मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी सध्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग सेवेत आहेत. मात्र या दोन्ही महामार्गांवरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अपुरा पडू लागला आहे. अशात भविष्यात वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे भविष्यातील वाहनांना सामावून घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) तिसरा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-बंगळूरु द्रुतगती महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करत त्याअंतर्गत तिसरा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मुंबई-पुणे अंतर अवघ्या दीड तासापर्यंत आणण्याचा दावा करण्यात येत आहे. तेव्हा हा प्रकल्प नेमका कसा आहे आणि या प्रकल्पाची आवश्यकता का भासली याचा हा आढावा…
मुंबई-पुणे प्रवासासाठी सध्या दोन महामार्ग
मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी आजच्या घडीला दोन प्रमुख रस्ते, महामार्ग सेवेत आहेत. पहिला अर्थातच मुंबई-पुणे महामार्ग (एनएच४८) आणि दुसरा यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग. जुना महामार्ग सुरुवातीला एनएच ४ म्हणून ओळखला जात होता, पण आता एनएच ४८ म्हणून ओळखला जातो. जुन्या महामार्गावरून अधिकाधिक स्थानिक वाहनांची ये-जा होते. तर मुंबई-पुणे प्रवासासाठी अतिजलद आणि अत्यंत महत्त्वाचा असा महामार्ग म्हणजे यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग. मुंबई-पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी, प्रवास वेगवान करण्यासाठी नवीन पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय १९९० मध्ये घेण्यात आला. ब्रिटिशकालीन जुना मुंबई ते पुणे महामार्ग भविष्यात अपुरा पडणार असल्याने नवीन महामार्ग बांधण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून हाती घेण्यात आले. १९९७ मध्ये यासाठी निविदा प्रक्रिया राबवित १९९८ मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली.९४.५ किमीचा महमार्ग २००२ मध्ये पूर्ण करत वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. या महामार्गामुळे मुंबई ते पुणे अंतर दोन ते अडीच तासांत पूर्ण करणे शक्य होऊ लागले. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी पथकर भरावा लागतो. मात्र हा महामार्ग राज्यातील वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा महामार्ग मानला जात असून देशातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग अशी ही या महामार्गाची ओळख आहे.
द्रुतगती महामार्गावरील ताण
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आज सर्वाधिक वर्दळीचा आणि राज्यातील सर्वात महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. सहा पदरी महामार्गावरून काही वर्षांपूर्वीपर्यंत दिवसाला ५५ हजार वाहने धावत होती. पण आता यात मोठी वाढ झाली असून दिवसाला ६५ हजार वाहने धावत आहेत. गर्दीच्या वेळेत, सलग सुट्ट्यांच्या वेळेस ही संख्या थेट एक लाखाच्या आसपास जातो. या महामार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भविष्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून हा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तर दुसरीकडे वाहनचालक-प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. कारण वाढत्या वाहनसंख्येमुळे अपघातांचीही भीती निर्माण झाली आहे. तर भविष्यात महामार्गावरील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ अपेक्षित आहे. या सर्व बाबी लक्षात घेत एमएसआरडीसीने एकीकडे १९.८० किमीच्या खोपोली ते कुसगाव मार्गिकेचे अर्थात मिसिंग लिंकचे काम हाती घेतले आहे. तर दुसरीकडे महामार्गातील एक-एक मार्गिका वाढवित महामार्गाचे आठपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला.या प्रकल्पांमुळे महामार्गाची क्षमता वाढणार असल्याचे सांगितले जात असले तरी भविष्यातील वाहनांची वाढ लक्षात घेता तिसरा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे.
तिसर्या महामार्गाची आवश्यकता
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी वाढत असून भविष्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महामार्गाच्या दहापदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला असला आणि त्यासाठी ‘मिसिंग लिंक’ बांधण्यात येत असली तरी येत्या काही वर्षात हा महामार्गही वाहतुकीसाठी अपुरा पडण्याची शक्यता आहे. कारण लवकरच देशातील सर्वात मोठे बंदर वाढवण पालघरजवळ होणार आहे. तर दुसरीकडे लवकरच नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे. याशिवाय एमएमआरडीएकडून अटल सेतू प्रभावित क्षेत्रात तिसरी मुंबई वसवली जाणार असून मुंबई महानगर प्रदेशाचा विकास ग्रोथ हब म्हणून केला जाणार आहे. या सर्व प्रकल्पांच्या अनुषंगाने मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी संभाव्य वाढत्या वाहन संख्येला सामावून घेण्यासाठी एनएचएआयने तिसरा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकल्प कधी?
एनएचएआयकडून पुणे-बंगळूरु असा ७०० किमीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे. आठ मार्गिकेच्या आणि अंदाजे ४२ हजार कोटींचा हा महामार्ग कनार्टक आणि महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून जात आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे ते बंगळूरू प्रवास केवळ सहा तासांत करता येणार आहे. अशा या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्यास आणि पुणे-बंगळूरू प्रवास अतिजलद करण्यासाठी काही वर्षांची प्रतीक्षा आहे. पण हा प्रकल्प सुरू होण्याआधीच एनएचएआयने पुणेकरांना-मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पुणे-बंगळूरू द्रुतगती महामार्गाचा विस्तार मुंबईपर्यंत करण्याचा निर्णय एनएचएआयने घेतला आहे. त्यानुसार अटल सेतू-चौक-शिवारे, पुणे असा १३० किमीचा द्रुतगती महामार्ग बांधत पुणे-बंगळूरु महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे.
असा असेल प्रकल्प
एनएचएआयच्या प्रस्तावानुसार अटल सेतू-चौक-शिवारे असा १३० किमीचा द्रुतगती महामार्ग असणार आहे. हा महामार्ग अटल सेतू जिथे संपतो तिथून सुरू होऊन पुणे वर्तुळाकार रस्त्याला जोडून पुढे बंगळूरूला जाईल. या महामार्गाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. पागोटे ते चौक असा ३० किमीचा पहिला टप्पा असणार असून चौक ते शिवारे, पुणे असा १०० किमीचा दुसरा टप्पा असणार आहे. पागोटे ते चौक टप्प्यासाठी ३५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.या टप्प्याचा आराखडा पूर्ण झाला असून भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी सुरू आहे. ९० टक्के भूसंपादन झाल्यास या टप्प्यासाठी निविदा काढली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे अर्थात चौक ते शिवारे टप्प्याचे नियोजन प्राथमिक स्तरावर आहे. या टप्प्याची व्यवहार्यता तपासणी करण्यात येणार असून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यानंतर आराखडा तयार करण्याचे काम होईल. ही कामे होण्यास आणखी काही महिने लागण्याची शक्यता असून आराखडा तयार झाल्यानंतरच चौक ते शिवारे १०० किमीच्या टप्प्याचे संरेखन नक्की कसे असेल आणि त्यासाठी किती खर्च येईल हे स्पष्ट होणार आहे. पण हा १३० किमीचा महामार्ग तयार झाल्यास मुंबई ते पुणे अंतर केवळ दीड तासात पार करता येणार आहे. तर मुंबई ते बंगळूरू अंतर केवळ साडेसात तासात पार करता येणार आहे.