पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघाचा ‘मेंटॉर’ अर्थात ‘प्रेरक’ म्हणून नियुक्त करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) उत्सुक असल्याची चर्चा आहे. मात्र, भारताचा विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि धोनी हे राष्ट्रीय संघातील माजी सहकारी असून त्यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या योजनेत बाधा निर्माण होऊ शकेल. ‘बीसीसीआय’ धोनीबाबत नक्की का विचार करत आहे आणि मुळात धोनी या भूमिकेसाठी तयार होणार का, याचा आढावा.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत…

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भारतासह श्रीलंकेत होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत यजमान, तसेच गतविजेता म्हणून उतरेल. भारताने गतवर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. मात्र, विजेतेपदानंतर रोहित, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तारांकितांनी क्रिकेटच्या लघुत्तम प्रारूपातून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे पुढील वर्षीच्या स्पर्धेत भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार असून त्यांची युवकांवर भिस्त असेल.

धोनीबाबत अचानक चर्चा का?

धोनीला ‘मेंटॉर’ म्हणून नियुक्त करण्यास ‘बीसीसीआय’ उत्सुक असल्याची चर्चा असली, तरी अद्याप त्यांच्याकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. धोनीची क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये गणना केली जाते. त्याने कर्णधार म्हणून भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक (२००७), एकदिवसीय विश्वचषक (२०११) आणि चॅम्पियन्स करंडक (२०१३) या ‘आयसीसी’च्या तीनही मोठ्या स्पर्धा जिंकवून दिल्या होत्या. शिवाय त्याचे सल्ले युवा खेळाडूंसाठी मोलाचे ठरले. त्यामुळे धोनीच्या अनुभवाचा आणि निर्णयक्षमतेचा फायदा करून घेण्याचा ‘बीसीसीआय’चा विचार असू शकेल.

याआधीही ‘मेंटॉर’च्या भूमिकेत…

धोनीची आता ‘मेंटॉर’ म्हणून निवड झाली, तर ही भूमिका बजाविण्याची ही त्याची पहिली वेळ नसेल. याआधी धोनीने २०२१ साली संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात हे पद भूषविले होते. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरली होती. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करण्याची नामुष्की भारतावर ओढवली होती. विशेष म्हणजे, पाकिस्तानने हा सामना १० गडी राखून जिंकला होता. तसेच न्यूझीलंडकडूनही हार पत्करावी लागल्याने भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. त्यानंतर विराट कोहली आणि रवी शास्त्री हे अनुक्रमे कर्णधारपद आणि प्रशिक्षकपदापासून दूर झाले. तसेच धोनीला पुन्हा ‘मेंटॉर’ची जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

धोनी भूमिका स्वीकारणार?

धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, ‘आयपीएल’मध्ये तो अजूनही चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. गतहंगामात ऋतुराज गायकवाड जायबंदी झाल्यानंतर ४४ वर्षीय धोनीने पुन्हा या संघाचे नेतृत्वही केले. परंतु ‘आयपीएल’व्यतिरिक्त धोनी अन्य कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळत नाही. तसेच तो प्रकाशझोतापासूनही दूर राहतो. त्यामुळे ‘बीसीसीआय’ धोनीला ‘मेंटॉर’ म्हणून नियुक्त करण्यास उत्सुक असले, तरी धोनी त्यांचा फोन तरी उचलणार का, असा प्रश्न माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने गमतीत उपस्थित केला. ‘आयपीएल’ सुरू नसताना आपल्याला केवळ वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायला आवडते असे धोनीने वारंवार स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो ‘बीसीसीआय’च्या विनंतीवरून भारतीय संघाला मार्गदर्शन करण्यास तयार होईलच याची शाश्वती नाही.

प्रशिक्षक गंभीरचे काय?

धोनी आणि गंभीर हे भारतीय संघातील माजी सहकारी. २०११ सालच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम लढतीत या दोघांनी भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. परंतु या दोघांमध्ये सारे आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. गंभीर खेळाडू म्हणून २०१६ साली भारतीय संघातून पूर्णपणे बाहेर गेला. त्यानंतर त्याने समालोचकाची भूमिका बजावली. या भूमिकेतून त्याने अनेकदा धोनीच्या विरोधात वक्तव्य केले. कर्णधार असताना धोनीने अन्य खेळाडूंना दिलेली वागणूक, तसेच धोनीच्या खेळण्याच्या शैलीवरही गंभीरने टीका केली. आता ‘बीसीसीआय’ने धोनीला ‘मेंटॉर’ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्यास, भारतीय संघात मोठी दुफळी निर्माण होण्याची भीती आहे. परंतु ‘माझ्यासाठी देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नाही’ असे गंभीर वारंवार म्हणतो. त्यामुळे धोनीचा अनुभव भारतासाठी खरेच फायदेशीर आहे असा विश्वास असल्यास केवळ एका स्पर्धेपुरता का होईना, धोनीला आपल्या साहाय्यकांच्या ताफ्यात समावून घेण्याबाबत गंभीर विचार करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेत फिरकीपटूंचा दबदबा अपेक्षित आहे. कर्णधार म्हणून धोनी फिरकीपटूंच्या अचूक वापरासाठीच ओळखला जायचा. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी धोनी संघाशी जोडला गेल्यास, त्याचा भारताला फायदाच होईल.