- राखी चव्हाण काही महिन्यांपूर्वी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते स्थलांतरित करण्यात आले. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वन्यप्राणी स्थलांतराची प्रक्रिया सुरूच असते. हजार किलो वजनाच्या प्राण्यांचे स्थलांतर करणे सोपे नसते. मात्र, मध्य प्रदेश वनखात्याच्या चमूने डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने ते यशस्वी करून दाखवले. वन्यप्राण्यांच्या स्थलांतराची गरज का? विकासाच्या दिशेने वेगाने धाव घेत असतानाच वन्यप्राण्यांचा अधिवास असणारे जंगल कमी-कमी होत आहे. भारताचा विचार केला, तर जंगलालगत येणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढली आहे. नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढल्यामुळे मानवी वावरामुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासावर गदा येत आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून, वन्यप्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. भारतात वन्यप्राण्यांची शिकार आणि बेकायदा तस्करी या समस्या वाढत आहेत. मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यामुळे भारतातील वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. एकाच विशिष्ट क्षेत्रात वन्यप्राणी अडकून राहिल्यास जनुकीय समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वन्यप्राण्यांचे स्थलांतर आवश्यक आहे. वन्यप्राण्यांच्या स्थलांतरासाठी आवश्यक बाबी कोणत्या? देशांतर्गत स्थलांतर असेल तर बऱ्याच गोष्टी सुलभ होतात. पण देशाच्या बाहेर वन्यप्राण्यांचे स्थलांतर करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सर्वांत मोठा फरक हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा असतो. झाडे, गवत, हवा, तापमान, पाणी यात फरक असतो. त्यामुळे परदेशातून एखादी प्रजाती आणताना त्यांना अनुकूल अशा वातावरणाची, अधिवासाची निर्मिती करावी लागते. त्यानंतरही त्यांच्यासाठी तयार केलेल्या या अधिवासात, वातावरणात ते जुळवून घेतीलच असे नाही. त्यांना जिथे सोडायचे आहे, तेथील वातावरण कृत्रिमरीत्या बंदिस्त ठिकाणी तयार केले जाते. त्यांना त्या ठिकाणाची सवय व्हावी म्हणून काही काळ संरक्षित वातावरणातही ठेवले जाते. त्यानंतरच त्यांना जंगलात सोडले जाते. एवढे केल्यानंतर सोडलेले प्राणी कधी कधी त्यांच्या वागणुकीत वेगवेगळे बदल दर्शवतात. चित्त्यांच्या आणि त्यांच्या बछड्यांच्या मृत्यूचे उदाहरण ताजे आहे. भारतातील उष्ण वातावरणाशी ते जुळवून घेऊ शकले नाहीत. स्थलांतराची प्रक्रिया नेमकी काय? स्थलांतर एका देशातून दुसऱ्या देशात असो वा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, स्थलांतराची ही प्रक्रिया सर्वच दृष्टीने खूप किचकट असते. हे स्थलांतर करण्यापूर्वी प्राण्यांच्या मानसिकतेचा बारकाईने विचार करून मगच नियोजन करावे लागते. कारण जंगलात सोडल्यानंतर मांसाहारी प्राणी असल्यास त्याला लागणारी शिकार मांसाहारी नसल्यास जंगलात त्याला लागणारे इतर खाद्य, जलस्रोत यांचा शोध घेताना अनेकदा वन्यप्राणी गोंधळतात किंवा बिथरल्यासारखे वागतात. त्यामुळे त्याला जंगलात स्थिरावण्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींना ते सरावल्यानंतरच तेथे निवांतपणे प्रजोत्पादन करू शकतात आणि अशा वेळी मग वन्यजीव संवर्धन यशस्वी झाले असे म्हणता येऊ शकते. अभ्यास न करता स्थलांतर केल्यास धोका कोणता? स्थलांतर करताना प्राण्यांच्या मूळ प्रवृत्तीचा अभ्यास करावा लागतो. तो न करता केलेले स्थलांतर अयशस्वी ठरू शकते. कझागिस्तानमध्ये २०१७ मध्ये नऊ तर २०१९ साली दोन जंगली गाढवे स्थलांतरित करण्यात आली. खुल्या जंगलात सोडण्याआधी त्यांना कुंपण घातलेल्या खुल्या जागेत सोडण्यात आले. त्या वातावरणाला सरावल्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात आले. मात्र, जंगलात सोडल्यानंतर ती एकमेकांपासून दुरावली आणि मीलनासाठी एकत्र येऊ शकली नाहीत. त्यामुळे हा प्रयोग फसला. त्यामुळे स्थलांतराआधी सर्वच परिस्थितीचा विचार करावा लागतो. आंतरखंडीय वन्यप्राणी स्थलांतराचे आव्हान कोणते? आंतरखंडीय वन्यप्राण्यांच्या स्थलांतराचा पहिला प्रयोग चित्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. त्याआधीही विदेशातून प्राणी भारतात आणण्यात आले, पण ते प्राणिसंग्रहालयात. या ठिकाणी प्राण्यांना त्यांचे खाद्य पुरवले जाते. मात्र, जंगलात वन्यप्राणी सोडताना त्याला त्याची शिकार स्वत: शोधावी लागते. हे सर्वांत मोठे आव्हान आहे. कारण या शोधमोहिमेत शिकार न मिळाल्यास मृत्यूची शक्यता असते. अथवा तो वन्यप्राणी जंगलाबाहेर भरकटल्यास मानव-वन्यप्राणी संघर्ष आणि यातून त्या वन्यप्राण्याची शिकार होण्याचाही धोका असतो. हेही वाचा : वाघांचे कृत्रिम स्थलांतरण लवकरच; महाराष्ट्रातील पहिला प्रयोग भारतात वन्यप्राण्यांचे यशस्वी स्थलांतर कोणत्या राज्यात? वन्यप्राण्यांच्या स्थलांतर प्रक्रियेत मध्य प्रदेश हे राज्य सर्वाधिक आघाडीवर आहे. या राज्यात वन्यप्राण्यांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया तंत्रशुद्ध, शास्त्रशुद्ध असते. वाघांच्या स्थलांतराचे प्रयोग या राज्याने यशस्वी केले आहे. त्यांच्या वनखात्याकडे अनुभवसंपन्न अधिकारी, पशुवैद्यकांचा चमू आहे. ज्या ठिकाणी वन्यप्राणी सोडता येऊ शकतात, अशा जागा त्यांनी आधीच हेरून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे अधिवासाचा, वन्यप्राण्यांना लागणाऱ्या खाद्याचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. परिणामी त्यांची स्थलांतराची प्रक्रिया अतिशय सुलभ होते. त्यानंतरही सोडलेल्या वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवणारी यंत्रणाही तेवढीच सज्ज आहे. विशेष म्हणजे वनविकास महामंडळ, प्रादेशिक वनखाते, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग अशा वनखात्याच्या विविध विभागांतील समन्वय अतिशय चांगला आहे.