How cops caught ‘looteri bride’: ही ‘लुटेरी दुल्हन’ सासरच्या मंडळींचा विश्वास संपादन करून लग्न झाल्यावर काही तासांतच मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग घेऊन नाहीशी होत असे. हे प्रकरण २०१५ मधील बॉलिवूड चित्रपट ‘डॉली की डोली’ची आठवण करून देणारं आहे. या चित्रपटात सोनम कपूरने अशाच प्रकारच्या ‘लुटेरी दुल्हन’ची भूमिका साकारली होती, जिने अनेक पुरुषांशी लग्न केलं आणि लग्नाच्या रात्रीचं त्यांना लुटून पसार झाली होती.
भोपाळ पोलिसांनी अनुराधा नावाच्या ‘लुटेरी दुल्हन’वर कारवाई करताना सांगितलं की, या गुन्ह्यात अनुराधाला सहकार्य करणारे आणखी काही साथीदारही आहेत. सध्या पोलीस संपूर्ण रॅकेटचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अनुराधाने २५ पुरुषांना लग्नाचे आमिष दाखवून फसवलं आणि प्रत्येक वेळी लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाली.
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘डॉली की डोली’ या बॉलिवूड चित्रपटाची कथा प्रत्यक्ष खऱ्या आयुष्यात घडली आहे. अनुराधा पासवान या २३ वर्षांच्या तरुणीला राजस्थानमधील सवाई माधोपूर पोलिसांनी भोपाळमध्ये अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने अलीकडेच एका व्यक्तीकडून २ लाख रुपये उकळले होते आणि ती पुढच्या लग्नाची योजना आखत होती. त्याच पार्श्वभूमीवर अनुराधाने हे लग्नाचे फसवणूक रॅकेट कसं चालवलं, ती कशी पकडली गेली आणि पोलिसांनी या बनावट विवाह टोळीबद्दल काय माहिती दिली याचा घेतलेला हा आढावा.
अनुराधाने कशी केली २५ लग्नं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा पासवान ही एका नियोजित विवाह फसवणूक रॅकेटचा भाग होती. या रॅकेटने लहान शहरांतील अविवाहित पुरुषांना टार्गेट केलं. ती गरीब आणि लग्नासाठी आतुर असल्याचे भासवून समोरच्या वर पक्षाची फसवणूक करत असे. परिपूर्ण वधू आणि सून असल्याचा अभिनय करत ती नवऱ्याच्या कुटुंबींयांचा विश्वास संपादन करत असे. एकदा विश्वास संपादन केला की, मुलाशी लग्न करून काही दिवसांतच घरातील रोख रक्कम, दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन फरार होत असे. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात तिची वागणूक ही वरकरणी दिसायला साधी पण अत्यंत चलाख अशी होती. स्वतःला आदर्श वधू म्हणून सादर करणं, विश्वासार्ह कागदपत्रं देणं, कुटुंबाचा विश्वास मिळवणं, लग्न करणं आणि नंतर काही दिवसांत घरातून नाहीस होणं असा हा सुनियोजित प्लान होता.
तिच्या टोळीतील सदस्य संभाव्य वरांना तिचे फोटो आणि माहिती दाखवत, तिला परफेक्ट मॅच म्हणून सादर करत. वधू-वराची भेट घडवणारी व्यक्तीही प्रत्यक्षात या टोळीचा भागच असे आणि ती लग्न जमवण्यासाठी २ लाख रुपये फी घेत असे, अशी माहिती NDTV ने दिली आहे. एकदा का संबंध पक्के झाले की, सहमतीचे एक लेखी पत्र घेतलं जात असे आणि लग्नघरात किंवा मंदिरात पारंपरिक पद्धतीने लग्न केलं जाई. त्यानंतर त्यांची योजना अंतिम टप्प्यात पोहोचत असे. काही दिवसातच ती अन्नात बेशुद्ध होण्याचं औषध मिसळून घरातील दागिने, रोख पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पसार होत असे.
वराला लग्नासाठी कर्ज घ्यावं लागलं
२० एप्रिल रोजी सवाई माधोपूर येथील विष्णू शर्मा यांचं लग्न अनुराधाशी झालं. हे लग्न पप्पू मीणा नावाच्या एका दलालामार्फत ठरवण्यात आलं होतं, त्याने शर्मांकडून २ लाख रुपये घेतले. २ मे रोजी, शर्मा घरी परतले तेव्हा त्यांची नववधू नाहीशी झाली होती. तिच्याबरोबर घरातील सोनं, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील नाहीशा झाल्या होत्या. शर्मा यांनी NDTV ला सांगितलं, “मी हातगाडी चालवतो आणि कर्ज घेऊन लग्न केलं होतं. मी मोबाईलसुद्धा उधार घेतला होता. ती तोसुद्धा घेऊन गेली. मला कधीच वाटलं नव्हतं की, ती मला फसवेल.” यानंतर त्यांनी सवाई माधोपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
‘लुटेरी दुल्हन’ कशी पकडली गेली
अनुराधा पासवान ही मूळची उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील असून एकेकाळी तिने एका रुग्णालयात काम केलं होतं. कौटुंबिक वादामुळे तिने पतीचं घर सोडलं होतं. त्यानंतर ती भोपाळमध्ये स्थायिक झाली. तिथे ती व्हॉट्सअॅपवरून चालणाऱ्या विवाहविषयक फसवणूक रॅकेटमध्ये सामील झाली, असं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने नमूद केलं आहे. विष्णू शर्मांच्या तक्रारीनंतर, सवाई माधोपूर पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडण्यासाठी खास योजना आखली. त्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला वर म्हणून पाठवलं. जेव्हा एका एजंटने अनुराधाचा फोटो शेअर केला, तेव्हा पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.
NDTV शी बोलताना संबंधित पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, “तपासादरम्यान आम्हाला सर्व कागदपत्रं आणि विवाह करार बनावट असल्याचं आढळून आलं. आमच्या टीममधून एका कॉन्स्टेबलला वर असल्याचं दाखवून आम्ही तिला लग्नासाठी तयार केलं आणि तिला पकडलं. “या रॅकेटशी संबंधित इतर अनेक लोकांचीही ओळख पटली आहे. सध्या राजस्थान पोलीस इतर राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधून संपूर्ण जाळं उघड करण्याच्या बेतात आहेत.
हे पहिल्यांदाच झालेलं नाही
अशा प्रकारच्या फसवणुकीचं हे पहिलंच प्रकरण नाही. यापूर्वीही असाच एक प्रकार समोर आला होता, त्या प्रकरणात एका महिलेनं अनेक पुरुषांशी विवाह केले होते आणि सेटलमेंटच्या नावाखाली जवळपास १.२५ कोटी रुपये उकळले. सीमा नावाची ही महिला उत्तराखंडमध्ये राहत होती. तिने सर्वप्रथम २०१३ साली आग्रा येथील एका व्यावसायिकाशी लग्न केलं. नंतर तिने त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आणि सेटलमेंट म्हणून ७५ लाख रुपये घेतले, असं NDTV ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. यानंतर तिने आणखी एका पुरुषाशी लग्न केलं आणि पुन्हा एक सेटलमेंट करून पैसे घेतले.
‘ती’ही पकडली गेली…
२०२३ साली, तिने जयपूरमधील एका व्यावसायिकाशी लग्न केलं आणि लग्नानंतर रोख रक्कम व दागिन्यांसह सुमारे ३६ लाख रुपये घेऊन पळून गेली. जेव्हा त्या व्यावसायिकाच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली, तेव्हा जयपूर पोलिसांनी सीमाला अटक केली. तपासात असंही उघड झालं की, सीमा ही विवाहित किंवा विधुर पुरुषांना लक्ष्य करत होती आणि मॅट्रिमोनियल वेबसाइट्सवरून त्यांच्याशी संपर्क साधत होती, असा खुलासा या वृत्तात करण्यात आला आहे.