इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायजिंग लायन’ सुरू केल्याची घोषणा केली असून इराणच्या तेहरानमधील अनेक लष्करी तळांवर इस्त्रायलने हवाई हल्ले केले आहेत. प्रामुख्याने इस्त्रायलकडून इराणमधील आण्विक तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे की, इस्त्रायलला असणारा धोका पूर्णपणे निपटून काढल्याशिवाय हे ऑपरेशन थांबविण्यात येणार नाही. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या संदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून या हल्ल्यांबाबत माहिती दिली आहे.
हे हल्ले दोन दिवसांपासून सुरू असून या हल्ल्यांत इराणमधील १३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात तेहरानमधील इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. इस्त्रायलने इराणच्या अणुस्थळांवर लढाऊ विमानांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे प्रदेशातील तणाव वाढला आहे आणि हल्ल्यानंतर किरणोत्सर्ग म्हणजेच रेडिएशन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आण्विक तळांवर बॉम्बहल्ला झाल्यास नक्की काय होतं? याचे परिणाम किती विनाशकारी असतात? त्याविषयी जाणून घेऊयात.

इस्त्रायलचे ऑपरेशन रायझिंग लायन
- ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्त्रायलने इराणच्या नॅटांझ अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केला.
- या हल्ल्यामुळे अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बहल्ला करण्याच्या धोक्यांबद्दल पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.
- आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) महासंचालक राफेल ग्रोसी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर हे स्पष्ट केले आहे की, ६० टक्क्यांपर्यंत युरेनियम साठवण्यात आलेल्या नॅटांझच्या पायलट फ्युएल एनरिचमेंट प्लांटचा वरील भाग नष्ट झाला आहे.
- त्यामुळेच या ठिकाणी किरणोत्सर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
- महत्त्वाचे म्हणजे, बाह्य किरणोत्सर्गाची पातळी अपरिवर्तीत राहिली आहे, जी आजूबाजूच्या पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचे दर्शवते.
या घटनेने पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवला आहे की, जेव्हा अणुऊर्जा केंद्रावर बॉम्ब हल्ला केला जातो तेव्हा नक्की काय होऊ शकतं? हे सर्व काही ठराविक गोष्टींवर अवलंबून असते. सुविधेच्या कोणत्या भागावर हल्ला होतो, त्या भागात किरणोत्सर्गी पदार्थ आहेत की नाही आणि त्या जागेची रचना कशी केली गेली आहे, यावरून हल्ल्यामुळे होणारे परिणाम ठरतात. याचे परिणाम समजून घेण्यासाठी भूतकाळात घडलेल्या काही घटना, त्यांच्यामुळे उद्भवलेले किरणोत्सर्गाचे धोके, पर्यावरणीय प्रदूषण आणि भू-राजकीय वाढ आदींविषयी समजून घेऊयात.
अणुऊर्जा केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यासाठी हल्ले
युरेनियम समृद्धीकरण थांबवणे, हे काही हल्ल्यांचे उद्दिष्ट असते. या हल्ल्यात निर्धारित असल्यानुसार जमिनीवरील उपकरणे, वीज वाहिन्या, सेंट्रीफ्यूज किंवा बोगद्यांना लक्ष्य केले जाते आणि किरणोत्सर्गी पदार्थ असलेल्या भागांना लक्ष्य करणे टाळले जाते. केवळ अणुकार्यक्रम थांबवण्याच्या उद्देशाने किंवा या कार्यक्रमांना अधिक विलंब करण्याच्या उद्देशाने हे हल्ले केले जातात. या प्रकारची कारवाई किरणोत्सर्गी पदार्थ सोडल्याशिवाय अणु कार्यक्रम थांबवण्यासाठी किंवा विलंब करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
मुख्य म्हणजे, इस्त्रायलने यापूर्वी असे हल्ले केले आहेत. १९८१ मध्ये त्यांनी इराकच्या ओसीरॅक रिअॅक्टरवर बॉम्बहल्ला केला होता. २००७ मध्ये त्यांनी अल-किबारमधील सीरियाच्या संशयित अणुकेंद्रावर हल्ला केला होता. दोन्हींपैकी एकाही घटनेत किरणोत्सर्ग झाला नाही. याचे कारण म्हणजे त्या सुविधा सक्रिय नव्हत्या किंवा त्या ठिकाणी अणुइंधन नव्हते. परंतु, हे परिणाम अचूक बुद्धिमत्ता आणि वेळेवर अवलंबून असतात. जर केंद्रामध्ये आधीच समृद्ध युरेनियम किंवा किरणोत्सर्गी कचरा असेल, तर याचे धोकादायक परिणाम उद्भवू शकतात.
युरेनियम समृद्ध भागात हल्ला झाल्यास काय होते?
एखाद्या हल्ल्यामुळे युरेनियम साठवलेल्या किंवा इंधन असलेल्या सुविधेच्या भागांचे नुकसान झाल्यास किरणोत्सर्ग होऊ शकतो. नॅटांझच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने किरणोत्सर्ग झाल्याची माहिती दिली आहे, परंतु अद्याप किरणोत्सर्ग केवळ आतील भागात झाला असल्याची माहिती आहे. कोणत्याही हल्ल्यातील किरणोत्सर्गाचे प्रमाण त्या सामग्रीच्या स्वरूपावर, प्रमाणावर आणि त्याबरोबरच स्टोरेज सिस्टम किंवा कूलिंग यंत्रणेचे नुकसान झाले आहे की नाही यावर अवलंबून असते. अणुस्फोटाशिवायच हवेत, मातीमध्ये किंवा पाण्यात किरणोत्सर्गी कण पसरू शकतात आणि त्याचा आसपासच्या भागांवर परिणाम होऊ शकतो. या प्रकारच्या गळतीमुळे कामगार आणि नागरिकांना रेडिएशनचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी स्वच्छता मोहिमा राबविणे महत्त्वाचे मानले जाते. किरणोत्सर्गाचा प्रसार हवामान, भूप्रदेश आणि सुविधा जमिनीच्या वर आही की खाली यावरदेखील अवलंबून असतो.
हल्ल्याचा परिणाम आण्विक स्फोटासारखा असू शकतो का?
एखाद्या स्फोटात किरणोत्सर्गी पदार्थ हवेत पसरतात. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या जागेवर अणुबॉम्बचा हल्ला झाल्यासारखे परिणाम दिसून येतात. या हल्ल्यात अणुस्फोट होणार नसला तरी त्या भागातील काही भाग नागरिकांसाठी राहण्यायोग्य राहत नाहीत आणि त्या परिसरात भीती निर्माण होऊ शकते. जर हल्ला झाल्यास आग लागली आणि परिणामी साठवणूक कंटेनर फुटले किंवा किरणोत्सर्गी पावडर किंवा वायू साठवून असलेल्या ठिकाणाचे नुकसान झाले, तेव्हा किरणोत्सर्गाची शक्यता अधिक असते. याचे राजकीय परिणाम दीर्घकालीन असू शकतात.
पायाभूत सुविधांचे नुकसान
नॅटांझसारखी अणुकेंद्र सामान्यतः दुर्गम आणि सुरक्षित भागात असतात. तरीही या केंद्रावर हवाई हल्ले केल्याने नुकसान होऊ शकते. स्फोटामुळे आग किंवा पायाभूत सुविधांमध्ये बिघाड होऊ शकतो, तसेच प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुखापत होऊ शकते, तांत्रिक इमारतींचे नुकसान होऊ शकते, वीज आणि पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा विस्कळीत होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये, या केंद्रांच्या नजीक असणाऱ्या वाहतूक मार्गांवर किंवा लॉजिस्टिक्स हबवरदेखील परिणाम होऊ शकतो.
राजनैतिक आणि लष्करी परिणाम
अणुकेंद्रांना लक्ष्य करणे हे मोठे संकट मानले जाते, कारण त्याचे परिणाम दूरगामी असू शकतात. अशा हल्ल्यांमुळे लक्ष्य करण्यात आलेल्या देशाला अणु पर्यवेक्षण संस्थांबरोबर सहकार्य कमी करावे लागेल, आंतरराष्ट्रीय करारांमधून माघार घ्यावी लागेल किंवा त्यांचा अणु कार्यक्रम वेगवान करावा लागेल. मुख्य म्हणजे, ते थेट लष्करी प्रत्युत्तरदेखील देऊ शकतात आणि त्यामुळे आधीच अस्थिर असलेल्या प्रदेशाला आणखी अस्थिरता निर्माण होऊ शकते. हल्ला करणाऱ्या देशाला आंतरराष्ट्रीय निषेधाचा सामना करावा लागू शकतो किंवा इतर देश त्यांच्यावर निर्बंधही लादू शकतात. या हल्ल्यांचे कोणतेही किरणोत्सर्गी परिणाम झाले नाही तरीदेखील अशा कृतींचे राजकीय परिणाम असू शकतात.
इस्त्रायल-इराण युद्धातदेखील इराणने इस्त्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आधीच क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. या तणावामुळे रविवारी ओमानमध्ये होणाऱ्या अमेरिकेबरोबरच्या अणु चर्चेलाही स्थगित करण्यात आले आहे. अणु पायाभूत सुविधांवर बॉम्बस्फोट करणे काळजीपूर्वकरित्या अमलात आणले गेले तरी अशा कृती भविष्यात सामान्य होण्याचा धोका असतो. यामुळे इतर संघर्ष क्षेत्रांमध्ये अशाच प्रकारचे ऑपरेशन्स राबविले जाऊ शकतात, त्यामुळे आण्विक केंद्रांची असुरक्षितता वाढू शकते. त्यातून असा निष्कर्ष निघतो की, अणुसुविधांवरील हल्ला धोकादायक असतो. त्यामुळे किरणोत्सर्ग, प्रादेशिक अस्थिरता आणि जागतिक अण्वस्त्र प्रसार रोखण्याच्या चौकटी कमकुवत होऊ शकतात. नॅटांझवर करण्यात आलेल्या हल्ल्यात संबंधित केंद्राच्या आत किरणोत्सर्ग झाला आहे, मात्र अद्याप तरी बाह्य वातावरणात त्याचा परिणाम झालेला नाही.