Delhi Goa IndiGo Flight Emergency Landing इंडिगोच्या दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. १६ जुलै रोजी दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या वैमानिकाने ‘पॅन-पॅन-पॅन’ असा आपत्कालीन संदेश पाठवला. या घटनेमुळे काही काळ विमानातील प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. १९१ प्रवाशांना घेऊन जाणारे एअरबस ए३२०निओ विमानात प्रवासादरम्यान कॉकपिटमध्ये तांत्रिक बिघाड आढळला. मात्र, ‘मेडे-मेडे’ संदेशाऐवजी वैमानिकाने ‘पॅन-पॅन’ असा संदेश दिला. अहमदाबाद विमान अपघाताच्या शेवटच्या क्षणी वैमानिकाने मेडे हा संदेश दिला होता. वैमानिकाने दिलेला ‘पॅन-पॅन’ संदेश नक्की काय आहे? हा आपत्कालीन संदेश कधी दिला जातो? इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानात नक्की काय घडले? त्याविषयी जाणून घेऊयात.

इंडिगोच्या विमानात काय घडले?

  • १६ जुलैच्या रात्री दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक ६ई२०९१ एअरबस ए३२०निओतील वैमानिकांना एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला.
  • त्यानंतर लगेचच हे विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले. ‘हिंदुस्तान टाईम्स’ला नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने माहिती दिली.
  • त्यांनी म्हटले, वैमानिकाने इंजिन क्रमांक १ मध्ये बिघाड झाल्यामुळे एटीसीला ‘पॅन पॅन पॅन’ असा संदेश पाठवला.
  • इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की, तांत्रिक बिघाड असल्याने विमान वळवण्यात आले.
  • ‘पीटीआय’च्या एका सूत्राने सांगितले की, हा संदेश मिळताच मुंबईतील हवाई वाहतूक नियंत्रण आणि ग्राउंड टीमने त्वरित कारवाई केली आणि विमानतळावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली.
१६ जुलैच्या रात्री दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक ६ई२०९१ एअरबस ए३२०निओतील वैमानिकांना एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. (छायाचित्र-रॉयटर्स)

इंडिगोच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले, “१६ जुलै रोजी दिल्लीहून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे उड्डाण करत असताना फ्लाइट ६ई २०९१ मध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. मानक प्रक्रियांनुसार विमान वळवण्यात आले आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.” एअरलाइन्सने बिघाडाचे नेमके स्वरूप अधिकृतपणे उघड केलेले नाही. मात्र, पुन्हा उड्डाण करण्यापूर्वी प्रभावित विमानाची कसून तपासणी आणि देखभाल केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. याचदरम्यान प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत म्हणजेच गोव्यात नेण्यासाठी एका बदली विमानाची व्यवस्था करण्यात आली.

पॅन-पॅन कॉल म्हणजे काय?

‘पॅन’ हा शब्द ‘मेडे’इतका परिचित नाही, परंतु तो विमान वाहतूक आपत्कालीन संदेशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पॅन पॅन पॅन हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरला जाणारा रेडिओ मेसेज आहे. हा वाक्यांश फ्रेंच शब्द ‘Panne’पासून आला आहे. त्याचा अर्थ बिघाड किंवा यांत्रिक बिघाड असा होतो. जेव्हा वैमानिक रेडिओवरून तीन वेळा पॅन-पॅन असा संदेश पाठवतात, तेव्हा ते हवाई वाहतूक नियंत्रण आणि जवळच्या विमानांना सूचित करतात की, विमान तांत्रिक समस्येचा सामना करत आहे. याचाच अर्थ त्यावेळी विमानाला सुरक्षित वळवणे, आपत्कालीन लँडिंग क्लिअरन्स किंवा ग्राउंड सपोर्ट यांसारख्या मदतीची आवश्यकता आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘पॅन पॅन’ याचा अर्थ विमानाला गंभीर समस्या आहे, परंतु ती जीवघेणी नाही आणि त्यामुळे तात्काळ धोक्याची शक्यता कमी आहे, असा होतो. परंतु, विमानाला आपत्कालीन लँडिंगची आवश्यकता आहे असाही याचा अर्थ होतो. वैद्यकीय अडचण किंवा इतर गोष्टींसाठीही पॅन कॉल दिला जातो. अलीकडील इंडिगो प्रकरणात’पॅन-पॅन’ संदेश देण्यात आला तेव्हा परिस्थिती गंभीर होती, परंतु वैमानिकांनी आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळली; त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि विमान सुरक्षितपणे मुंबईला उतरवण्यात आले.

मेडे म्हणजे काय?

मेडे कॉल हा शब्द विमान वाहतूक क्षेत्रात संकटाचा इशारा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत जिथे धोक्याची शक्यता वाटते, तिथे वैमानिक मेडे कॉल देतो. विमान वाहतुकीच्या क्षेत्रात मेडे कॉल हा तात्काळ गंभीर संकटाचा इशारा मानला जातो. मेडे हा फ्रेंच शब्द असून ‘m’aider’ पासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ होतो ‘मला मदत करा.’

पॅन-पॅन आणि मेडेमध्ये फरक काय?

‘पॅन-पॅन’ आणि ‘मेडे’ हे दोन्ही शब्द विमान वाहतूक क्षेत्रात संकटाचा इशारा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. तातडीची गरज असताना, तांत्रिक बिघाड, विमानातील किरकोळ वैद्यकीय समस्या किंवा बिघाड असल्यास पॅन-पॅन संदेश पाठवला जातो. या परिस्थितीत समस्या गंभीर असते, परंतु विमान, विमान कर्मचारी किंवा प्रवाशांना धोका नसतो. दुसरीकडे, मेडे हा आपत्कालीन संदेश गंभीर संकटाच्यावेळी पाठवला जातो. अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत धोक्याची शक्यता वाटल्यास वैमानिक तीनवेळा मेडे, मेडे, मेडे म्हणतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उड्डाणावेळी इंजिनमध्ये बिघाड, आग लागणे, उड्डाण नियंत्रण किंवा विमान नियंत्रण क्षमतेत बिघाड झाल्यास हा संदेश पाठवला जातो. मेडे संदेश पाठवल्यास हवाई वाहतूक नियंत्रण, विमानतळ अग्निशमन आणि बचाव सेवा व परिसरातील इतर विमानांकडून संपूर्ण आपत्कालीन प्रतिसाद सुरू होतो. मेडे परिस्थितीचे अलीकडील उदाहरण म्हणजे जूनमध्ये अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच २४२ जणांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. वैमानिकांनी मेडे, मेडे, मेडे असा संदेश पाठवला आणि त्यानंतर विमानाशी संपर्क तुटला. विमान विमानतळाजवळील एका रहिवासी भागात कोसळले आणि मोठी जीवितहानी झाली.