भारतासह जगातील प्रमुख अण्वस्त्रसज्ज देश आपापली अण्वस्त्रयंत्रणा अधिकाधिक अद्ययावत करीत आहेत. अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याबरोबरच ती डागण्याच्या यंत्रणेतही सुधारणा करण्यात आली आहे. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या (सिप्री) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ‘सिप्री’ने आपले २०२५ चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला.
भारतातील अण्वस्त्रे : भारत १९७४ मध्ये पहिली अणुचाचणी घेतली. १९९८ मध्ये दुसऱ्यांदा अणु चाचणी घेऊन आपण अण्वस्त्रसज्ज म्हणून भारताने एक प्रकारे जाहीर केले. स्वीडनमधील ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या (सिप्री) अहवालानुसार, भारताकडे जानेवारी २०२५ पर्यंत १८० अण्वस्त्रे आहेत. गेल्या वर्षापेक्षा त्यात थोडी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा १७२ इतका होता. ही अण्वस्त्रे युद्धभूमीवर तैनात केलेली नसून, तिचा साठा केल्याचे अहवालात म्हटले आहे. युद्धावेळी प्रत्यक्ष प्रक्षेपकामध्ये ही अण्वस्त्रे ठेवली जात असून, भारतामध्ये शांततेच्या काळात ती वेगळी ठेवली जातात, असे मानले जाते. मात्र, भारताने अण्वस्त्र सुसज्ज अवस्थेतील क्षेपणास्त्रे कॅनिस्टरमध्ये (पूर्ण पॅकबंद अशा यंत्रणेत) ठेवण्यास सुरुवात केली आहे. प्ररोधनासाठी भारताकडून सागरी गस्त घालण्यात येत आहे. कॅनिस्टरमधील क्षेपणास्त्रे आणीबाणीच्या प्रसंगात शत्रूवर केव्हाही तातडीने डागता येतात. प्रक्षेपणाचा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी होतो. त्याचा आणीबाणीच्या काळात उपयोग होतो.
भारतामधील अण्वस्त्रे डागणारी यंत्रणा : अण्वस्त्रे हवेतून, जमिनीवरून आणि समुद्रातूनही, अशी त्रिमितीय (triad) प्रकारे डागता येतील, अशी यंत्रणा भारताने यापूर्वीच विकसित केली आहे. भारताची लढाऊ विमाने, हवेतून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, पाणबुडीतून डागता येणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे सज्ज आहेत. बॅलिस्टिक क्षेपणास्त्राद्वारे एकाच वेळी एकाहून जास्त अण्वस्त्रे डागता येतील, यासाठीचे मल्टिपल इंडिपेंडंट रिएन्ट्री व्हेइकल (एमआयआरव्ही) हे तंत्रज्ञानही भारताकडे आहे. अशा क्षेपणास्त्रांना भेदणे कठीण असते. भारताने अग्नी-५ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित केले असून, ते पाच हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. तसेच, अग्नी प्राइम हे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटरपर्यंत मारा करते. पाकिस्तान आणि चीन या प्रमुख आव्हानांचा विचार करून ही क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. ही दोन्ही क्षेपणास्त्रे कॅनिस्टरमध्ये ठेवून आणीबाणीच्या काळात वापरासाठी सुसज्ज ठेवली जाऊ शकतात.
भारत-पाकिस्तान संघर्षाचा उल्लेख
अहवालात भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला आहे. ‘सिप्री’च्या महासंहारक शस्त्र कार्यक्रमाचे सहयोगी वरिष्ठ संशोधक मॅट कोर्डा यांनी सांगितले, ‘अण्वस्त्रांशी संबंधित लष्करी प्रणालीवरील हल्ले आणि त्रयस्थांकडून झालेल्या विपर्यस्त माहितीच्या प्रसारणामुळे पारंपरिक युद्ध अणुयुद्धात बदलण्याची शक्यता होती. अण्वस्त्रांवरील निर्भरता ज्या देशांना वाढवायची आहे, त्यांच्यासाठी हा गंभीर धोका आहे.’ अहवालामध्ये अण्वस्त्रांशी संबंधित लष्करी प्रणालीवर हल्ले केल्याचा उल्लेख केला असला, तरी भारताने पाकिस्तानमध्ये तसे हल्ले केलेले नाहीत. मात्र, पाकिस्तानमधील अण्वस्त्रांशी संबंधित ठिकाणांपासून जवळ असलेल्या विमानतळांना भारताने लक्ष्य केले होते.
पाकिस्तान आणि चीन
चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश १९६४ आणि १९९८ मध्ये अण्वस्त्रसज्ज झाले. पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे असल्याचे ‘सिप्री’च्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानही अण्वस्त्रे डागण्याच्या यंत्रणेत सुधारणा करीत आहे. पाकिस्तानने विखंडन (फिसाइल) सामग्री प्राप्त केली आहे. येत्या काळात पाकिस्तानही अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याची शक्यता आहे. चीनकडे ६०० अण्वस्त्रे असून, त्यातील २४ युद्धभूमीवर तैनात केल्याच्या स्थितीत आहेत. चीनकडील अण्वस्त्रांची संख्या गेल्या वर्षापेक्षा १०० ने अधिक असून, पाकिस्तानकडील अण्वस्त्रांची संख्या जैसे-थे आहे. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा साठा करण्यासाठी चीनने सुमारे ३५० सिलोज (दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा साठा करणारी यंत्रणा) तयार केले आहेत. चीनही अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ करीत आहे. मात्र, अमेरिका आणि रशियाच्या तुलनेत या अस्त्रांची संख्या खूपच कमी आहे.
अमेरिका आणि रशिया
अमेरिका आणि रशियाकडे मिळून जगातील ९० टक्के अण्वस्त्रे आहेत. १९४५ आणि १९४९ मध्ये हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाले. अमेरिकेकडे ५१७७ आणि रशियाकडे ५४५९ अण्वस्त्रे आहेत. सुमारे १७०० अण्वस्त्रे युद्धभूमीवर तैनात आहेत. शीतयुद्धकाळानंतर अमेरिका आणि रशियाने अण्वस्त्रांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात केली. दर वर्षी त्यामुळे एकूण अण्वस्त्रे कमी झाली. मात्र, येणाऱ्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अण्वस्त्रांचा साठा, डागण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञान या देशांकडे आहे.
इतर देश
ब्रिटन, फ्रान्स, उत्तर कोरिया, इस्रायल या देशांकडे अनुक्रमे २२५, २९०, ५० आणि ९० अण्वस्त्रे आहेत. हे देश अनुक्रमे १९५२, १९६० आणि २००६ मध्ये अण्वस्त्रसज्ज झाले. इस्रायलने अणुचाचणी केल्याचे किंवा अण्वस्त्रसज्ज असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केलेले नाही. मात्र, इस्रायल अण्वस्त्रसज्ज असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सिप्रीच्या अहवालात इस्रायलकडे ९० अण्वस्त्रे असल्याचे म्हटले आहे.
अहवालातील एकूण आकडेवारी
‘सिप्री’च्या अहवालातील माहितीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये जगभरात एकूण १२,२४१ अण्वस्त्रे असून, त्यातील ९,६१४ अण्वस्त्रांचा साठा केलेला आहे. ३९१२ अण्वस्त्रे युद्धभूमीवर तैनात आहेत. अण्वस्त्रे आणि त्यांचे आकडे पाहता जगात धोकादायक अशा नव्या अण्वस्त्रांच्या स्पर्धेची शर्यत सुरू असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
अण्वस्त्रांच्या स्पर्धेतून साधणार काय?
अण्वस्त्रांच्या स्पर्धेतून जगभरात तणावातच वाढ झालेली यापूर्वी पाहायला मिळाले आहे. त्यामुळे शीतयुद्धकाळात आणि नंतर अण्वस्त्रांच्या संख्येत अमेरिका आणि रशियाने कपात केली होती. अण्वस्त्रमुक्त जग असे स्वप्नही काही जण आजही बाळगून आहेत. मात्र, बदलती भूराजकीय स्थिती आणि संहारक अस्त्रांची, तंत्रज्ञानाची नित्यनूतन निर्मिती यामुळे तणावात भर पडत आहे. एक अण्वस्त्रही महासंहारास पुरेसे असते. तसेच, अण्वस्त्रांची निर्मिती ही प्रामुख्याने प्ररोधन अर्थात डेटरन्स म्हणून करण्यात आलेली आहे. अण्वस्त्रांचा वापर करावाच लागू नये, यासाठीचेच हे अस्त्र आहे. मात्र, सध्या सुरू असणारी युद्धे पाहता त्याचे पर्यवसान महासंहारक अशा अणुयुद्धात होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. अणुयुद्धाचा भडका उडाला, तर ‘युद्धे टळावीत’ या अण्वस्त्रनिर्मितीमागील उद्देशालाच हरताळ फासला जाईल.
prasad.kulkarni@expressindia.com