नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपताच भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या हिंदुत्वाची बांधीलकी सांगणाऱ्या दोन पक्षात आता फारसे आलबेल राहिले नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका या निवडणुका म्हणजे काही प्रमाणात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठीचे एक व्यासपीठ मानले जाते. त्यामुळे या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी ‘मैत्रीपूर्ण’ लढती होतील असे दावे महायुतीतील तिन्ही पक्ष आधीपासून करत आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून या पक्षांमधील विशेषत: शिंदे आणि भाजपमध्ये पदाधिकारी, नगरसेवकांच्या पळवापळवीचे सत्र पाहता मित्राचा काटा काढण्याची ही खेळी कोणते टोक गाठेल याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
कोकण पट्टी संघर्षाचे केंद्र?
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही कोकण पट्टी एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानली जायची. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तर शिवसेनेची मोठी ताकद होती. कोकणात नंतरच्या काळात शिवसेनेपुढे नारायण राणे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचे आव्हान उभे राहिले खरे मात्र कोकणी माणून या संघर्षातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच राहिला. मुंबई, ठाण्यातही शिवसेनेचाच आवाज राहिला, तर कल्याण डोंबिवलीकरांनी या पक्षाची साथ कधी सोडली नाही. गेल्या काही वर्षात मात्र परिस्थिती बदलू लागली आहे. तीन वर्षांपूर्वी फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कधी नव्हे इतके आव्हान यंदा असेल. शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा मुंबईत भाजप मोठा भाऊ ठरण्याची शक्यता अधिक आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी कल्याण डोंबिवलीत आतापासूनच भाजप शिंदे यांना आव्हान देऊ पहात आहे. नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही शहरे असोत वा रत्नागिरी, खेड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका… कोठेही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव मान्य करण्यास भाजप तयार नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुका अपवाद असतील, मात्र स्थानिक पातळीवर मिळेल तेथे शिंदे यांच्याशी दोन हात करायची तयारी भाजप करू लागला आहे.
रवींद्र चव्हाण संघर्षाचा केंद्रबिंदू?
एक काळ असा होता जेव्हा भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पानही हलायचे नाही. शिंदे आणि चव्हाण यांचे राजकीय संबंध उत्तम होते. ठाणे, कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये युतीच्या राजकारणात भाजपची भूमिका दुय्यम असायची. त्यामुळे चव्हाण, संजय केळकर यांसारख्या नेत्यांना शिंदे नेहमीच पंखाखाली घेत असत. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्य राजकीय उदयानंतर मात्र चव्हाण आणि शिंदे यांच्यात बिनसल्यासारखे चित्र वारंवार दिसून येते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना श्रीकांत यांनी कल्याण डोंबिवलीवर एकहाती अंमल प्रस्थापित केला. चव्हाण तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये त्यांची गणना होत. असे असताना स्थानिक महापालिकेतील साधी फाइल हलविण्याचे अधिकारही त्यांना नव्हते. आता मात्र चित्र बदलले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत आणि चव्हाण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. त्यामुळे शिंदे यांची कल्याण डोंबिवलीसह कोकण पट्टीतील एकाधिकारशाही मोडीत काढण्याचा चंगच जणू चव्हाण यांनी बांधला आहे.
भाजपला मुंबई महानगर का हवे?
मुंबईपाठोपाठ झपाट्याने विस्तारणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांवर ताबा मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहे. नवी मुंबई, पनवेल, उरणसारखी शहरे भाजपच्या यापूर्वीच ताब्यात आली. या भागात विमानतळ, तिसरी मुंबईसारख्या मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना पालघर जिल्ह्यात चौथ्या मुंबईची पाळेमुळे रोवायची आहेत. येथेच देशातील सर्वात मोठे वाढवण बंदर उभे राहणार आहे. गुजरात-महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग असलेल्या या प्रदेशात बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदे महामार्ग, लाॅजिस्टिक पार्क, विरार-जेएनपीटी एक्सप्रेस काॅरिडाॅर अशा उद्योगभिमुख प्रकल्पांची आखणी सुरू आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महानगर प्रदेशाचे हे क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल असे दावे केले जातात. पुन्हा नागरीकरणाच्या या वेगात या शहरांचा मराठी चेहराही मागे पडत आहे. ठाणे हा देशातील वेगाने नागरीकरण होत असलेल्या पहिल्या पाच जिल्ह्यांतील एक आहे. या संपूर्ण प्रदेशाचा तोंडवळा पुढील काळात बदललेला दिसेल अशीच शक्यता आहे. नागरीकरण आणि स्थलांतरितांचा हा प्रदेश भाजपसाठी सुपीक जमीन ठरेल अशा पद्धतीची आखणी सुरू आहे. या वेगात स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान विरोधकांपेक्षा एकनाथ शिंदे यांच्यापुढे अधिक असेल.
एकनाथ शिंदेंची अडचण काय?
शिवसेनेत फूट पाडून भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री पद पटकविणारे एकनाथ शिंदे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः महापालिकेच्या निवडणुका भाजपविरोधात जाऊन लढविणे सोपे नाही. दिल्लीस्थीत ‘महाशक्ती’ आपल्या पाठीशी असल्याचे शिंदे सतत दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. काहीही दुखले, खुपले की दिल्ली गाठतात. गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्रात कोठेही दौरा असो शिंदे तेथे हजर असतात. राज्याच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगदानाचा उल्लेख भाजपवासी करत नाहीत तेवढा शिंदे करत असतात. अशा परिस्थितीत महापालिका निवडणुका भाजपच्या विरोधात जाऊन लढवायच्या तरी कशा असा प्रश्न शिंदे यांना सतावत नसेल असे सांगता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे या लढती मैत्रीपूर्ण झाल्याच तर गणेश नाईक, संजय केळकर, रवींद्र चव्हाण यांच्या कथनी आणि करणीतून ‘मैत्री’ काय असते हे शिंदेंना यापूर्वीच लक्षात आले आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांची अवस्था इतके आड तिकडे विहीर अशीच आहे.
