भक्ती बिसुरे
जगातील सहापैकी एका व्यक्तीला वंध्यत्वाच्या (इन्फर्टिलिटी) विकाराने ग्रासले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून नुकतीच समोर आली आहे. महिला आणि पुरुष या दोघांचाही वंध्यत्व विकारग्रस्तांमध्ये समावेश आहे. जगातील सुमारे १७.५ टक्के नागरिकांना वंध्यत्वाच्या समस्या आहेत. गरीब आणि श्रीमंत यांपैकी कोणीही याला अपवाद नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. त्यानिमित्ताने वंध्यत्व या वैद्यकीय समस्येबाबत अधिक माहिती देणारे हे विश्लेषण.
वंध्यत्व म्हणजे काय?
कोणत्याही वैद्यकीय परिभाषेव्यतिरिक्त सांगायचे, तर एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिकरीत्या गर्भधारणेसाठी प्रयत्न करूनही गर्भ राहत नसेल, तर त्या स्त्री आणि पुरुषापैकी कोणी वंध्यत्वाने ग्रासलेले असण्याची शक्यता असते. वंध्यत्व हा केवळ महिलांचा आजार आहे असा समज आजही रूढ आहे. मात्र प्रत्यक्षात महिला आणि पुरुष अशा दोघांनाही वंध्यत्व आजार असणे शक्य आहे. वंध्यत्व विकार उपचारांनी बरे होतात. तसेच आयव्हीएफसारख्या आधुनिक तंत्र, उपचारांचा वापर करूनही गर्भधारणा होणे आता शक्य झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल काय सांगतो?
जगातील सहापैकी एका व्यक्तीला वंध्यत्वाशी संबंधित समस्या असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. जगातील नागरिकांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण सुमारे १७.५ टक्के एवढे असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. जगातील अनेक देशांमध्ये वंध्यत्व या आजाराबाबत नेमक्या माहितीचे संकलन नाही. त्यामुळे उपलब्ध माहितीवरून निघणारे १७.५ टक्के वंध्यत्व आजारांच्या रुग्णांबाबतचे निष्कर्ष हे अत्यंत त्रोटक असण्याची शक्यता असून, प्रत्यक्षात ते किती तरी अधिक असण्याची शक्यताही जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. माहितीचे संकलन करताना वय, लिंग, आजार, कारणे अशा सर्वसमावेशक माहितीची गरज व्यक्त करण्यात आली आहे. वंध्यत्व निवारणासाठी उपलब्ध ‘आयव्हीएफ’सारख्या उपचारांबाबत असलेले गैरसमज, त्यांबाबत माहितीचा अभाव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असलेल्या किमती यामुळे त्यांचा वापर आजही अनेक विकसनशील देशांमध्ये स्वीकारार्ह नाही, ही वस्तुस्थिती आहे, याकडे जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष वेधले आहे.
विश्लेषण: रस्तेदुरुस्तीचे लेखापरीक्षण आयआयटीकडून करण्याची वेळ ठाणे महापालिकेवर का आली?
समज आणि गैरसमज…
वंध्यत्व हा आजार आहे, तो उपचारांनी बरा होतो याबाबत जगातील अनेक देशांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात अज्ञान आढळते. वंध्यत्व हा केवळ महिलांचा आजार आहे हा एक समज सार्वत्रिक आहे. मात्र महिला आणि पुरुष हे दोन्ही वंध्यत्वाने ग्रासलेले दिसून येतात. मूल न होणे हा दोष दुरुस्त करण्यासाठी अशास्त्रीय मार्गांची मदत घेतली जाते. त्यातून महिलांचे शोषणही होते. त्याऐवजी विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक वैद्यकातील चाचण्या आणि उपाययोजना यांची मदत घेतली असता वंध्यत्वाचे निवारण शक्य आहे, याकडेही तज्ज्ञ मंडळी लक्ष वेधतात.
वंध्यत्व आणि उपचार…
वंध्यत्वाशी निगडित समस्यांचे जगातील वाढते प्रमाण लक्षात घेता वंध्यत्व उपचार सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीला उपलब्ध करून देणे, त्यासाठी संशोधनाला चालना देणे या बाबींची गरज जागतिक आरोग्य संघटनेकडून या अहवालाच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आली आहे. बहुतांश देशांमध्ये वंध्यत्व विकारांचा प्रभाव असून, त्यावरील उपचारांसाठी कोणत्याही योजनांची मदत नाही. त्यामुळे गरीब देशांतील नागरिकांना त्यांच्या उत्पन्नातील मोठा भाग वंध्यत्व उपचारांवर खर्च करावा लागतो, असे निरीक्षणही जागतिक आरोग्य संघटनेकडून नोंदवण्यात आले आहे. जगातील कोणत्याही देशात शहरी मध्यमवर्गीय नागरिकांसाठी वंध्यत्वावरील उपचार हे खर्चिकच आहेत. त्यामुळे गरीब किंवा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या ते आवाक्यातच नाहीत, याकडे जागतिक आरोग्य संघटना लक्ष वेधते.
वंध्यत्वाची कारणे…
सध्याच्या परिस्थितीत वाढते वय हे वंध्यत्वामागील एक प्रमुख कारण आहे. शिक्षण, नोकरी, विवाहाचे लांबणारे वय अशा अनेक कारणांमुळे मूल जन्माला घालण्याचे वयही वाढत किंवा लांबत आहे. त्या वयापर्यंत अनेक महिला आणि पुरुषांना वंध्यत्व विकारांनी ग्रासलेले दिसते. कामाच्या ठिकाणी वाढलेली स्पर्धा, जीवनशैलीचा वेग आणि त्यामुळे वाढते ताणतणाव हेही वंध्यत्व विकारांना निमंत्रण देतात. झोपेच्या वेळा, आहारातील जंक फूडचे प्रमाण, व्यायामाचा अभाव हे इतर अनेक जीवनशैलीजन्य आजारांप्रमाणेच वंध्यत्वाचेही कारण ठरते. महिला आणि पुरुष यांच्यामधील वाढती व्यसनाधीनता, धूम्रपान, मद्यपान यामुळे वंध्यत्वाशी संबंधित विकार वाढतात. तज्ज्ञांचे मार्गदर्शन न घेता ‘डाएट’ म्हणून विविध आहारशैलींचा केलेला प्रयोगही वंध्यत्वाला कारणीभूत ठरताे. त्यामुळेच जीवनशैलीतील बदल असो, की गर्भधारणा न होणे, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, त्याप्रमाणेच योग्य औषधोपचार आणि दैनंदिन सवयींचे वेळापत्रक राखणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
bhakti.bisure@expressindia.com