scorecardresearch

विश्लेषण : बुद्धिबळ जगज्जेत्या कार्लसनला हरवणारा कोण हा प्रज्ञानंद?

भारताचा युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एअरथिंग्ज मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करण्याचा चमत्कार केला.

– सिद्धार्थ खांडेकर

भारताचा युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एअरथिंग्ज मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करण्याचा चमत्कार केला. आजवर अशी कामगिरी करणारे भारताचे दोनच ग्रँडमास्टर्स आहेत – विश्वनाथन आनंद आणि पेंटाल्या हरिकृष्ण. दोघांनाही अर्थातच सोळाव्या वर्षी जगज्जेत्या बुद्धिबळपटूशी दोन हात करण्याची संधी मिळाली नव्हती!

प्रज्ञानंद आणि कार्लसन सध्या कोणत्या स्पर्धेत खेळत आहेत?

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे आंतरराष्ट्रीय प्रवासावर बरीच बंधने आल्यामुळे हल्ली बहुतेक बुद्धिबळ स्पर्धा ऑनलाइनच खेळवल्या जातात. करोनाच्या आधीही ऑनलाइन बुद्धिबळ हा प्रकार लोकप्रिय बनला होता. पण करोनामुळे प्रमुख बुद्धिबळपटू या प्रकाराकडे मोठ्या संख्येने वळले. अशीच एक ऑनलाइन स्पर्धा सध्या खेळवली जात असून, तिचे नाव एअरथिंग्ज इंटरनॅशनल. या स्पर्धेत जगज्जेत्या कार्लसनसह जगातील बहुतेक सर्व अव्वल बुद्धिबळपटू खेळत आहेत.

प्रज्ञानंद या स्पर्धेतील एकमेव भारतीय बुद्धिबळपटू आहे. प्रत्येकी १५ मिनिटांचे डाव आणि प्रत्येक चालीसाठी १० सेकंदांची वाढ असे स्पर्धेतील डावांचे स्वरूप आहे. १६ बुद्धिबळपटूंच्या या स्पर्धेत पहिले आठ बुद्धिबळपटू बाद फेरीत खेळण्यासाठी पात्र ठरतील. प्रज्ञानंदने रविवारीच आणखी एक बलाढ्य बुद्धिबळपटू अमेरिकेच्या लेव्हॉन अरोनियानला हरवले, परंतु बाद फेरी गाठण्यासाठी त्याला अजून बरेच प्रयत्न करावे लागतील. कारण दुसऱ्या दिवसअखेरीस तो १४व्या स्थानावर होता.

कार्लसनविरुद्धच्या डावात काय झाले?

कार्लसनविरुद्ध प्रज्ञानंदकडे काळी मोहरी होती. सहसा या खेळात पांढरी मोहरी घेऊन खेळणाऱ्याची बाजू थोडी वरचढ असते, कारण डावाची सुरुवात तो करतो. परंतु कार्लसनविरुद्ध प्रज्ञानंदने एक प्यादे गमावूनही चिकाटीने प्रतिकार केला. प्रज्ञानंदने कार्लसनच्या राजाविरुद्ध मोर्चेबांधणी केली. कार्लसनने आणखी एक प्यादे जिंकले, परंतु तोपर्यंत प्रज्ञानंदचा वजीर, घोडा आणि उंटाने कार्लसनच्या राजाला खिंडीत गाठले. या वेढ्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांत कार्लसनचा घोडा एकाकी पडला आणि अडकला. तो गमावण्याच्या आधीच चाळीसाव्या चालीला कार्सनने पराभव मान्य केला. पारंपरिक, जलद वा अतिजलद अशा कोणत्याही प्रकारात जगज्जेत्या कार्सनला हरवण्याची प्रज्ञानंदची ही पहिलीच वेळ.

याआधी कार्लसनला हरविणारे भारतीय बुद्धिबळपटू कोण?

अर्थातच माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदने कार्लसनला पारंपरिक, जलद आणि अतिजलद अशा सर्व प्रकारांमध्ये हरवले आहे. मात्र जगज्जेतेपदाच्या दोन लढतींत आनंदला हरवूनच कार्लसन युग सुरू झाले होते. आणखी एक भारतीय ग्रँडमास्टर पेंटाल्या हरिकृष्णने २००५मध्ये एका स्पर्धेत कार्लसनला पारपंरिक प्रकारात हरवले होते. आनंदने कार्लसनला आजवर १९वेळा, तर हरिकृष्णने २वेळा हरवले आहे. अर्थात आनंद आणि हरिकृष्ण या दोघांविरुद्ध नंतर बहुतेक काळ कार्लसनचाच वरचष्मा राहिला. प्रज्ञानंद आणि कार्लसन यांच्यातील एकमेव पारंपरिक डाव नुकत्याच संपलेल्या टाटा स्टील स्पर्धेत खेळवला गेला, आणि त्यात कार्लसनने बाजी मारली होती.

भारताचे आशास्थान…

१६ वर्षीय प्रज्ञानंदकडून भविष्यात भारताला मोठ्या आशा आहेत. तो अवघ्या १०व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा आंतरराष्ट्रीय मास्टर ठरला होता. तर १२ वर्षे १० महिने १३ दिवस या वयात तो इतिहासातील दुसरा सर्वांत युवा ग्रँडमास्टर बनला. अत्यंत बेडरपणे आक्रमक खेळण्याकडे त्याचा कल असतो. त्यामुळे नेत्रदीपक विजयांबरोबरच धक्कादायक पराभवही त्याला पाहावे लागतात. पारंपरिक बुद्धिबळ प्रकारात सातत्याने यशस्वी होण्यासाठी त्याला आक्रमक खेळाला काहीशी मुरड घालावी लागेल, असे बुद्धिबळ विश्लेषकांचे मत आहे. मात्र प्रज्ञानंदने हा सल्ला अद्याप पुरेसा मनावर घेतलेला दिसत नाही.

हेही वाचा : विश्लेषण : यावर्षी खेळू न शकणाऱ्या जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने आठ कोटींना विकत का घेतले? जाणून घ्या…

वयसुलभ उत्साह आणि धोके पत्करण्यासाठी आवश्यक हिंमत त्याच्या ठायी भरपूर आहे. नुकत्याच झालेल्या टाटा स्टील स्पर्धेत पारंपरिक प्रकारात खेळतानाही त्याने दानिल दुबॉव आणि व्लादिमीर एसिपेन्को या उत्कृष्ट रशियन बुद्धिबळपटूंबरोबरच त्याला सिनियर असलेला भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीला हरवून दाखवले होते. त्यामुळे मोठ्या स्तरावर मोठ्या बुद्धिबळपटूंशी भिडण्याची कला त्याला पुरेशी अवगत झाली आहे. ग्रँडमास्टर आर. बी. रमेश याचे दीर्घ मार्गदर्शन आणि जगज्जेता विश्वनाथन आनंद याच्या युक्तीच्या गोष्टी घोटवून तो अव्वल स्तरावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta explained on airthings masters r praggnanandhaa world no 1 magnus carlsen print exp 0222 pbs

ताज्या बातम्या