आवाजापेक्षा साडेसात पटीहून अधिक (माक – ७.५) म्हणजे अंदाजे ९२६१ किलोमीटर प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने लक्ष्यभेदाची क्षमता राखणारे के – ६ हायपरसॉनिक क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संस्थेची प्रगत नौदल प्रणाली प्रयोगशाळा विकसित करीत आहे. के – ६ अण्वस्त्रे आणि पारंपरिक शस्त्रे वाहून नेऊ शकते. प्रगत एस – पाच वर्गीय अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांसाठी त्याची रचना केलेली आहे. वेगवान व अत्यंत शक्तिशाली शस्त्राने भारतीय नौदलाची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याची, प्रतिहल्ल्याची क्षमता कमालीची विस्तारणार आहे.
के – ६ क्षेपणास्त्र काय आहे?
हे पाणबुडीतून डागले जाणारे हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (एसएलबीएम) आहे. पारंपरिक व अण्वस्त्रे असे दोन्ही ते वाहून नेऊ शकते. महाप्रचंड वेग हे त्याचे बलस्थान म्हणता येईल. या वेगामुळे शत्रूला प्रतिक्रिया देण्यासाठी फारसा वेळ मिळणार नाही. ते काही मिनिटात लक्ष्य गाठू शकते. विलक्षण वेग, पल्ला आणि विनाश क्षमतेत ते ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रालाही मागे टाकण्यास सज्ज आहे. ब्राह्मोस प्रकल्पातील माजी शास्त्रज्ञाच्या माहितीनुसार के – ६ क्षेपणास्त्राची मारक क्षमता आठ हजार किलोमीटरपर्यंत असेल. अधिक प्रगत एस – ५ वर्गीय एसएसबीएन पाणबुड्यांवर तैनात करण्यासाठी ते विकसित झालेले आहे. दोन ते तीन वॉरहेड्स वाहून नेण्यास ते सक्षम असेल. त्याच्या चाचण्या लवकरच होण्याच्या मार्गावर आहेत.
वेगळे का ठरते?
या क्षेपणास्त्राचा हायपरसॉनिक वेग माक – ७.५ असल्याने बहुतेक हवाई संरक्षण प्रणालींना ते चकवा देऊ शकते. बहुविध वैयक्तिक लक्ष्य करण्यायोग्य रि-एंट्री वाहनामुळे (एमआयआरव्ही) एकच क्षेपणास्त्र अनेक लक्ष्यांवर अचूकतेने मारा करू शकते. ही क्षमता के – ६ ला क्षेत्रीय आणि धोरणात्मक प्रतिबंधासाठी शक्तिशाली साधन बनवते. आठ हजार किलोमीटरच्या मारक क्षमतेमुळे विस्तीर्ण प्रदेश त्याच्या टप्प्यात येतो. अण्वस्त्र भाराव्यतिरिक्त ते पारंपरिक शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे, ज्यामुळे वेगवेगळ्या कारवाईत लवचिकता मिळते. कार्यान्वित झाल्यानंतर के – ६ भारताच्या एसएलबीएम कुटुंबात सहभागी होईल. ज्यात के – ४ आणि के – ५ यांचा अंतर्भाव आहे. आधीच्या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत के – सहाची हायपरसॉनिक आणि एमआयआरव्ही क्षमता त्याला धोरणात्मक स्तरावर घेऊन जाते, याकडे लष्करी तज्ज्ञ लक्ष वेधतात.
’के‘ कुटुंबातील क्षेपणास्त्र
समुद्राखालील आण्विक क्षमता विस्तारण्यासाठी भारताने ‘एसएलबीएम’ क्षेपणास्त्रांची ‘के’ मालिका सुरू केली. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमात महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून त्यास सांकेतिक नाव (के) देण्यात आले. संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठान (डीआरडीओ) पाणबुडीतून डागता येणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा विकास के मालिकेत करीत आहे. त्या अंतर्गत के – ३ (एक हजार ते दोन हजार किलोमीटरचा पल्ला), के – ४ (साडेतीन हजार किलोमीटर पल्ला) आणि के – ५ (पाच ते सहा हजार किलोमीटर पल्ला) एसएलबीएमची चाचणी घेतली आहे. या मालिकेतील क्षेपणास्त्रांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यात हलकी रॉकेट्स आवरणे, प्रगत मार्गदर्शन प्रणाली आहेत, जी क्षेपणास्त्र हल्ल्याची अचूकता निश्चित करतात. शत्रूच्या प्रदेशात गु्प्तपणे प्रवेश करण्यासाठी कमी वेगात उड्डाण करू शकतील, याप्रकारे त्यांची रचना केलेली आहे. ही क्षेपणास्त्रे वेगवान, हलकी व गुप्त असल्याचा दावा केला जातो.
शक्ती संतुलनास आकार
के – ६ हे केवळ दुसरे क्षेपणास्त्र नव्हे तर, ते अत्यंत शक्तिशाली शस्त्र ठरणार आहे. भारत अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या कार्यक्रमांस गती देत आहे. त्यामध्ये लांब पल्ल्याच्या पाण्याखाली गस्त घालण्याची क्षमता असलेल्या अणु पाणबुड्यांचा अंतर्भाव आहे. प्रादेशिक तणाव वाढत असताना हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील आव्हाने लक्षात घेता भारताची लांब पल्ल्याच्या पाणबुडीतून डागता येणाऱ्या क्षेपणास्त्रांची गरज के – ६ पूर्ण करेल. शिवाय ते भारताला अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन सारख्या प्रमुख जागतिक शक्तींच्या यादीत स्थान मिळवून देईल. संपूर्ण पाकिस्तान आणि चीनचाही बराचसा भाग त्याच्या प्रहार टप्प्यात येईल. भारताची जमीन, पाणी आणि हवा अशा तिन्ही माध्यमातून अण्वस्त्रे डागण्याची यंत्रणा पूर्ण झाली आहे. पाण्याखालून डागल्या जाणाऱ्या या वेगवान क्षेपणास्त्राने प्रत्याघाताची क्षमता विस्तारेल. युद्धात जमीन, हवा आणि पाणी या माध्यमातील किमान एक यंत्रणा वापरण्यास उपलब्ध असणे महत्वाचे ठरते. पाणबुड्या शत्रूच्या पहिल्या हल्ल्यात स्वत:चा बचाव करू शकतात. आणि प्रत्युत्तरादाखल हल्ला चढवू शकतात. यातून खात्रीशीर आण्विक जरब बसविण्याचा टप्पा गाठला जाईल. पाकिस्तान आणि चीन दोघेही त्यांच्या अण्वस्त्र आक्रमण क्षमता वाढवित आहेत. तिन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी दुसऱ्या हल्ल्याच्या क्षमतेवर अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे. म्हणजे पहिल्या अण्वस्त्र हल्ल्यात मोठे नुकसान झाले तरी प्रत्युतर देण्याची क्षमता राखून ठेवण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. पाकिस्तानची समुद्राखालील अण्वस्त्रक्षमता बाल्यावस्थेत असली तरी चीनच्या अणुऊर्जेवरील काही पाणबुड्या अण्वस्त्र डागण्यास सक्षम आहेत. के – ६ क्षेपणास्त्र समुद्राखालील शक्ती संतुलनाला पुन्हा आकार देऊ शकते.