scorecardresearch

विश्लेषण : रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प विदर्भात का?

कच्च्या तेलापासून विविध उत्पादने तयार करणाऱ्या प्रकल्पाला तेलशुद्धीकरण पेट्रोलियम प्रकल्प म्हटले जाते.

विश्लेषण : रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प विदर्भात का?
रिफायनरी प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. (प्रातिनिधिक फोटो)

-राजेश्वर ठाकरे

तेल शुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्पाला नाणार येथे विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प विदर्भात यावा म्हणून येथील उद्योजक आणि राजकीय नेते प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी  या प्रकल्पाचे तीन भागांत विभागणीचे संकेत अलीकडेच चंद्रपूर येथे दिले. त्यापैकी एक चंद्रपुरात उभारला जाईल, असे सांगितले.पण चोवीस तासांतच त्यापासून घूमजावही केले. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प पुन्हा चर्चेत आला.  

तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल प्रकल्प म्हणजे काय?

कच्च्या तेलापासून विविध उत्पादने तयार करणाऱ्या प्रकल्पाला तेलशुद्धीकरण पेट्रोलियम प्रकल्प म्हटले जाते. कच्च्या तेलापासून २५ ते ३० टक्के इंधन (पेट्रोल, डिझेल, केरोसीन व विमानाचे इंधन) व ४० ते ४५ टक्के नॅफ्था, गॅस आणि पेट्रोरसायन (पेट्रोकेमिकल्स) काढले जाते. त्यानंतर पेट्रोकेमिकल्सपासून सिंथेटिक फायबर/यार्न, पॉलिमर, सिंथेटिक रबर (इलास्टोमर), सिंथेटिक डिटर्जेंट इंटरमीडिएट्स, परफॉरर्मन्स प्लास्टिक आणि प्लास्टिक तयार केले जाते.  

विदर्भात रिफायनरीची मागणी कशासाठी?

महाराष्ट्रात तीन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित आहे. तो  रत्नागिरी जिल्ह्यात नाणार येथे होणार होता. मात्र त्याला शिवसेना व स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध झाला. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प थंडबस्त्यात गेला. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. परंतु तेथेसुद्धा स्थानिक लोकांचा विरोध होता. तो बघून विदर्भात लॅण्ड रिफायनरी द्या, अशी मागणी होऊ लागली. विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यावर प्रक्रियेसाठी पॉलिस्टर उत्पादनाची आवश्यकता आहे, ज्यामुळे विविध श्रेणीचे दर्जेदार कापड उत्पादन होईल. प्रकल्प विदर्भात आल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे हा प्रकल्प विदर्भात आणावा, असे मागणीचे स्वरूप आहे.

विदर्भात रिफायनरीची गरज किती? 

विदर्भ औद्योगिकदृष्ट्या मागास आहे. येथे रिफायनरीसारखा प्रकल्प आल्यास पूरक उद्योग (मध्यम व लहान) येतील. त्यातून विदर्भाचा औद्योगिक विकास होईल. रोजगार संधी निर्माण होतील. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन, पाणी, वीज येथे उपलब्ध  आहे. शिवाय येथे मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने प्रदूषणाचा धोकाही कमी आहे. या प्रकल्पाच्या विविध आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि राजकीय परिणामाबद्दल सखोल अभ्यास स्थानिक उद्योजकांनी केला आहे व तसा अहवाल राज्य व केंद्राला सादर केला आहे. 

देशात लॅण्ड रिफायनरीची स्थिती काय? 

भारताला रासायनिक क्षेत्रातील तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल प्रकल्पांची गरज मुख्यत्वे वाहन क्षेत्रातील दुपटीने होणारी इंधनाची वाढ आणि सुधारणाऱ्या राहणीमानासाठी लागणारे पेट्रोकेमिकल यासाठी आहे. सध्या देशात २४८.९ एमएमटीपीए एवढ्या क्षमतेच्या रिफायनरी आहेत. इंधनाची वाढती गरज लक्षात घेता नवीन तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प उभारणीची गरज आहे. राजस्थानमध्ये ५०० किलोमीटर तेलवाहिनी टाकून रिफायनरी उभारण्यात आली. तर पानीपत (हरियाणा) येथे ११०० किमी तेलवाहिनीद्वारे कच्चे तेल रिफायनरीसाठी आणले जाते. त्याचप्रमाणे बरौनी, मथुरा, भटिण्डा, बिना, गुवाहाटी येथील रिफायनरी समुद्रकिनाऱ्यापासून लांब अंतरावर असून त्या नफ्यात आहेत. त्यामुळे विदर्भात रिफायनरीची मागणी यशस्वी होऊ शकते, असे स्थानिक उद्योजकांचे म्हणणे आहे. 

समृद्धी महामार्गाचा लाभ प्रकल्पाला होईल काय?

विदर्भातही अन्य लॅण्ड रिफायनरीप्रमाणे (समुद्रापासून दूर अंतरावर असणारी ) कच्चा तेल पुरवठा तेलवाहिन्यांद्वारे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाने केला जाऊ शकतो. यामुळे रस्ता-रेल्वे वाहतुकीसाठी होणाऱ्या खर्चात मोठी बचत होऊ शकते. विदर्भात रिफायनरी झाल्यास ५०० चौरस किलोमीटर क्षेत्राला इंधन आणि वायू पुरवठा करणे शक्य होईल. विदर्भालगतची छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा ही राज्ये विदर्भातील रिफायनरीमधून कमी खर्चात पेट्रोलियम पदार्थ, स्वयंपाकाच्या गॅस घेऊ शकतील. तसेच चार लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचे चांगले सामाजिक परिणाम दिसतील, असा दावा स्थानिक उद्योजकांचा आहे. 

वादाचे कारण काय?

पेट्रोल शुद्धीकरण प्रकल्प चंद्रपुरात उभारण्याचा घोषणेवरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काही तासातच घूमाजाव केले. स्थानिक उद्योजकांनी पुरी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ६० दशलक्ष एमटीपीएच्या नाणार प्रकल्पाचे तीन भागात विभाजन करण्यात येणार आहे, असे सांगितले. त्यामुळे विदर्भातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. हा प्रकल्प येथे येईल असे समजताच पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. या प्रकल्पामुळे  मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, असा त्यांचा दावा आहे. चंद्रपूर हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक शहर गणले जाते हे येथे उल्लेखनीय ठरते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या