How Pakistan plans to rebuild Lashkar-e-Taiba terror hub: दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानातील मुरिदके येथील लष्कर-ए- तैयबाच्या मुख्यालयावर अचूक हल्ला करून दहशतवादासाठी पायाभूत सुविधा म्हणून वापरल्या जाणाऱ्या केंद्रावर जबरदस्त वार केला. परंतु, या हल्ल्यानंतरही पाकिस्तान सरकारने घेतलेला निर्णय सुन्न करणारा आहे. पाकिस्तानाने मुरिदकेला पुन्हा उभं करण्याचा आणि दहशतवाद्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

एका बाजूला दहशतवादाच्या विरोधात लढा देण्याचा दावा करणारा पाकिस्तान, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पंतप्रधान स्वतःच मुरिदके मशिदींच्या पुनर्बांधणीसाठी पुढे सरसावले आहे. या विरोधाभासाने एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो; पाकिस्तानच्या भूमिकेमागचा छुपा हेतू काय?

७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने या अड्ड्यावर अचूक हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या लोकांना भेटण्यासाठी पाकिस्तानचे दोन मंत्री घटनास्थळी पोहोचले आणि सरकारकडून त्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे.

Maxar Technologies/Handout via Reuters

मुरिदकेचा पुनर्उभारणीचा निर्णय

पाकिस्तान सरकारने जाहीर केलं आहे की, मुरिदके परिसराची आणि त्यामधील महत्वाच्या मशिदीची पुनर्बांधणी केली जाईल. पाकिस्तानचे उद्योगमंत्री राणा तनवीर हुसेन आणि गृहनिर्माणमंत्री बिलाल यासीन यांनी जखमींची भेट घेतली. त्या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी स्वतःच्या खिशातून मशिदीच्या पुनर्निर्माणासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने केलेले हल्ले

७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले केले. यामध्ये मुरिदकेतील मरकज तैबा आणि बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ यांचा समावेश होता. हे हल्ले २२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यात २५ भारतीय तर एका नेपाळी नागरिकांचे प्राण गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्करचाच एक उपगट असलेल्या दि रेसिस्टन्स फ्रंट (TRF) ने घेतली होती.

पाकिस्तानची भूमिका

पाकिस्तान सरकारने जाहीर केले की, भारताच्या हल्ल्यात मरण पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना १ कोटी ते १.८ कोटी रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई दिली जाईल. जखमींना १० लाख ते २० लाख रुपये दिले जातील. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी जाहीर केलं की, जी घरं आणि मशिदी भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्यांची पुनर्बांधणी सरकार करेल.

पाकचे आरोप फेटाळले

भारतीय लष्कराने या ठिकाणी फक्त दहशतवाद्यांनाच लक्ष्य केल्याचा पुनरुच्चार केला असून, धार्मिक स्थळांना हानी पोहोचवण्याचे पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहेत.

दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला लष्करी अधिकारी

भारतीय लष्कराने ज्या दहशतवाद्यांना ठार केलं, त्यांच्या अंत्यसंस्कारास पाकिस्तानी लष्कराचे आणि पाकिस्तानातील पंजाब पोलिसांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांची छायाचित्रं आणि नावे भारताकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या अंत्यसंस्कारांचे नेतृत्व मसूद अझहरचा भाऊ आणि अमेरिकेने घोषित केलेला दहशतवादी हाफिज अब्दुर रऊफ यांनी केलं. या वेळी जमात-उद-दवाचे सदस्यही उपस्थित होते.

सोशल मीडियावरून प्रचार

Sky News च्या डेटा विश्लेषकांनी TikTok, YouTube आणि Google वरून मिळालेल्या व्हिडिओजमध्ये Markaz Taiba चं लोकेशन तपासलं. हे व्हिडिओ हल्ल्याआधी शूट करण्यात आले होते आणि लष्कर-ए-तैयबा व ‘313 ब्रिगेड’ (अल-कायदाच्या पाकिस्तानमधील सैनिकी शाखेचा भाग) यांच्या प्रचारासाठी वापरले होते.

मुरिदकेतील दहशतवादी तळ

मुरिदके हे लष्कर-ए- तैयबाचं मुख्यालय असून २००० साली ते Markaz-e-Taiba नावाने स्थापन करण्यात आलं. हे ठिकाण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखुपुरा जिल्ह्यातील नंगल सहदान येथे आहे आणि ते ८२ एकरांवर पसरलेले आहे. येथे शाळा, रुग्णालयं, मशिदी, निवासी वसाहती आणि शस्त्र प्रशिक्षण केंद्रं आहेत. याच ठिकाणी ओसामा बिन लादेनने २००० साली एका मशीद आणि अतिथीगृहासाठी निधी दिला होता.

मुंबई हल्ल्याचेही प्रशिक्षण केंद्र

२००८ च्या मुंबई हल्ल्यातील अजमल कसाब यासह इतर दहशतवाद्यांना याच केंद्रात प्रशिक्षण देण्यात आलं होतं. डेव्हिड हेडली, तहाव्वूर राणा, अब्दुल रहमान सय्यद, हारून आणि खुर्ऱम हे या ठिकाणी भेट देऊन गेले होते.

दहशतवाद्यांचे छोटे शहरच

लष्करचा संस्थापक हाफिज सईद आणि झकी उर रहमान लखवी यांची निवासस्थानेही या संकुलात आहेत. एका वरिष्ठ भारतीय दहशतवादविरोधी मोहिमतील अधिकाऱ्याने सांगितलं की, हे संकुल म्हणजे एखाद्या छोट्याशा शहरासारखं आहे. इथे लष्करच्या सर्व गरजांची पूर्तता होते. जी केवळ पाकिस्तान सरकारच्या सहकार्याशिवाय शक्यच नाही.

मुरिदके हे दहशतवादाचं मुख्य केंद्र असून, तिथून केवळ काश्मीरच नव्हे, तर जगभरात इतरत्रही दहशतवादी कारवाया राबवल्या जातात. भारताने केलेला हल्ला हा केवळ सामरिक नव्हे, तर राजनैतिक आणि धोरणात्मक पातळीवरही दहशतवाद्यांना पोसण्याच्या पाकिस्तानच्या धोरणावर थेट आघात आहे.