Viral Video Men Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त स्त्रियांनाच होतो, असा एक गैरसमज समाजात आहे. परंतु, पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, हे अनेकांना ठाऊकच नसते. हे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी असले, तरी जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या पुरुष रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे पुरुषांनाही या रोगाची लक्षण नेमकी काय आहेत, हे माहीत असणं आवश्यक आहे. भारतातील पुरुषांमध्ये आढळणाऱ्या स्तन कर्करोगाचे प्रमाण (एकूण स्तन कर्करोगांमध्ये) सुमारे ०.४ ते १.० टक्के असे आढळले आहे. भारतात या आजाराची माहिती कमी असल्यामुळे निदान व उपचारालाही विलंब होतो.

पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रकार

‘इनवेसिव्ह डक्टल कार्सिनोमा (Invasive Ductal Carcinoma – IDC)’ हा पुरुष आणि महिला दोघांमध्येही आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे. या कर्करोगाची सुरुवात स्तनातील स्तनाग्रापर्यंत दूध पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या सूक्ष्म नलिकांमध्ये (ducts) होते. त्यानंतर या नलिकांच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ सुरू होते. त्यामुळे पेशी नलिकांच्या भिंती फोडून आसपासच्या ऊतींमध्ये पसरू लागतात. नलिकांच्या आतील भागात ट्यूमर तयार होऊ लागल्यानंतर हळूहळू हा ट्यूमर नलिकेच्या भिंती फोडून बाहेरच्या स्तनाच्या ऊतींमध्ये पसरतो, म्हणूनच त्याला ‘इनवेसिव्ह’ (आक्रमक) असे म्हणतात.

महिलांप्रमाणे पुरुषांमध्येही काही प्रमाणात स्तनाच्या ऊती आणि दूध वाहून नेणाऱ्या नलिका असतात. पुरुषांमध्ये दूध निर्मिती होत नसली, तरी या नलिका अस्तित्वात असतात आणि त्यातूनच कर्करोग निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पुरुषांमध्ये ‘इनवेसिव्ह डक्टल कार्सिनोमा’ (IDC) हा ब्रेस्ट कॅन्सरचा प्रकार सर्वाधिक आढळतो. लवकर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास, या प्रकारातील कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य असते. त्यामुळे पुरुषांनीही स्तनाच्या भागात कोणताही बदल दिसल्यास दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

आक्रमक लोब्युलर कार्सिनोमा

पुरुषांमध्ये ‘आक्रमक लोब्युलर कार्सिनोमा (Invasive Lobular Carcinoma – ILC)’ देखील विकसित होऊ शकतो. हा प्रकार क्वचितच आढळतो. या प्रकारात कर्करोगाची सुरुवात स्तनातील दूध निर्माण करणाऱ्या ग्रंथींमध्ये (lobules) होते. परंतु, पुरुषांमधील स्तनाच्या ऊतींमध्ये या ग्रंथी अतिशय मर्यादित प्रमाणात असतात. त्यामुळे पुरुषांमध्ये इनवेसिव्ह डक्टल कार्सिनोमाच्या (IDC) तुलनेत लोब्युलर कार्सिनोमा अत्यंत दुर्मीळ स्वरूपात आढळतो.

स्तनाच्या कर्करोगाचे आणखी दोन प्रकार

  • याशिवाय, पुरुषांमध्ये आढळणाऱ्या स्तनाच्या इतर कर्करोगांमध्ये; स्तनाचा दाहक कर्करोग (Inflammatory Breast Cancer) आणि स्तनाग्राचा पॅजेट्स रोग (Paget’s Disease of the Nipple) यांचा समावेश होतो.
    हे प्रकार दुर्मिळ असले तरी, त्यांची लक्षणे अनेकदा त्वचारोगासारखी भासतात. त्यामुळे वेळेवर निदान न झाल्यास आजार झपाट्याने वाढू शकतो.
  • पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
  • पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे साधारणतः महिलांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांसारखीच असतात. मात्र, पुरुषांमध्ये स्तनाच्या ऊतींचे प्रमाण कमी असल्यामुळे ही लक्षणे अधिक पटकन जाणवू शकतात.

सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे :

  • स्तनाच्या भागात येणारी गाठ किंवा सूज प्रामुख्याने वेदनारहीत असते.
  • स्तनाच्या त्वचेवर सुरकुत्या पडणे, घट्टपणा किंवा सुज येते.
  • स्तनाग्र आत ओढले जातात (inverted nipple) किंवा त्याच्या आकारात बदल होतो.
  • स्तनाग्रातून स्त्राव (दुधासारखा, रक्ताळ किंवा पारदर्शक द्रव स्रवतो) होतो.
  • स्तनाग्राभोवती किंवा त्वचेवर लालसरपणा येतो, खवले येतात (scaling) किंवा जळजळ होते.

परंतु, हे सर्व बदल नेहमीच कर्करोगाशी संबंधित असतीलच असे नाही. स्तनांची सूज ही कधी कधी गायनेकोमास्टिया या सौम्य हार्मोनल स्थितीमुळेही होऊ शकते, या प्रकारात पुरुषांच्या स्तनाच्या ऊती वाढतात. तसेच, प्रत्येकवेळी येणारी गाठ ही कॅन्सरशी संबंधित असेलच असं नाही. असं असलं तरी लक्षण गंभीर नसल्याचा अंदाज बांधून दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास उपचारांचे परिणाम अधिक यशस्वी ठरतात.

डॉ. तनया नरेंद्र (Dr. Cuterus) (सेक्स व प्रजनन आरोग्य शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ) यांनी त्यांच्या Instagram रीलमध्ये तसेच यूट्यूब व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्या म्हणतात,

“होय! पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो आणि त्याची लक्षणं स्त्रियांप्रमाणेच असतात. स्तनांमध्ये गाठ आहे का ते तपासा (तीन बोटांनी हलके स्पर्श करून बघा आणि नवी गाठ जाणवली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या). स्तनाग्रावर लक्ष ठेवा. त्याचा आकार किंवा स्थिती अचानक बदलत नाही ना, आत ओढली जात नाही ना हे पहा. त्वचेवर लक्ष ठेवा. तिच्या पोतामध्ये बदल, सूज, खळगा पडणे किंवा ‘संत्र्याच्या सालासारखा’ दिसणारा पोत दिसल्यास त्वरित तपासणी करा. दुर्लक्ष करू नका.”

“महिन्यातून एकदा स्वतः तपासणी करा. कारण तुम्हीच जाणता की, ‘नॉर्मल’ कसं आहे आणि जेव्हा काही वेगळं दिसेल, तेव्हा ताबडतोब कृती करा. जर तुमच्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास असेल, तुम्हाला ‘मॅन बूब्स’ असतील, लठ्ठपणा असेल, अंडकोष किंवा यकृताचा आजार असेल, हार्मोन्सचे औषध घेत असाल किंवा क्लाइनफेल्टर सिंड्रोम असेल, तर तुम्ही अधिक काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे.”

(संदर्भ: Dr. Tanaya Narendra (@dr_cuterus), Instagram Reel: “Yes! Even men can get cancer in the breasts…”, : instagram.com/dr_cuterus)

डॉ. शाह (ऑन्कोलॉजिस्ट) यांनी फिनान्शियल एक्सप्रेसमधील ‘Men are also at breast cancer risk -doctor says most have no idea until it’s too late’ या लेखात म्हटलं आहे की, 

“ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त स्त्रियांचाच आजार आहे, ही चुकीची समजूत आता मोडून काढण्याची वेळ आली आहे. पुरुषांनाही या आजाराचा धोका असतो, आणि जितक्या लवकर लक्षणे ओळखून तपासणी केली जाते, तितक्या लवकर उपचार सुरू होऊन बरे होण्याची शक्यता वाढते.”

पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारे घटक

पुरुषांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वेगवेगळ्या कारणांनी वाढू शकतो. पण त्यामध्ये वाढते वय हे कारण अनेकदा महत्त्वाचे ठरते. बहुतांश पुरुषांमध्ये हा आजार वयाच्या चाळीशीनंतर किंवा वृद्धावस्थेत दिसून येतो. वयाव्यतिरिक्त काही इतर महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत.

१. कौटुंबिक इतिहास

जर घरात आई, बहीण किंवा वडील यांना स्तनाचा कर्करोग झालेला असेल, तर त्या पुरुषालाही धोका वाढतो. सुमारे ५ पैकी १ पुरुषाला स्तनाचा कर्करोग होतो. त्याच्या कुटुंबात आधी कोणाला तरी हा आजार झालेला असतो.

२. अनुवांशिक कारणे (Genetic Mutations)

काही लोकांच्या जनुकांमध्ये बदल (gene mutations) झाल्यामुळे त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यात विशेषतः BRCA1 आणि BRCA2 हे जनुक बदल महत्त्वाचे आहेत. BRCA1 असलेल्या पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका सुमारे ४ टक्के असतो. तर BRCA2 असलेल्यांमध्ये सुमारे ६ टक्के असतो. तसेच PTEN, TP53, PALB2 आणि CHEK2 हे इतर जनुकही काही प्रमाणात जबाबदार असतात.

३. लठ्ठपणा

जाड किंवा स्थूल पुरुषांच्या शरीरात इस्ट्रोजेनचे (स्त्री हार्मोन) प्रमाण जास्त असते. कारण चरबीच्या पेशी पुरुषांचे हार्मोन अँड्रोजनचे रूपांतर इस्ट्रोजेन मध्ये करतात. हा इस्ट्रोजेन कर्करोगाच्या पेशींना वाढण्यास मदत करतो. त्यामुळे लठ्ठ पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

४. क्लाइनफेल्टर सिंड्रोम

हा एक जन्मजात आजार आहे. यात पुरुषांमध्ये अतिरिक्त X क्रोमोसोम असतो. या आजाराने ग्रस्त पुरुषांमध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढते आणि अँड्रोजन कमी होते. त्यामुळे त्यांना इतर पुरुषांच्या तुलनेत २० ते ६० पट जास्त धोका असतो. हा आजार सुमारे १००० पैकी एका पुरुषात आढळतो.

५. यकृताचे आजार

सिरोसिससारखे यकृताचे गंभीर रोग झाल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे इस्ट्रोजेन वाढते आणि अँड्रोजन कमी होते.

६. अतिमद्यपान

जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. यकृत नीट काम न केल्यास हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

७. वृषणाचे विकार

जर एखाद्या पुरुषाचे अंडकोष (testicles) नीट कार्य करत नसतील किंवा ते जन्मतः खाली उतरलेले नसतील किंवा एक/दोन्ही काढून टाकावे लागले असतील. तर त्या पुरुषाला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

८. रेडिएशनचा संपर्क

जर कोणाला छातीवर रेडिएशन थेरपी (उदा. लिम्फोमा सारख्या आजारासाठी) दिली गेली असेल, तर भविष्यात त्याला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता ७ पट अधिक असते. विशेषतः गायनेकोमास्टियावर उपचार म्हणून रेडिएशन घेतलेल्या पुरुषांमध्ये हा धोका जास्त आढळ

पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग महिलांपेक्षा कमी आढळतो, पण तो अधिक उशीरा लक्षात येतो. त्यामुळे पुरुषांचा मृत्यूदर सुमारे १९ टक्के जास्त आहे. अनेकदा पुरुषांना सुरुवातीला गाठ किंवा लक्षणे दिसली तरी ते दुर्लक्ष करतात, त्यामुळे ४० टक्के रुग्णांचे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होते.

वाचण्याची किंवा बरे होण्याची शक्यता (Survival Rate):

पहिला टप्पा: ७५% ते १००%
दुसरा टप्पा: ५०% ते ८०%
तिसरा टप्पा: ३०% ते ६०%
चौथा टप्पा: २०% ते ३०%

संशोधनाचा अभाव

आतापर्यंत बहुतेक संशोधन आणि क्लिनिकल चाचण्या महिलांवर केंद्रित राहिल्या आहेत. त्यामुळे पुरुषांच्या कर्करोगाविषयीची माहिती मर्यादित आहे. बहुतांश वेळा पुरुषांवरही महिलांसारखेच उपचार केले जातात. परंतु, पुरुषांमधील आजाराची जैविक रचना थोडी वेगळी असू शकते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.