मुंबईत सध्या चार मेट्रो मार्गिका सेवेत दाखल असून या चारही मेट्रो मार्गिकांना हळूहळू का होईना पण प्रतिसाद वाढत आहे. अतिजलद आणि आरामदायी प्रवासासाठी मेट्रोला मुंबईकरांकडून पसंती मिळत आहे. आता मुंबईत लवकरच, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाचवी ‘मेट्रो २ ब’ मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले टप्प्याच्या संचलनासाठी अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे डायमंड गार्डन – मंडाले हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ‘मेट्रो २ ब’ मार्गिका आणि त्यातील पहिल्या टप्प्याचा घेतलेला हा आढावा…

पाचवी मेट्रो मार्गिका

मुंबईतील पहिली घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १ मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आणि मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण झाले. या मार्गिकेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी आता मात्र या मार्गिकेकडे मुंबईकर वळू लागले आहेत. त्यामुळेच या मार्गिकेवरून प्रवास करणार्‍यांची दैनंदिन संख्या साडेचार लाखांपर्यंत आहे. पहिल्या मेट्रोनंतर मात्र पुढील मेट्रोसाठी मुंबईकरांना थेट २०२२ पर्यंत वाट पाहावी लागली.

२०२२ मध्ये मेट्रो २ अ (दहिसर – अंधेरी पश्चि) आणि मेट्रो ७ (दहिसर – गुंदवली) मार्गिकेवरील पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यानंतर काही महिन्याने दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. या मार्गिकेलाही हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. एकूण तीन मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर २०२४ मध्ये मुंबईकरांचे भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. ऑक्टोबर २०२४ मध्ये मेट्रो ३ मार्गिकेतील पहिला टप्पा, मे २०२५ मध्ये दुसरा टप्पा आणि ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शेवटचा टप्पा सुरू झाला असून आता मेट्रो ३ पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. आता मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले दरम्यानचा टप्पा सेवेत दाखल होणार आहे.

कशी आहे मेट्रो २ ब मार्गिका?

दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ ला जोडणारी मेट्रो मार्गिका म्हणजे मेट्रो २ ब. २३ किमी लांबीची आणि २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेमुळे अंधेरी पश्चिम – मंडाले दरम्यानचा प्रवास काही मिनिटांत करता येणार आहे. त्यामुळे ही मार्गिका मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अंदाजे १० हजार कोटींहून अधिक खर्चाच्या या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. यातील पहिला टप्पा डायमंड गार्डन – मंडाले आणि दुसरा टप्पा डायमंड गार्डन – अंधेरी पश्चिम असा आहे. ही संपूर्ण उन्नत मेट्रो मार्गिका असून अनेक रेल्वे मार्ग ओलांडून ही मार्गिका जाते. तर या मार्गिकेतील कारशेड मंडाले येथील ३१ एकर जागेवर उभारण्यात आली आहे. या कारशेडमध्ये एका वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करता येणार आहेत. अशा या मार्गिकेतील पहिला टप्प्याच्या संचलनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

लोकार्पणाचा मुहूर्त चुकला

कोणतीही मेट्रो मार्गिका सेवेत दाखल करण्यासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) दिल्ली यांच्या पथकाकडून मेट्रो गाड्यांसह विविध यंत्रणांच्या चाचण्या करून घेणे आवश्यक असते. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच सीएमआरएसकडून सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र असेल तरच मेट्रो धावू शकते.

मेट्रो २ ब मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी एमएमआरडीएने काही महिन्यांपूर्वी चाचण्यांना सुरुवात केली आहे. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चाचण्या पूर्ण करून डिसेंबरअखेरीस हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. या टप्प्याचे काम आणि चाचण्या डिसेंबरआधीच पूर्ण झाल्या. त्यामुळे ही मार्गिका नियोजित वेळेआधीच सेवेत दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पणासह या टप्प्याचेही लोकार्पण करण्याची तयारी सुरू होती. लोकार्पणाच्या किमान दोन – तीन दिवसआधी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होणे आवश्यक होते, मात्र हे प्रमाणपत्र न मिळाल्याने ८ ऑक्टोबरचा लोकार्पणाचा मुहूर्त चुकला आणि लोकार्पण लांबले.

अखेर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त

आठवड्याभरापूर्वी डायमंड गार्डन – मंडाले मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता या मार्गिकेच्या लोकार्पणाची तयारी एमएमआरडीएकडून सुरू आहे. राज्य सरकारकडे लोकार्पणाच्या तारखेच्या निश्चितीसाठी पाठपुरावा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्याचेही नियोजन सरकारचे आहे. त्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तर ३१ ऑक्टोबरला या मार्गिकेचे लोकार्पण केले जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे डायमंड गार्डन – मंडाले असा मेट्रो प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न येत्या काही दिवसांतच पूर्ण होणार आहे. मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डायमंड गार्डन यादरम्यान मेट्रो प्रवास करता येणार आहे. मंडाले – डायमंड गार्डन अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. ५.६ किमीचा हा टप्पा असणार असून हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास पूर्व उपनगरात धावणारी ही पहिली आणि मुंबईत धावणारी पाचवी मेट्रो मार्गिका ठरणार आहे.