गौरव मुठे

अर्थव्यवस्थेला घरघर लागलेल्या पाकिस्तानमधील नागरिक महागाईने अक्षरशः होरपळून निघाले आहेत. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाकिस्तान विविध देश आणि आंतरराष्ट्रीय बँका तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हात पसरतोय. मात्र पाकिस्तानी भांडवली बाजाराने याच काळात ५० टक्के म्हणजे आपल्याकडील सेन्सेक्सपेक्षा अधिक परतावा दिला आहे. तो कसा आणि त्याची कारणे काय हे जाणून घेऊ. 

पाकिस्तान भांडवली बाजारातील परिस्थिती काय?

तेजीवाल्यांनी गेल्या वर्षभरात जगभरातील भांडवली बाजारांमध्ये धुमाकूळ घातला आहे. भारतीय भांडवली बाजारातदेखील विद्यमान एप्रिल महिन्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ७४,००० अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे. मात्र अर्थव्यवस्था खिळखिळी झालेल्या पाकिस्तानच्या शेअर बाजाराने अधिक परतावा दिला आहे. पाकिस्तानी शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या कराची स्टॉक इंडेक्स १०० ने (केएसई १००) विविध कालावधीतील परताव्याशी तुलना करता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सपेक्षा अधिक परतावा दिला आहे. केएसई १०० चा तीन वर्षातील परतावा, एक वर्षातील परतावा आणि विद्यमान वर्षात आतापर्यंत दिलेला परतावा सेन्सेक्सपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: क्षयरोगमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होणार का? 

प्रमुख निर्देशांक सध्या कोणत्या पातळीवर?

भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ७५,१२४ ही विक्रमी उच्चांकी पातळी गाठली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २२,७७५ हा ऐतिहासिक स्तर गाठला आहे. वर्षभरात दोन्ही निर्देशकांनी अनुक्रमे २२.७ टक्के आणि २३ टक्के परतावा दिला. दुसरीकडे भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानचा प्रमुख निर्देशांक सध्या ७०,५०० अंशांच्या उच्चांकी पातळीवर आहे. त्याने वर्षभरात ५० इतका परतावा दिला. म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टीपेक्षा सुमारे २८ टक्के अधिक परतावा दिला. वर्ष २०२३ मध्ये पाकिस्तानी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ५० टक्के परतावा दिला आहे. बहुप्रसवा परतावा देणाऱ्या जगभरातील प्रमुख निर्देशांकात त्याने स्थान मिळवले आहे. शिवाय पाकिस्तानी विश्लेषकांनी तो लवकरच ८५,००० अंशांची पातळी गाठेल असा कयास व्यक्त केला आहे.

पाकिस्तानी शेअर बाजारात तेजी का?

पाकिस्तानमध्ये नुकत्याच लष्कराच्या मदतीने सार्वजनिक निवडणुका पार पडल्या. त्यात दोन वर्षांच्या राजकीय अस्थिरतेनंतर शहाबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली अनेक घटकपक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. परिणामी आता पाकिस्तानी नागरिक आणि गुंतवणूकदार राजकीय आणि आर्थिक स्थिरतेची दिवसाढवळ्या स्वप्न बघू लागले आहेत. अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्यानंतर आणि जगभरातील मोठ्या देशांकडे आर्थिक मदतीची याचना केल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अटीशर्तींसह मदत केली. 

हेही वाचा >>> Russia-Ukraine War: आधुनिक युद्धात रणगाडे निकाली निघालेत का?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने जुलै २०२३ मध्ये पाकिस्तानला ३ अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज प्रदान केले. ज्यामुळे पाकिस्तानला त्याच्या कर्जाच्या व्याजापोटी द्यावा लागणारा हप्ता वेळेवर देण्यास मदत झाली. या घटनेने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली. नोव्हेंबर २०२३ मध्ये, निर्देशांकाने मे २०१७ मधील सर्व विक्रम मोडीत काढले. तसेच यादरम्यान सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेत २ अब्ज डॉलरच्या ठेवी जमा केल्याच्या एका दिवसानंतरच आयएमएफकडून बेलआऊट पॅकेजला मान्यता मिळाली. चीन आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांनीही अडचणीत असलेल्या पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केला. आयएमएफने टप्प्याटप्प्याने निधी दिला. गेल्या महिन्यात, पाकिस्तान आणि आयएमएफ यांनी १.१ अब्ज डॉलरच्या अंतिम हप्त्याचा वितरणासाठी करार केला. या सर्व सकारात्मक घटनांमुळे पाकिस्तानी शेअर बाजाराला बळ मिळाले.

पाकिस्तानी अर्थव्यवस्था किती गाळात?

पाकिस्तानची अर्थव्यवस्था केवळ ३५० अब्ज डॉलरची असून अजूनही गंभीर संकटात आहे.

तिच्या डोक्यावर १३० अब्ज डॉलरपेक्षा परकीय कर्ज आहे. तर त्याचा परकीय चलन साठा केवळ ८ अब्ज इतका तुटपुंजा आहे. म्हणजेच तो केवळ दोन महिन्यांच्या आयात समतुल्य आहे. याउलट भारताकडे पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या दुप्पट आकाराचा म्हणजेच सुमारे ६३५ अब्ज डॉलर इतका मोठा परकीय चलन गंगाजळीचा साठा आहे. बांगलादेशाची अर्थव्यवस्था ४५५ अब्ज डॉलरसह पाकिस्तानी  अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था सध्या ४ लाख कोटींच्या उंबरठ्यावर असून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. महागाई कमी झाली असली तरी ती सध्या २३ टक्क्यांवर आहे.भारतात महागाई दर सध्या ५ टक्क्यांच्या आसपास आहे. पाकिस्तानी रुपयाचे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ५० टक्के अवमूल्यन झाले आहे. अशा परिस्थितीत आयएमची मदत म्हणजे, कित्येक दिवस भुकेल्या असलेल्या माणसासमोर रिकामी थाळी ठेवण्यासारखेच आहे.

पाकिस्तानी शेअर बाजाराचा जीव केवढा?

पाकिस्तानी लोकसंख्या २३ कोटी आहे. लोकसंख्येशी तुलना करता भांडवली बाजारात केवळ २.५ लाख ते ३ लाख सक्रिय डिमॅट खाती आहेत. त्यामुळे मूठभर लोकांकडून सहज पाकिस्तानी शेअर बाजारावर प्रभाव पाडणे सहज शक्य आहे. पाकिस्तानी शेअर बाजाराचे केवळ ३३ अब्ज डॉलरचे बाजार भांडवल आहे; याउलट भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज या एकट्या कंपनीचे बाजार भांडवल २३० अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २० लाख कोटींपुढे आहे. तसेच भारतीय भांडवली बाजरातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४५७४ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. पाकिस्तानमध्येदेखील म्युच्युअल फंड घराणी आहेत. पण त्यापेक्षाही तेथील गुंतवणूकदार रिअल इस्टेट आणि इतर गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्साही आहेत. पाकिस्तानी शेअर बाजारात १९ एप्रिल २०२४ अखेर केवळ ५४४ कंपन्या सूचिबद्ध आहेत. तर याच कालावधीत भारतात ५,३०० कंपन्या सूचिबद्ध आहेत.

पाकिस्तान सरकारचे हात बांधलेले का? 

आयएमएफने पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याआधी काही अटी ठेवल्या होत्या. अर्थात त्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या चांगल्यासाठी आणि काही विकसित देशांमधील कंपन्यांना पाकिस्तानी बाजारपेठ आणखी खुली करण्यासंदर्भात होत्या. सरकारने अर्थसंकल्पातील अनियमित खर्च टाळण्यासाठी प्रयत्न करावेत आणि लोकांना कर सवलती देऊ नयेत, असे आयएमएफने सांगितले. आयएमएफने पाकिस्तानच्या ऊर्जा क्षेत्राचा विशेष उल्लेख केला आहे. पाकिस्तानमधील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. तर ते न देता वीज दरांमध्ये वाढ करून खर्च भरून काढण्याचा प्रयत्न केला जावा असे सांगितले. देशातील जनता आधीच महागाईने होरपळून निघालेली असताना आयएमएफच्या मदतीने पाकिस्तानी सामान्य लोकांना सध्या तरी अधिक आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो आहे.