यंदा मोसमी पाऊस राज्यात लवकर दाखल झाला. त्यानंतर पहिले दोन महिने पावसाचा जोर कमी-जास्त राहिला. सप्टेंबरच्या अखेरीस मात्र पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक भागांत अतिवृष्टी झाली. सप्टेंबर महिन्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा मात्र सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला. पाऊस माघारी जायला उशीर का झाला, नेमका पाऊस माघारी कधी जातो याचा ऊहापोह.

पावसाला परतायला विलंब?

मोसमी पावसाच्या हंगामाचे चार महिने पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राजस्थानमधून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होतो. हवामान विभागाच्या सर्वसाधारण तारखांनुसार १७ सप्टेंबरला राजस्थानच्या काही भागांतून पाऊस माघारी फिरणे अपेक्षित असते. यंदा त्याला दोन दिवसांचा विलंब झाला. म्हणजे १९ सप्टेंबरला मोसमी पाऊस वायव्य राजस्थानच्या काही भागातून माघारी फिरल्याचे जाहीर करण्यात आले. हा दोन दिवसांचा विलंब नंतर मात्र दीर्घ ठरला.

कारण राजस्थानच्या काही भागातून माघारी फिरलेला पाऊस त्याच भागात तब्बल दहा दिवस रखडला. ३ ऑक्टोबरनंतर परतीच्या प्रवासाला काहीसा वेग आला. त्यानुसार राजस्थानचा काही भाग, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून पाऊस माघारी फिरला असला, तरी त्याचा परतीचा प्रवास विलंबानेच होतो आहे.

माघार लांबणीवर जाण्याची कारणे काय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभाच्या प्रणालीमुळे सध्या राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. याचबरोबर सप्टेंबर अखेरीस लागोपाठ दोन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय झाला. त्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळाचा परिणाम जरी महाराष्ट्रावर झाला नसला, तरी त्यामुळे निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास खोळंबला.

मुंबईचा विचार केला असता, द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, ती बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेली आहे. परिणामी मुंबईत मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला.

मोसमी पावसाच्या वेळापत्रकात बदल?

२०२० मध्ये मोसमी पावसांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हंगामाचा चार महिन्यांचा कालावधी संपल्यानंतरही पुढे एक ते तीन आठवड्यांपर्यंत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परिणामाने होणारा पाऊस सुरूच असतो. हवामान विभागाकडून मोसमी पावसाचे आगमन आणि परतीच्या प्रवासाच्या वेळांबाबत अभ्यास करून नियोजित सर्वसाधारण तारखांमध्ये आवश्यकतेनुसार बदल केले जातात. यानुसार २०२० मध्ये हे बदल करण्यात आले आहेत‌.

पूर्वी महाराष्ट्रात मोसमी पावसाच्या प्रवेशाची सर्वसाधारण तारीख ८ ते १० जूनच्या दरम्यान होती. पण, गेल्या अनेक वर्षांत प्रवेशाला होणारा विलंब लक्षात घेता ती १६ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यातून मोसमी पाऊस माघारी जाण्याची तारीख २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यानची होती. पावसाच्या परतीच्या प्रवासाला होणारा विलंब लक्षात घेता ती १२ ऑक्टोबपर्यंत वाढविण्यात आली आहे.

पावसाचा कालावधी किती?

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या सरासरी कालावधीत मोसमी पाऊस सुमारे १०० ते १२० दिवसांची हजेरी लावून निघून जाणे आवश्यक असते. १२० दिवसांपर्यंत मोसमी पावसाच्या कालावधीतील पाऊस नैसर्गिक समजला जातो. त्यानंतरही पाऊस सुरूच राहिला तर त्याला वातावरणीय घटना कारणीभूत ठरतात. मोसमी पावसाच्या हंगामात १०० ते १२० दिवसांत पाऊस किती तीव्रतेने पडला, हे महत्त्वाचे नसते, तर तो किती दिवस पडला याला महत्त्व असते. पण, हंगामानंतर परतीचा कालावधी वाढून पडलेला पाऊस अनेकदा नुकसानकारक ठरतो.

यंदा मोसमी पावसाचा प्रवास कसा?

यंदा नैर्ऋत्य मोसमी पावसाने २४ मे रोजी केरळमध्ये हजेरी लावली. मागील १६ वर्षांच्या तुलनेत यंदा मोसमी वारे केरळमध्ये लवकर दाखल झाले. केरळमध्ये नैर्ऋत्य मोसमी पाऊस सामान्यतः १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान) पावसाचे आगमन होते.

यापूर्वी २३ मे २००९ रोजी मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी शनिवार, २४ मे रोजी मोसमी पाऊस वेळेआधी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मोसमी पावसाने नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे दोन आठवडे आधीच महाराष्ट्राची सीमा ओलांडली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तसेच कर्नाटक, गोव्यात मोसमी पाऊस दाखल झाला त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी २६ मे रोजी मोसमी पाऊस मुंबई, पुणे आणि आसपासच्या परिसरात दाखल झाला. याचबरोबर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला.

यंदा पाऊस किती झाला?

मोसमी पावसाच्या हंगामात १ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत देशभरात सरासरीच्या १०८ टक्के, तर राज्यात सरासरीच्या १२० टक्के पाऊस नोंदवला गेला. राज्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९९४.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा ११८९.४ मिमी पावसाची नोंद झाली. देशात ९३७.२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा मात्र ८६८.६ मिमी पाऊस नोंदला गेला.

देशात बिहार, आसाम-मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या तीन उपविभागांमध्ये कमी पावसाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिवमध्ये झाली आहे. तेथे सरासरीच्या ६१ टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. तर सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पावसाची नोंद झाली. कोकण विभागात पालघर वगळता इतर भागात सरासरीइतक्या पावसाची नोंद झाली. पालघरमध्ये सरासरीच्या ४० टक्के अधिक पावसाची नोंद झाली.