scorecardresearch

विश्लेषण : गच्चीवर बाग बंधनकारक होणार? काय आहे मुंबई महापालिकेचे नवे धोरण?

गच्चीवरील बागेतील हिरवळीला पाणी घातल्यामुळे पाणी ठिबकत राहिल्यास वरच्या मजल्यांवर पाणी गळतीची समस्या निर्माण होऊ शकते.

terrace garden
मुंबई महापालिकेने आता नवीन इमारतींच्या गच्चीवर बाग तयार करणे बंधनकारक केले आहे. (फाइल फोटो सौजन्य, जनक पाठक, इंडियन एक्सप्रेस)

– इंद्रायणी नार्वेकर

मुंबईतील हिरवाई वाढवण्यासाठी मुंबईत आता मोकळी जागाच उरलेली नसल्याने मुंबई महापालिकेने आता नवीन इमारतींच्या गच्चीवर बाग तयार करणे बंधनकारक केले आहे. अशी बाग तयार करणे खरोखर शक्य आहे का, इमारतीच्या संरचनात्मकतेसाठी ते सुरक्षित आहे का, विकासक त्याकरीता तयार होतील का, हा निर्णय व्यवहार्य असेल का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

गच्चीवरील बागेची संकल्पना काय आहे?

मुंबईचा विस्तार होण्यासाठी जागाच नसल्यामुळे आता मुंबईचा विस्तार गगनचुंबी इमारतींद्वारे आकाशाच्या दिशेने झाला आहे. तापमान वाढीची समस्या जगासमोर उभी ठाकलेली असताना हिरवाई वाढवणे हा त्यावरील एक उपाय आहे. पालिकेतर्फे मुंबईत रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण केले जाते, उदयाने साकारली जातात. पालिकेने मुंबईत छोट्या भूखंडावर मियावाकी पद्धतीने शहरी जंगले उभारली आहेत. तसेच उड्डाणपुलाखालील जागांवर बाग निर्माण केली जात आहे. तरीही लोकसंख्येच्या तुलनेत हिरवाईच्या जागा कमी पडत असल्यामुळे पालिकेने आता नवीन इमारतींच्या गच्चीवर बाग साकारणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. गच्चीवरील बागेमुळे हरित क्षेत्र वाढवण्यास मदत होणार आहेच पण ही संकल्पना योग्य पद्धतीने वापरल्यास सार्वजनिक उद्यानांवरील ताण किंवा गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकते. सोसायटीतील हिरवळीचा वापर करून सोसायटीतील लोकांसाठी चालण्याची, विरंगुळ्याची ठिकाणे तयार झाल्यास हे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे.

कोणत्या इमारतींच्या गच्चीवर हिरवळ?

२००० चौ.मी. पेक्षा मोठे असणारे भूखंड विकसित करताना गच्चीवरील बाग तयार करणे बंधनकारक करण्याचा पालिकेचा विचार आहे. पालिकेने त्यासाठी धोरण आखले असून त्यावर सर्व बाजूने विचार विनिमय करण्याची, हरकती व सूचना घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोठ्या भूखंडावरील इमारतींच्या गच्चीवर मोठा भूभाग उपलब्ध होऊ शकतो. तसेच हा निर्णय केवळ नवीन इमारतींसाठी आहे. जुन्या इमारतींना तो लागू नाही.

इमारतींच्या संरचनात्मक सुरक्षेचे काय?

गच्चीवर बाग तयार करताना इमारतींच्या संरचनात्मक सुरक्षेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. हिरवळीला पाणी घातल्यामुळे पाणी ठिबकत राहिल्यास वरच्या मजल्यांवर पाणी गळतीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच त्यामुळे इमारतीला रचनेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी बाग तयार करताना विकासकास बांधकामाची सुरक्षा आणि संरचनात्मक स्थिरता यांच्या स्थितीबाबत खात्री करावी लागेल. यासाठी इमारतीच्या संरचनेत कोणतीही तडजोड न करता आणि इमारतीत भविष्यात पाणी गळतीची समस्या तयार होणार नाही अशा पद्धतीने बागेच्या परिरक्षणाकरिता सिंचन व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे व त्यासाठी नियोजनही करावे लागणार आहे. उद्यानातील पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक बांधकाम साहित्यांचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे पालिकेने हे धोरण विकास नियोजन खात्याकडे तपासणीसाठी पाठवले आहे. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री व नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल अशा बांधकाम क्षेत्रातील संस्थाशी चर्चा केली जाणार आहे.

बाग कशी साकारणार?

गच्चीवर बाग निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारची झाडेच लावली जाणार आहेत. ज्यांची पाळेमुळे खूप खोलवर जात नाहीत अशी, मध्यम विस्तार होणारी देशी जातीची झाडे लावण्याची संकल्पना आहे. केवळ गृहनिर्माण संस्थाच नाही तर शासकीय व निमशासकीय कार्यालये, तसेच उपलब्ध जागा तपासून त्याठिकाणी हरित क्षेत्र वाढवण्याचा पालिकेचा विचार आहे. ही संकल्पना राबवताना मातीचा वापर टाळावा लागणार आहे. मातीमध्ये पाणी ओतल्यास त्याचे वजन वाढते. त्यामुळे गच्चीवरील भार वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन या बागेसाठी खत, माती यांऐवजी पाणी धरून ठेवणारी हलक्या वजनाची माध्यमे जसे की कोकोपीट म्हणजेच नैसर्गिक भुसा वापरण्याची सूचना देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2022 at 09:51 IST

संबंधित बातम्या