वायू प्रदूषणाच्या दीर्घकालीन संपर्कामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढत असल्याचे केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. गुरुवारी द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये ५१ वेगवेगळ्या विषयांवरील केलेले अभ्यास प्रसिद्ध करण्यात आले. तसंच २.९ कोटींपेक्षा अधिक लोकांच्या डेटाचा यात समावेश आहे. हे लोक किमान एका वर्षासाठी हवेच्या प्रदूषणाच्या संपर्कात होते.
वायू प्रदूषण ही सध्या भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. भारतात दिल्ली हे सर्वात प्रदूषित असल्याचे समोर येत असतानाच मुंबईतही परिस्थिती काही वेगळी दिसत नाही. वाढत्या प्रदूषणामुळे वयोवृद्ध, लहान मुलांनाच नाही तर सरसकट सर्वांनाच श्वसनाचे तसंच इतर आजाराचे धोके संभवतात. अशातच डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभ्रंश या आजारालाही वायू प्रदूषण कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
अभ्यास काय सांगतो?
संशोधकांनी केलेल्या अभ्यासात तीन प्रकारच्या हवेतील प्रदूषक आणि डिमेन्शिया यामध्ये काही संबंध दिसून आले, त्याबाबत जाणून घेऊ…
PM2.5
वाहनांच्या धुरापासून आणि औष्णिक विद्युत प्रकल्पांपासून तयार होणारा हा अतिसूक्ष्म कण असतो. याचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहूनही कमी असतो. अभ्यासानुसार, PM2.5 च्या प्रत्येक १० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतक्या दीर्घकालीन संपर्कामुळे डिमेन्शियाचा सापेक्ष धोका १७ टक्क्यांनी वाढतो. संदर्भासाठी शनिवारी दिल्लीतल्या आयटीओ एक्यूआय मॉनिटरिंग स्टेशनवर PM2.5चे सरासरी पातळी ७७ इतकी होती.
नायट्रोजन डायऑक्साइड
नायट्रोजन डायऑक्साइड हे प्रामुख्याने इंधन जळण्यामुळे म्हणजे वाहने, औद्योगिक प्रक्रिया आणि औष्णिक प्रकल्पांमुळे तयार होते. नायट्रोजन डायऑक्साइडच्या प्रत्येक १० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतक्या दीर्घकालीन संपर्कामुळे डिमेन्शियाचा धोका ३ टक्क्यांनी वाढतो. आयटीओ स्टेशनवरील नायट्रोजन डायऑक्साइडची सरासरी पातळी शनिवारी संध्याकाळपर्यंत ८३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरइतकी होती.
काजळी किंवा ब्लॅक कार्बन
हे प्रामुख्याने वाहनांपासून निघणाऱ्या धुरातून आणि लाकूड जाळण्यामुळे तयार होते. प्रत्येक १ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरच्या दीर्घकालीन संपर्कामुळे डिमेन्शियाचा धोका १३ टक्क्यांनी वाढतो असे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ब्लॅक कार्बनसंदर्भातील स्वतंत्र आकडेवारी जाहीर करत नाही.
शास्त्रीय स्पष्टीकरण काय?
गेल्या काही वर्षांपासून संशोधकांनी हे स्पष्ट केले आहे की, हवेतील प्रदूषणामुळे मेंदूमध्ये दाह आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे शरीरात विषारी ऑक्सिजन अणूंचे उत्पादन आणि त्याचा नाश यामधील असंतुलन. यामुळे पेंशींचे नुकसान होते. हे दोन्ही घटक डिमेन्शियाच्या सुरुवातीला आणि वाढीस कारणीभूत असतात. हे प्रदूषित घटक थेट मेंदूपर्यंत पोहोचून किंवा फुप्फुस आणि हृदयविकाराच्या आजारांमध्ये आढळणाऱ्या समान जैविक प्रक्रियांमार्फत हे परिणाम घडवून आणतात.
महत्त्वाचे मुद्दे:
- केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी २९ दशलक्षांहून अधिक लोकांवर अभ्यास केला
- वायू प्रदूषणाचा मेंदूवर परिणाम
- डिमेन्शिया होण्याचा धोका वाढतो
- प्रदूषित वातावरणात जास्त काळ राहिल्याने सूक्ष्म करण मेंदूपर्यंत पोहोचतात
- हवेच्या गुणवत्तेचा मानसिक आरोग्याशी संबंध
- हवेची गुणवत्ता सुधारण्याची गरज
हा अभ्यास किती महत्त्वाचा आहे?
डिमेन्शिया म्हणजे अशी स्थिती, जिचा परिणाम स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि दैनंदिन कामकाजावर होतो. हा विकार हळूहळू गंभीर होत जातो आणि प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २०२१ मध्ये सुमारे ५७ दशलक्ष लोकांना डिमेन्शिया होता आणि २०५० पर्यंत हा आकडा किमान १५० दशलक्षापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
विकसनशील देशांमध्ये प्रदूषण झपाट्याने वाढते, त्यामुळे डिमेन्शिया रुग्णांच्या संख्येत अधिक झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ९९ टक्के जागतिक लोकसंख्या अशा हवेत श्वास घेते जी संघटनेने दिलेल्या मार्गदर्शक मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषित असते. याचा सर्वाधिक परिणाम कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दिसून येतो.
“डिमेन्शिया रोखण्यासाठी केवळ आरोग्य व्यवस्थेवर लक्ष न देता शहरी नियोजन, वाहतूक धोरण आणि पर्यावरणीय नियम यांचाही समावेश असणे आवश्यक आहे. या अभ्यासामुळे बहुआयामी दृष्टिकोनाची गरज अधोरेखित होते”, असे केंब्रिज विद्यापीठाचे डॉ. क्रिस्टीआन ब्रेडेल यांनी सांगितले आहे.