पश्चिम उपनगरांमध्ये पूर परिस्थिती टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने किमान २५ फ्लडगेट्स उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी अंदाजे २,३०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे फ्लडगेट्स मिठी नदी आणि समुद्र एकमेकांना मिळतात त्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे. मुंबईतील हा प्रकल्प दक्षिण कोरियामधील पूरनियंत्रण प्रणालीवर आधारित आहे. ज्या भागात पूरसदृश परिस्थिती उद्भवते, त्या भागात अशी प्रणाली राबवली जाते, अशी माहिती दी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.
मिठी नदीबाबतच हा प्रकल्प का?
मिठी नदी ही मुंबई शहरातून वाहणारी १७.८ किमी लांबीची एक महत्त्वाची नदी आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून नेण्याच्या दृष्टीने ती खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ही नदी पवई तलाव आणि विहार तलाव यांच्या ओलांडून वाहणाऱ्या पाण्यातून उगम पावते. अंधेरी, कुर्ला, वांद्रे, धारावी यांसारख्या दाट वस्तीच्या भागांतून मिठी नदी वाहत माहीम खाडीमार्गे अरबी समुद्राला मिळते. चकाला, कालिना, साकीनाका व बीकेसी यांसारख्या मुंबईतील सर्वाधिक बांधकाम झालेल्या आणि पूरग्रस्त भागांतून ही नदी वाहते. त्यामुळे मिठी नदीबाबत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पावसाळ्यात दरवर्षी मिठी नदी पुराचा धोका निर्माण करते. जोरदार पावसाच्या वेळी तिची वाहण्याची क्षमता पावसाचे पाणी आणि कचऱ्यामुळे ओलांडली जाते. अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण आणि घनकचरा यामुळे नदी अरुंद झाली असून, तिची खोलीही घटली आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी वाहून नेण्याची तिची क्षमता अधिकच कमी झाली आहे.
या प्रकल्पामुळे काय बदल होईल?
या प्रकल्पामुळे मिठी नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी मदत होईल. संरक्षक भिंती, पूर दरवाजे आणि पाणी वाहून नेण्याची सुधारित यंत्रणा यांमुळे पुराचा धोका कमी होईल. तसेच गाळ काढणे आणि अतिक्रमण हटवल्याने नदीची खोली आणि रुंदीदेखील वाढेल. परिणामी अधिक पाणी वाहणे शक्य होईल. त्याशिवाय मुसळधार पावसाच्या वेळी साठणारे पाणी, वाहतूक ठप्प होणे आणि नागरिकांचे हाल या समस्या काही प्रमाणात टाळणे शक्य होईल.
२००५ मधील मोठा पूर
२६ जुलै २००५ रोजी मुंबईत एका दिवसात ९४४ मिमी पावसाची नोंद झाली. त्या दिवशी मिठी नदीने पातळी ओलांडल्याने कुर्ला, सायन, कालिना यांसारख्या खालच्या भागांत पूर आला. त्यामुळे ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात हानी झाली. तसेच वीजपुरवठा आणि वाहतूक पूर्णपणे कोलमडली. त्यानंतरच्या वर्षात मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी नदीतील गाळ काढणे, रुंदीकरण करणे, संरक्षक भिंती बांधणे असे विविध उपाय केले. मात्र, एवढ्या उपाययोजना करूनही मुसळधार पावसात धारावी, कुर्ला व मिलन सबवे यांसारख्या भागात दरवर्षी पाणी साठते आणि पूर परिस्थिती निर्माण होते.
डोमेस्टिक विमानतळ परिसरातून माहीम कॉजवेपर्यंत ज्या भागावर समुद्राच्या भरती-ओहोटीचा प्रभाव आहे, तिथे पूरप्रतिबंधक दरवाजे अर्थात फ्लडगेट्स बसवल्यामुळे सायन, चुनाभट्टी, एलबीएस मार्ग व कुर्ला येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.
दक्षिण कोरियात या फ्लडगेट्सचा कसा वापर केला जातो?
दक्षिण कोरियाने पूरप्रतिबंधासाठी एक अत्याधुनिक प्रणाली वापरली आहे. त्यामध्ये फ्लडगेट्स, धरणे व नदी व्यवस्थापनाची पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. शहरी आणि कमी उंचीच्या भागांमध्ये ही प्रणाली प्रभावीपणे पूर रोखण्याचे काम करते.
शहरामधल्या नदीवर फ्लडगेट्स- सेउलसारख्या शहरांमध्ये हान नदी आणि तिच्या उपनद्या दाट लोकवस्ती असलेल्या भागातून वाहतात. मुसळधार पावसाच्या वेळी नदीची पातळी नियंत्रित करण्यासाठी फ्लडगेट्स बसवले जातात. त्यामुळे नदीतील पाणी शहरातील ड्रेनेज प्रणालीत परत जाण्यापासून रोखता येते आणि पाणी साठणाऱ्या भागांचे पुरापासून संरक्षण होते.
भरती-ओहोटीसाठी फ्लडगेट्स आणि बॅरेजेस- दक्षिण कोरियामध्ये मोठ्या नद्यांच्या उगमाजवळ बहुपयोगी धरणे बांधलेली आहेत. ही धरणे मुसळधार पावसात पाणी साठवतात आणि नंतर फ्लडगेट्समार्फत नियंत्रित पद्धतीने पाणी सोडतात. त्यामुळे कमी उंचीच्या भागांमध्ये पूर परिस्थिती टाळली जाते.
स्मार्ट मॉनिटरिंग आणि स्वयंचलित फ्लडगेट्स- दक्षिण कोरियामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून सेन्सर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान अंदाज यांचा उपयोग केला जातो. पावसाचे प्रमाण आणि नदीची पाण्याची पातळी प्रत्यक्ष वेळेत मोजली जात असते आणि पुराचा धोका ओळखून फ्लडगेट्स आपोआप उघडले किंवा बंद केले जातात.
भूमिगत जलनिचरा आणि साठवण्यासाठी प्रणाली- दक्षिण कोरियाने भूमिगत पूरस्थितीच्या अनुषंगाने बोगदेदेखील बांधले आहेत. फ्लडगेट्समार्फत तिथे पावसाचे जास्त पाणी तात्पुरते साठवले जाते आणि नंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर ते हळूहळू नद्यांमध्ये सोडले जाते.
दक्षिण कोरियात सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे १,००० ते १,५०० मिमी आहे. त्यातील बहुतांश पाऊस जून ते सप्टेंबरदरम्यानच्या उन्हाळी मान्सून काळात पडतो. जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. मुंबईत सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे २,२०० ते २,५०० मिमी असते. जवळपास पूर्ण पाऊस जून ते सप्टेंबर या दक्षिण पश्चिम मान्सून काळात पडतो. जुलै महिना हा सर्वाधिक पावसाचा असतो. यावेळी साधारण ८०० ते १,२०० मिमी पावसाची नोंद होते.