scorecardresearch

विश्लेषण : विश्व हिंदू परिषदेने ‘सारे जहाँ से अच्छा’ लिहिणाऱ्या मोहम्मद इक्बालांच्या प्रार्थनेवर आक्षेप का घेतला?

‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गीत लिहिणारे लेखक, साहित्यिक मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेली एक प्रार्थना उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे.

विश्लेषण : विश्व हिंदू परिषदेने ‘सारे जहाँ से अच्छा’ लिहिणाऱ्या मोहम्मद इक्बालांच्या प्रार्थनेवर आक्षेप का घेतला?
मोहम्मद इक्बाल (छायाचित्र सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ हे देशभक्तीपर गीत लिहिणारे लेखक, साहित्यिक मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेली एक प्रार्थना उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेने तक्रार केल्यानंतर प्रशासनाने ही प्रार्थना परिपाठात घेणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांवरच कारवाई केली. मुख्याध्यापक आणि शिक्षणमित्र दोघांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका हा वाद काय आहे? विश्व हिंदू परिषदेने कोणत्या प्रार्थनेवर आक्षेप घेतला? आक्षेपाचा मुद्दा काय आहे? अशा सर्वच गोष्टींचा हा आढावा…

मोहम्मद इक्बाल यांनी अनेक गाणी आणि प्रार्थना रचल्या. त्यातील सारे जहाँ से अच्छा हे गीत भारतात देशभक्तीपर गीत म्हणून लोकप्रिय आहे. मात्र, याच लोकप्रिय गीताचे लेखक मोहम्मद इक्बाल यांची इतर गाणी किंवा प्रार्थना वादात सापडत आहेत. मात्र, त्यांची असा वाद होण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यावरून वाद झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यातील एका शाळेत सकाळच्या परिपाठात मोहम्मद इक्बाल यांची ‘लब पे आती हैं दुआ’ ही प्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली गेली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. यानंतर उत्तर प्रदेश शिक्षण विभागाने शाळेचे मुख्याध्यापक नहिद सिद्दिकी यांचं निलंबन केलं. तसेच शिक्षणमित्र वजिरुद्दीन विरोधात चौकशी सुरू केली.

मोहम्मद इक्बाल यांच्या गाण्यांवरील वाद

ज्यांची गाणी भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत अशा मोहम्मद इक्बाल यांच्या गाण्यांवर मागील चार वर्षांच्या काळात दोनदा वाद निर्माण झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये उत्तर प्रदेशमधील बिलासपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेने एका शाळेतील परिपाठावर आक्षेप घेतला. तसेच मोहम्मद इक्बाल यांची मदरशांमध्ये म्हटली जाणारी ‘लब पे आती हैं दुआ’ ही प्रार्थना शाळेत घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळीही मुख्याध्यापकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यातआली. नंतर त्यांना सेवेत पुन्हा घेतलं गेलं, मात्र, त्या शाळेवरून बदली करण्यात आली.

मोहम्मद इक्बाल यांच्या प्रार्थना आणि गाणी

‘लब पे आती हैं दुआ’ ही प्रार्थना इक्बाल यांनी १९०२ मध्ये लिहिली. त्यानंतर भारतातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये सकाळच्या परिपाठात ही प्रार्थना घेतली जाते. यात अनेक प्रतिष्ठित शाळांचाही समावेश आहे. इक्बाल यांच्या लिखाणातील सर्वात लोकप्रिय गीत म्हणजे ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्ता हमारा हमारा.’ त्यांनी हे गाणं १९०४ मध्ये लिहिलं. हा त्यांनी भारताला दिलेला अविस्मरणीय ठेवा आहे. याच गाण्याने ब्रिटिश काळात अनेक स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रजांशी लढण्याची प्रेरणा दिली.

इक्बाल यांनी लिहिलेल्या कविता, गाण्यांचं पहिलं पुस्तक १९२३ मध्ये प्रकाशित झालं. त्याचं नाव बंग-ए-दारा असं होतं. त्यांचं बहुतांश लेखन उर्दू आणि पर्शियनमध्ये झालं. इक्बाल (१८७७-१९३८) यांचा जन्म सतराव्या शतकात इस्लाम धर्म स्वीकारलेल्या काश्मिरी पंडित वंशाच्या कुटुंबात झाला होता. पंजाब प्रांतातील सियालकोट येथे त्यांचा जन्म झाला होता.

हेही वाचा : पाकिस्तानचीही माणुसकी! धुक्यात भरकटून सीमापार गेलेल्या भारतीय जवानाला सुखरूप पाठवलं

असं असलं तरी इक्बाल यांच्या आयुष्याचे दोन भाग आहेत. एक स्वातंत्र्यपूर्व जीवन आणि दुसरं स्वातंत्र्यानंतरचं जीवन. इक्बाल त्यांच्या आयुष्याच्या नंतरच्या काळात मुस्लीम राष्ट्राच्या संकल्पनेचे समर्थक बनले. त्यांचा मोहम्मद अली जिना यांच्या स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीवर विश्वास होता. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये इक्बाल यांना पाकिस्तानच्या निर्मितीचा वैचारिक संस्थापक असंही म्हटलं जातं. त्यांनी हा विचार रुजवला आणि जिनांनी तो प्रत्यक्षात आणला, असंही म्हटलं जातं. ते भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेले. हाच इक्बाल यांच्याबाबतच्या आजच्या वादांचाही गाभा मानला जातो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 10:02 IST

संबंधित बातम्या