Doomsday Fish २०२५ या वर्षात एकापाठोपाठ एक अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. आता समुद्रात आढळून आलेल्या एका माशाने जगाच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे. किनारपट्टी भागावर खोल समुद्रात आढळणारा मासा दिसल्याने भीती व्यक्त केली जात आहे. या माशाचे नाव आहे ओअरफिश. हा मासा डुम्सडे फिश म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर ओअरफिशचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
लोककथांनुसार हा मासा दिसल्यास काही अघटित घडणार आहे असे मानले जाते. अलीकडेच भारतातील किनारपट्टी भागातही हा मासा दिसल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या माशाविषयीचे हे दावे आताचे नसून अगदी शतकानुशतकापासून करण्यात येत आहेत. परंतु, या दाव्यांमध्ये खरंच काही तथ्य आहे का? ओअरफिश काय आहे? शास्त्रज्ञ या माशाविषयी काय सांगतात? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

‘डुम्सडे फिश’ दिसल्याने चिंता का वाढली?
‘डुम्सडे फिश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माशाला रेगेलेकस ग्लेस्ने म्हणून ओळखले जाते. हा मासा रेगेलेसिडे कुटुंबातील आहे. हा जगातील सर्वात लांब हाडांचा मासा आहे, ज्याची लांबी तब्बल ३६ फूट (११ मीटर) असते. महाकाय ओअरफिश समुद्राच्या मेसोपेलेजिक झोनमध्ये राहतात. मेसोपेलेजिक झोन पृष्ठभागाच्या खाली ६६० ते ३,३०० फूट (२०० ते १,००० मीटर) खोल असतात. या खोलीत प्रकाश खूप कमी असतो आणि तापमान अधिक थंड असते. हा मासा खोल समुद्रात राहत असल्याने मासा दिसणे अत्यंत दुर्मीळ आहे. बहुतांशवेळा आजारी असल्यास किंवा त्यांचा मृत्यू जवळ आला असल्यास ते किनाऱ्यानजीक आढळून येतात. त्यांचे शरीर सापासारखे आणि त्वचा चांदीसारखी चमकदार असते. त्यांच्या संपूर्ण शरीरावर छोटे पंख असतात, त्यामुळे ते दिसायला भयंकर दिसतात; यामुळेही त्यांचा संबंध आपत्तींशी जोडण्यास हातभार लागतो.
ओअरफिशला ‘डुम्सडे फिश’ का म्हणतात?
- जपानी लोककथांमध्ये ओअरफिशला ‘रयुगु नो त्सुकाई’ असे म्हणतात.
- त्याचा अर्थ समुद्रातील देवदूत असा होतो.
- ऐतिहासिकदृष्ट्या हा मासा दिसल्यास भूकंप किंवा त्सुनामीचा इशारा म्हणून अर्थ लावला जात असे.
- असे मानले जाते की, ते समुद्रात खोलवर राहणाऱ्या देवांकडून येणारा संदेश असतात.
- पॅसिफिक आणि आशियातील इतर किनारी समुदायांमध्येही अशाच प्रकारची मान्यता आहे.
- ते ओअरफिश दिसणे हे दुर्दैव, मृत्यू किंवा नैसर्गिक आपत्तींचे संकेत मानतात.
२०११ च्या त्सुनामीचे संकेत ओअरफिशने दिले होते का? काय आहे डूम्स डे सिद्धांत?
२०१० मध्ये जपानच्या किनाऱ्यावर अनेक मृत ओअरफिश आढळून आले होते. काही महिन्यांनंतर, मार्च २०११ मध्ये विनाशकारी तोहोकू भूकंप आणि त्सुनामी आली होती. या भूकंपात १५,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. शास्त्रज्ञांनी दोन्ही घटनांचा संबंध फेटाळला होता. परंतु, आता पुन्हा एकदा या जुन्या समजुती या व्हिडीओद्वारे पसरत आहेत.

ओअरफिश दिसण्याचे प्रमाण का वाढले?
गेल्या दशकाभरात ओअरफिश दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण हवामान बदल असू शकते. परंतु, सध्या लोक समुद्राशी संबंधित सामग्रीचे चित्रीकरण करत असल्याने आणि ते शेअर करत असल्यानेदेखील ओअरफिश दिसण्याचे प्रमाण वाढले आहे, असे वाटू शकते. अलीकडच्या काळात ओअरफिश दिसल्याच्या घटना खालीलप्रमाणे:
- २०२२ : तैवानजवळ १३ फूट उंचीचा ओअरफिश दिसल्याने अफवा पसरल्या होत्या.
- २०२३ : लुझोनमध्ये ६.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या काही दिवस आधी फिलीपिन्समध्ये एक ओअरफिश दिसला होता.
- २०२५ : मेक्सिकोतील बाजा कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर एका जिवंत ओअरफिशचे चित्रीकरण करण्यात आले होते.
ओअरफिश दिसणे भूकंपाचे संकेत असू शकतात का?
वैज्ञानिक संशोधनात ओअरफिश दिसणे आणि टेक्टोनिक क्रियाकलापांचा संबंध असल्याचे कोणतेही निर्णायक पुरावे आढळलेले नाहीत. बुलेटिन ऑफ द सिस्मोलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकामध्ये प्रकाशित झालेल्या २०१९ च्या एका पेपरमध्ये, संशोधकांनी ओअरफिश दिसण्याच्या अनेक घटनांचा आढावा घेतला आणि त्यांना भूकंपाच्या घटनांशी याचा संबंध आढळून आला नाही.
ओअरफिश किनारपट्टी भागात दिसण्याचे कारण काय?
- दुखापती किंवा आजारामुळे हा मासा वर येऊ शकतो.
- पाण्याखालील ध्वनी प्रदूषण किंवा तापमानातील बदलांमुळे दिशाभूल झाल्यास.
- खोल पाणी आणि त्यातील प्राण्यांना पृष्ठभागाच्या जवळ आणणाऱ्या घटना घडल्यास.
- हवामान बदल आणि समुद्राचे तापमान वाढल्यास.
ओअरफिश हा खोल समुद्रात राहणारा जीव आहे आणि समुद्राच्या तळातील बदलांप्रती तो संवेदनशील असतो, त्यामुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात व्यत्यय आल्यासही हा मासा वर येतो.