Kajol’s Secret to a Happy Marriage: सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य काय असतं? गिफ्ट्स, रोमँटिक डेट नाईट्स की, मग आणखी काही? याच प्रश्नाचं उत्तर काजोलनं अगदी साध्या शब्दांत दिलं आहे.
२६ वर्षांचं लग्न आणि काजोलचं ‘विस्मरणाचं सूत्र’!
प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने अलीकडेच Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या यशस्वी लग्नामागचं गुपित उघड केलं आहे. ती म्हणते, खरंतर माझा आणि अजयचा स्वभाव जुळत नाही. तो जुळला असता तर आम्ही एकत्र राहिलो नसतो, खूप आधीच वेगळे झालो असतो. ती सांगते की, परस्परविरुद्ध स्वभाव आणि नात्यात असलेली विनोदबुद्धी त्यामुळेच हे नातं इतकी वर्ष टिकलं आहे. “मी नेहमी म्हणते की, सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य म्हणजे थोडा बहिरेपणा आणि निवडक विस्मरण. आपल्या जोडीदाराबद्दल काही गोष्टी विसरणं आणि कधी कधी त्यांनी म्हटलेल्या काही गोष्टी ऐकूण न ऐकल्यासारखं करणं खूप गरजेचं असतं,” असं काजोलनं सांगितलं.
वेगळ्या वाटा निवडल्या…
काजोल आणि अजय देवगण यांनी १९९९ साली लग्न केलं. त्यांचं नातं बॉलिवूडमधील सर्वात स्थिर जोडप्यांपैकी एक मानलं जातं. दोघांनीही आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या वाटा निवडल्या, तरी एकमेकांना स्पेस देत त्यांनी नातं घट्ट ठेवलं आहे.
हम ये सब नहीं करते हैं।
काजोलनं पुढे सांगितलं की, नातं घट्ट ठेवण्यासाठी पारंपरिकरित्या काही गोष्टी सांगितल्या जातात. त्यात दर आठवड्याला डेट नाईट्स इत्यादींचा समावेश असतो. पण या गोष्टी आमच्या बाबतीत लागूच होत नाही. “आमच्याकडे डेट नाईट्स वगैरे काही नसतात. हम ये सब नहीं करते हैं। आम्ही मुख्यतः कुटुंबाबरोबर वेळ घालवतो. कारण एकत्र घरी राहण्याची संधी खूप कमी मिळते. तो (अजय) कामावर किंवा प्रवासात असतो, नाहीतर मी असते. त्यामुळे जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा आम्ही घरी सगळ्यांबरोबर वेळ घालवणं पसंत करतो. डेट नाईट्स वगैरे काही नाही,” असं काजोल म्हणाली.

‘थोडा बहिरेपणा’- काजोलनं सांगितलं सुखी लग्नाचं गुपित”
ती पुढे हसत म्हणाली, “आता आमचं नातं हे नवरा बायकोपेक्षा मित्रांसारखं अधिक झालं आहे. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर आता मी त्याच्याबद्दल बोलताना लालबूंद होईन, अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही.”
मग प्रश्न असा निर्माण होतो, जोडीदाराच्या काही वागणुकीकडे दुर्लक्ष करणं, म्हणजेच जाणूनबुजून ‘let go’ करणं, हे खरंच दीर्घकाळ नातं टिकवण्यासाठी उपयोगी ठरू शकतं का?
भावनिक संयम किंवा ‘let go’ महत्त्वाचं
जय अरोरा हे समुपदेशक मानसशास्त्रज्ञ आणि ‘किराणा काउन्सेलिंग’चे सह-संस्थापक आहेत. त्यांनी indianexpress.com शी बोलताना सांगितलं की, “होय, भावनिक संयम ठेवणं किंवा जाणूनबुजून ‘let go’ करणं हे दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांमध्ये खूप प्रभावी ठरू शकतं. कधी कधी जोडीदार क्षणिक रागात काही तरी बोलतो किंवा काही कृती करतो, त्या काही त्याच्या खऱ्या भावना नसतात किंवा तसा त्याचा उद्देशही नसतो.”
सहवेदना, विनोदबुद्धी आणि माफ करण्याची भावना
अरोरा पुढे सांगतात, “निवडक लक्ष (selective attention) ठेवणं म्हणजे सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणं नाही, तर कुठल्या गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायची आणि कुठे शांत राहायचं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अनावश्यक वाद टाळता येतात. छोट्या छोट्या त्रासदायक गोष्टी ‘सोडून देणं’ हे भावनिक स्थैर्य राखतं आणि नात्यात सहवेदना, विनोदबुद्धी आणि माफ करण्याची भावना वाढवते.” जर याकडे भविष्याच्या दृष्टिकोनातून पहिलं तर कधी कधी अशा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं नातं टिकवण्यासाठी दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतं.
विरोधी स्वभाव असलेल्या जोडप्यांमध्ये, भावनिक नातं टिकवण्यासाठी आणि वाद टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असतात?
जेव्हा दोन परस्परविरुद्ध स्वभावाचे लोक एकत्र येतात, तेव्हा मतभेद आणि तणाव नैसर्गिक असतात. अरोरा सांगतात, “पण यावर उपाय म्हणजे त्या फरकांना बदलण्याचा प्रयत्न न करता त्यांची कदर करणं. तसेच, आपल्या गरजा आणि मर्यादा स्पष्टपणे व्यक्त करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.” ते पुढे सांगतात, “नात्यात स्वतःसाठी काय अत्यावश्यक आहे हे ओळखणं महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, तुम्ही नात्यात कधीही तडजोड करणार नाहीत, अशा पाच गोष्टी लिहून ठेवा आणि उरलेल्या गोष्टींमध्ये लवचिक राहा. त्यामुळे तुम्ही कठोर न होता स्वतःच्या भावनिक गरजांची काळजी घेऊ शकता.”
मग असा प्रश्न असा निर्माण होतो की, जर नात्यात पारंपरिक रोमँटिक सवयी, जसं की डेट नाईट्सवर जाणं नसेल तर त्याचा वैवाहिक नात्यावर खरोखर परिणाम होतो का?
अरोरा सांगतात, “असं नाही की, डेट नाईट्स नसल्या तर नातं टिकत नाही. नातं जपण्याच्या अनेक मार्गांपैकी त्या फक्त एक आहेत. पण एकमेव नक्कीच नाहीत.” ते पुढे सांगतात, नात्यात तुम्ही भावनिक लक्ष किती पुरवता आहे, हेही महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराचं किती ऐकताय आणि तुम्हाला त्याच्या बरोबर किती सुरक्षित वाटतंय हेही पाहणं गरजेचं आहे.
एकत्र दिनचर्चा महत्त्वाची
“एकत्र हसणं, रोजच्या साध्या दिनचर्येत एकत्र असणं किंवा मुलांना वाढताना एकत्र पाहणं, या गोष्टींमधूनही खोल जवळीक निर्माण होते. जोपर्यंत दोघांमध्येही भावनिक नातं आहे, तोपर्यंत ‘रोमान्स’ कसा दिसतो हे फारसं महत्त्वाचं नसतं,” असं अरोरा शेवटी सांगतात.
तज्ञांच्या मते नातं टिकवण्यासाठी उपयुक्त ५ गोष्टी:
- निवडक विस्मरण: प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं टाळा.
- विनोदबुद्धी: गंभीर प्रसंगीही हलकं हसणं तणाव कमी करतं.
- संवाद स्पष्ट ठेवा: अपेक्षा स्पष्ट बोला.
- फरकांची कदर करा: बदलण्याचा प्रयत्न करू नका.
- एकत्र वेळ घालवा: डेट नाईट नसली तरी ‘क्वालिटी टाइम’ असू द्या.
“लग्न टिकवण्यासाठी मोठे प्रयत्न नाही, तर छोट्या गोष्टींकडे मोठ्या मनानं पाहणं गरजेचं आहे. काजोल आणि अजयचं उदाहरण सांगतं की, प्रेम म्हणजे परिपूर्णता नव्हे, तर अपूर्णतेला स्वीकारणं होय.”