये मलेशियामध्ये पहिले नेटवर्क स्कूल स्थापन करण्यात आले. दुबई, टोकियो व मियामीमध्येही अशा शाळा स्थापन करण्याची त्यांची तयारी आहे.
एक नवीन प्रकारचे राष्ट्र
बालाजी यांच्या नेटवर्क स्कूल प्रोग्रामशी संबंधित निक पीटरसन यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमधील व्हिडीओद्वारे लोकांना या नवीन देशाची व्हर्च्युअल टूर करवली आहे. त्यामध्ये त्यांनी या देशात राहणाऱ्या व्यक्तीसाठी संपूर्ण दिवस कसा असेल हे स्पष्ट केले आहे. विद्यार्थी जिम सत्राने दिवसाची सुरुवात करतील आणि नंतर एआय, तंत्रज्ञान आणि इतर विषयांवर आधारित सेशन घेतील. हे सर्व निसर्गाच्या सानिध्यात घडेल, जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष प्रयोगही करता येतील.
शाळेची वैशिष्ट्ये काय?
शारीरिक तंदुरुस्ती : समग्र वाढीला चालना देण्यासाठी जिम सेशन
कटिंग-एज विषय : कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन व उद्योजकतेवरील सेशन
नवोपक्रम आणि उद्योजकता : वैयक्तिक, शारीरिक व व्यावसायिक विकासाला प्रोत्साहन देणे
श्रीनिवासन म्हणाले, “आम्ही अशा लोकांना शोधत आहोत, जे वैयक्तिक सुधारणेकडे आणि सामूहिक सुधारणेवर लक्ष केंद्रित करू इच्छितात आणि ‘विन-अँड-हेल्प-विन’, असा समाज निर्माण करू इच्छितात. आम्ही कामगार, तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेले बेरोजगार, ऑनलाइन निर्माते, वैयक्तिक प्रशिक्षक, कार्यक्रम नियोजक अशा सर्व तंत्रज्ञानप्रेमींचा शोध घेत आहोत. आम्ही विशेषतः अशा लोकांचा शोध घेत आहोत, जे आपल्या नव्या पिढीला तंत्रज्ञान शिकण्यास, क्रिप्टोकरन्सी कमवण्यास, कॅलरी बर्न करण्यास मदत करू इच्छितात”, असेही ते म्हणाले.
बालाजी एस. श्रीनिवासन कोण आहेत?
बालाजी एस. श्रीनिवासन हे भारतीय-अमेरिकन उद्योजक, गुंतवणूकदार व लेखक आहेत. ते जे तंत्रज्ञान व क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म २४ मे १९८० रोजी तमिळनाडू येथे झाला. त्यांचे आई-वडील दोघेही डॉक्टर होते. न्यू यॉर्कमधील प्लेनव्ह्यू शहरात त्यांचे बालपण गेले. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बीएस, एमएस व पीएच.डी. पदवी प्राप्त केली आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून केमिकल इंजिनियरिंगमध्ये एमएस पदवी प्राप्त केली आहे. बालाजी श्रीनिवासन हे कौन्सिल इंक.चे सह-संस्थापक आहेत. ही आनुवंशिक चाचणी कंपनी २०१८ मध्ये मायरियाड जेनेटिक्सने ३७५ दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतली होती.
बालाजी हे २१ इंक. (नंतर Earn.com म्हणून ओळखली जाणारी)चेदेखील सह-संस्थापक आहेत. बिटकॉइनशी संबंधित ही स्टार्टअप कंपनी नंतर कॉइनबेसने विकत घेतली. या कंपनीमध्ये बालाजी यांनी २०१८ ते २०१९ पर्यंत मुख्य तांत्रिक अधिकारी (सीटीओ) म्हणून काम केले. ते बिटकॉइन, इथरियम, अल्केमी व ओपनसी यांसह अनेक टेक आणि क्रिप्टो उपक्रमांमध्ये गुंतवणूकदार राहिले आहेत.
त्यांनी ‘द नेटवर्क स्टेट : हाऊ टू स्टार्ट अ न्यू कंट्री (२०२२)’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी या नव्या देशाविषयीची सविस्तर माहिती लिहिली आहे. २०२४ मध्ये त्यांनी मलेशियामध्ये या कल्पनांवर आधारित ‘द नेटवर्क स्कूल’ सुरू केले. काही टीकाकार त्यांच्या संकल्पनांची तुलना आधुनिक वसाहतवादाशी करतात. श्री श्रीनिवासन हे एक्स आणि सबस्टॅक यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. या प्लॅटफॉर्मवर ते तंत्रज्ञान, प्रशासन व संपत्ती निर्मितीवर आपले विचार मांडताना दिसतात.